मंगळवारी 'माय होम इंडिया'चा १७ वा 'वन इंडिया अवॉर्ड' पुरस्कार सोहळा; मणिपूरचे डॉ. थंगजाम धबाली सिंह यंदाचे पुरस्कारार्थी

    13-Nov-2026   

17th One India Award 2026
 
मुंबई (17th One India Award 2026) : ईशान्य भारतातील नागरिकांशी देशबंधाचा धागा अधिक मजबूत करणाऱ्या आणि सामाजिक एकात्मतेसाठी कार्यरत असलेल्या 'माय होम इंडिया' या संस्थेला यंदा २१ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संस्थेचा अत्यंत प्रतिष्ठित असा १७ वा 'वन इंडिया अवॉर्ड' सोहळा आगामी मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. सोहळ्याचे आयोजन दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे करण्यात आले असून, सायंकाळी ४:०० वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल.
 
या वर्षीचा 'वन इंडिया अवॉर्ड' मणिपूरचे ख्यातनाम पॅथॉलॉजिस्ट, उद्योजक आणि संस्था-निर्माते डॉ. थंगजाम धबाली सिंह यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल प्रदान केला जाणार आहे. त्याचबरोबर या भव्य सोहळ्याला अनेक नामवंत व्यक्तींची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती असेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने प्रसिद्ध एंडोक्राइनोलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट आणि संशोधक पद्मश्री डॉ. शशांक जोशी उपस्थित असतील. या प्रेरणादायी सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन माय होम इंडियाच्या वतीने करण्यात आले आहे.(17th One India Award 2026)
 
मणिपूरमधील अनेक वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या शहरांमध्ये संधी शोधण्यासाठी राज्याबाहेर जात असताना, डॉ. थांगजाम धबाली सिंह यांनी मात्र आपल्या मातृभूमीतच राहून तिची सेवा करण्याचा निर्णय घेतला. संघर्ष आणि अनिश्चिततेचे वातावरण असलेल्या प्रदेशात आरोग्यसेवा संस्था उभारण्याचे आव्हान स्वीकारत त्यांनी मणिपूरमध्ये आधुनिक निदान सुविधा आणि प्रगत वैद्यकीय उपचार सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आणले. मणिपूरमध्ये त्यांनी दर्जेदार आरोग्यसेवेचा विस्तार केला. त्याचबरोबर स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण केल्या. मणिपूरमध्ये कर्करोग उपचारसेवेचा पाया घालण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. रुग्णालये, हॉटेल्स आणि प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील तरुणांसाठी आपल्या मातीतच अर्थपूर्ण करिअर घडविण्याचे मार्ग खुले केले.
 
मणिपूर टुरिझम फोरमचे संस्थापक अध्यक्ष म्हणून डॉ. सिंह यांनी मणिपूरला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मणिपूर आणि जपान यांच्यातील सामायिक इतिहासाचे स्मरण करून देणाऱ्या ‘इम्फाळ पीस म्युझियम’च्या माध्यमातून त्यांनी दोन्ही देशांमधील सांस्कृतिक समज आणि मैत्रीचे पूल उभारले. भारत-जपान मैत्री वृद्धिंगत करण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत जपान सरकारने २०२० मध्ये त्यांना ‘ऑर्डर ऑफ द रायझिंग सन, गोल्ड अँड सिल्व्हर रेज’ या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविले. आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती, पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय मैत्री अशा विविध क्षेत्रांतील त्यांचे कार्य मणिपूरच्या प्रगतीप्रती असलेली त्यांची अढळ बांधिलकी अधोरेखित करते. मणिपूर आणि देशासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘माय होम इंडिया’ या संस्थेला डॉ. थांगजाम धबाली सिंह यांना १७व्या ‘ओ.एन.ई. इंडिया पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येत आहे.(17th One India Award 2026)
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर