कोकण पर्यटनाला ‘ब्ल्यू फ्लॅग’!


Blue Flag Beaches in Maharashtra
 
रायगडमधील श्रीवर्धन आणि रत्नागिरीतील गुहागर व लाडघर या तीन समुद्रकिनार्‍यांना २०२६-२७ साठी प्रतिष्ठेचा ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या एकूण ७२० किमीच्या समुद्रकिनारपट्टीला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया, ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकनाचे महत्त्व, या किनार्‍यांचा प्रवास, कोकण पर्यटनाला मिळणार्‍या नव्या संधी आणि हा आंतरराष्ट्रीय दर्जा टिकवण्याची आव्हाने!
 
महाराष्ट्राला सुमारे ७२० किमी लांबीची विस्तीर्ण समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. निसर्गसौंदर्य, जैवविविधता, समृद्ध सागरी वारसा आणि पर्यटनाच्या अमाप संधी यांमुळे कोकणातील समुद्रकिनारे देशविदेशांतील पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, समुद्रकिनार्‍यांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी केवळ निसर्गसंपदा पुरेशी नसते. स्वच्छता, सुरक्षितता, पर्यावरणाचे संरक्षण, पाण्याची गुणवत्ता आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा यांचीही तितकीच गरज असते. याच निकषांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दिले जाणारे ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी महत्त्वाचे ठरत आहे.
 
‘ब्ल्यू फ्लॅग’ म्हणजे काय?
 
‘ब्ल्यू फ्लॅग’ हा डेन्मार्कस्थित ‘फाऊंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन’ (एफईई) या संस्थेकडून दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय दर्जा आहे. समुद्रकिनार्‍यांची स्वच्छता, आंघोळीसाठीच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, पर्यटकांची सुरक्षितता आणि पायाभूत सुविधा अशा ३३ निकषांवर या किनार्‍यांचे मूल्यमापन केले जाते. हा केवळ सौंदर्याचा पुरस्कार नसून, किनारपट्टीचे व्यवस्थापन आणि शाश्वत पर्यटनासाठीची गुणवत्ता दर्शवणारे मानांकन आहे.
 
महाराष्ट्र शासनाने कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी २०२५ मध्ये पाच समुद्रकिनार्‍यांची ‘ब्ल्यू फ्लॅग’ उपक्रमासाठी निवड केली. यामध्ये रायगड जिल्ह्यातील नागांव आणि श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर, तसेच पालघर जिल्ह्यातील पारनाका (डहाणू) या किनार्‍यांचा समावेश होता.
 
या उपक्रमातून किनार्‍यांवर स्वच्छतागृहे, बदलण्याच्या खोल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, वाहनतळ, सुरक्षाव्यवस्था, जीवरक्षक मनोरे, प्रकाशयोजना आणि पर्यटकांसाठी माहिती फलक अशा सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला. किनार्‍यांचे सौंदर्य अबाधित ठेवत पर्यटकांना सुरक्षित आणि दर्जेदार अनुभव देणे, हा या प्रयत्नांचा मुख्य उद्देश आहे.
 
तीन किनार्‍यांना आंतरराष्ट्रीय बहुमान
 
या प्रयत्नांना २०२६ मध्ये महत्त्वपूर्ण यश मिळाले. ‘आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग ज्युरी’ने २०२६-२७ या हंगामासाठी महाराष्ट्रातील तीन समुद्रकिनार्‍यांना ‘आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार’ जाहीर केला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर आणि गुहागर, तसेच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या समुद्रकिनार्‍यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील समुद्रकिनार्‍यांना पहिल्यांदाच ‘आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग यादी’त स्थान मिळाले आहे. या किनार्‍यांचा मानांकनाचा हंगाम दि. १५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे.
 
लाडघरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, गुहागरचे निसर्गरम्य किनारपट्टीचे सौंदर्य आणि श्रीवर्धनचा ऐतिहासिक व पर्यटन वारसा यांमुळे या तिन्ही ठिकाणांना विशेष महत्त्व आहे. या किनार्‍यांना मिळालेला आंतरराष्ट्रीय बहुमान म्हणजे केवळ पर्यटनस्थळांची प्रसिद्धी नव्हे, तर पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.
 
‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकनामुळे महाराष्ट्राच्या कोकण पर्यटनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्यास देशीविदेशी पर्यटकांचे कोकण किनारपट्टीकडे आकर्षण आणखी वाढेल. त्यातून स्थानिक हॉटेल व्यवसाय, खानावळी, होम-स्टे, वाहतूक, हस्तकला, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होईल. विशेषतः किनारपट्टीवरील तरुणांना पर्यटनाशी संबंधित रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.
 
मानांकन टिकविणेही तितकेच आवश्यक
 
मात्र, आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते टिकवणेही आवश्यक आहे. समुद्रकिनार्‍यांवर प्लास्टिकचा कचरा साचू न देणे, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे, सागरी जीवसृष्टीचे संरक्षण करणे आणि पर्यटकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, पर्यटन विभाग, पर्यावरण विभाग, किनारा व्यवस्थापन समित्या आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यामध्ये निर्णायक ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या ७२० किमीच्या किनारपट्टीवर अनेक निसर्गरम्य समुद्रकिनारे आहेत. त्यांना योग्य सुविधा, शास्त्रीय व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक विकासाची जोड दिल्यास आणखी किनारे आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या कक्षेत येऊ शकतात. पाच किनार्‍यांपासून सुरू झालेला प्रयत्न आणि त्यातील तीन किनार्‍यांना मिळालेले आंतरराष्ट्रीय यश हा कोकण पर्यटनासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत महाराष्ट्राची किनारपट्टी जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे उमटण्याची ही संधी आहे.
 
‘आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग ज्युरी‘ने २०२६-२७ या हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर या दोन समुद्रकिनार्‍यांना प्रतिष्ठेचा ‘इंटरनॅशनल ब्ल्यू फ्लॅग’ सन्मान जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील समुद्रकिनार्‍यांना प्रथमच या आंतरराष्ट्रीय सन्मानाच्या यादीत स्थान मिळालं आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हा क्षण माझ्यासाठी विशेष अभिमानाचा आहे. आपल्या कोकणच्या निसर्गसंपन्न किनार्‍यांना मिळालेली ही जागतिक ओळख म्हणजे पर्यटन विकासाच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे. राज्य शासनाचे विविध विभाग, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांच्या समन्वयातून हे यश साध्य झाले आहे. या कामगिरीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केलेल्या सन्मानानं मन भारावून गेलं. हा सन्मान मी रत्नागिरीच्या विकासासाठी योगदान देणार्‍या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकाचा सन्मान मानतो.
 
- उदय सामंत, पालकमंत्री, रत्नागिरी
 
‘श्रीवर्धनचा आंतरराष्ट्रीय गौरव अभिमानास्पद!
 
गेल्या दोन वर्षांपासून ज्या स्वप्नाचा सातत्याने पाठपुरावा करत होतो, त्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनसह कोकणातील गुहागर आणि लाडघर या तीन समुद्रकिनार्‍यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार’ मंजूर झाला आहे. श्रीवर्धन समुद्रकिनारा हा रायगड जिल्ह्यातील पहिला ‘ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार’प्राप्त समुद्रकिनारा ठरल्याचा विशेष आनंद आणि अभिमान आहे. या मानांकनासाठी पर्यावरण आणि स्वच्छतेचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. या यशात योगदान देणारे अधिकारी, स्थानिक नागरिक आणि सर्व सहकार्‍यांचे मनःपूर्वक आभार. हा पुरस्कार म्हणजे आपल्या स्वच्छ आणि समृद्ध समुद्रकिनार्‍यांची आंतरराष्ट्रीय ओळख आहे!
 
- आदिती तटकरे, महिला व बालविकासमंत्री, महाराष्ट्र
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर