सौन्दर्यलहरी भाष्य (भाग - ३९)

    12-Nov-2026

Saundaryalahari Shloka 29
 
‘सौन्दर्यलहरी’च्या या श्लोकात आदि शंकराचार्यांनी देवीच्या स्वरूपातील दोन विलक्षण पैलू एकाच प्रसंगात उलगडले आहेत. एकीकडे ती समस्त ब्रह्मांडाची अधिष्ठात्री, सर्व देवतांची परमेश्वरी आणि विश्वाची सार्वभौम महाराज्ञी आहे; तर दुसरीकडे भगवान शिवांच्या आगमनाने आनंदित होणारी, त्यांच्या स्वागतासाठी उत्साहाने उठणारी प्रेममयी शक्ती आहे. या श्लोकाचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे शंकराचार्य देवीचे ऐश्वर्य, तिला सावध करणार्‍या परिचारिकांचे संवादांमधून प्रकट करतात.
 
किरीटं वैरिञ्चं परिहर पुरः कैटभभिदः
कठोरे कोटीरे स्खलसि जहि जम्भारि-मकुटम् |
प्रणम्रेष्वेतेषु प्रसभ-मुपयातस्य भवनं
भवस्यभ्युत्थाने तव परिजनोक्ति-र्विजयते ॥ २९ ॥
 
अन्वय - एतेषु प्रणम्रेषु (सत्सु), भवनं प्रसभम् उपयातस्य भवस्य अभ्युत्थाने, वैरिञ्चं किरीटं परिहर, पुरः कैटभभिदः कठोरे कोटीरे स्खलसि, जम्भारिमकुटं जहि इति तव परिजनोक्तिः विजयते|
 
भावार्थ : हा श्लोक अत्यंत भावपूर्ण आहे. श्री ललिता देवी तिच्या महालात सिंहासनावर बसलेली असून, ती जगदंबा असल्याने सृष्टी, स्थिती या अवस्थांचे स्वामी ब्रह्मदेव आणि विष्णू तिच्या भेटीस आले आहेत. देवराज इंद्रही आला आहे. हे सगळे देव श्री ललिता देवीच्या चरणी आपले रत्नजडित मुकुट ठेवून, नतमस्तक झाले आहेत. त्याच वेळी श्री ललिता देवीच्या या दालनात साक्षात शिव प्रवेश करतात. त्यांच्या आगमनाची चाहूल लागताक्षणी श्री ललिता देवी लगबगीने उठते आणि त्यांना सामोरे जाण्यास निघते. देवीची ही लगबग बघून देवीच्या सेवेत असणार्‍या तिच्या सेविका अर्थात, ‘अष्टवाग्देवी’ तिला सावध करतात. हे देवी! समोर ब्रह्मदेवांचा मुकुट आहे, तो टाळून पुढे जा! थांब, पुढे भगवान विष्णूंचा कठीण किरीट आहे, त्याला ठेचाळशील! आणि हा इंद्राचा मुकुटही बाजूला सारा! थोडयात, आपल्या पतीच्या स्वागतार्थ देवी भान हरपून, तत्काळ त्यांच्या दर्शनाला धावते. देवांचे हे मुकुट तिच्या मार्गातील अडथळे होतील, याच भावनेतून त्या देवीशी संवाद साधत आहेत. या श्लोकातून श्री ललिता देवीची पतिपरायणता, तिचे शिवावरील निस्सीम प्रेम आणि त्याच्या आगमनाने तिला झालेला आत्यंतिक आनंद दिसतो.
 
‘सौन्दर्यलहरी’च्या या श्लोकात आदि शंकराचार्यांनी देवीच्या स्वरूपातील दोन विलक्षण पैलू एकाच प्रसंगात उलगडले आहेत. एकीकडे ती समस्त ब्रह्मांडाची अधिष्ठात्री, सर्व देवतांची परमेश्वरी आणि विश्वाची सार्वभौम महाराज्ञी आहे; तर दुसरीकडे भगवान शिवांच्या आगमनाने आनंदित होणारी, त्यांच्या स्वागतासाठी उत्साहाने उठणारी प्रेममयी शक्ती आहे. या श्लोकाचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे शंकराचार्य देवीचे ऐश्वर्य, तिला सावध करणार्‍या परिचारिकांचे संवादांमधून प्रकट करतात. ब्रह्मदेव, विष्णू आणि इंद्र ही सामान्य दैवते नाहीत. सृष्टीचे निर्माण, पालन आणि देवसत्तेचे संचालनांसारखी, अत्यंत महत्त्वाची कार्ये त्यांच्याशी संबंधित आहेत. परंतु, या सर्व देवताही परमेश्वरीच्या चरणांवर नतमस्तक आहेत. त्यांचे मुकुट ही त्यांच्या अधिकाराची आणि ऐश्वर्याची प्रतीके. तेच मुकुट आता जगदंबेच्या चरणी त्यांनी ठेवले आहेत.
 
यातून शंकराचार्य एक महत्त्वाचे तत्त्व सूचित करतात. सृष्टीतील समस्त अधिकार, सामर्थ्य आणि ऐश्वर्याचे अंतिम अधिष्ठान म्हणजे ‘पराशक्ती’. देवतांचे अधिकारही तिच्या शक्तीच्या आधारेच कार्यरत असतात. पण, या ऐश्वर्यवर्णनाला अचानक एक विलक्षण कलाटणी मिळते. भगवान शिवांचे आगमन होते आणि परमेश्वरी त्यांच्या स्वागतासाठी उत्साहाने उठते! येथे नाट्यमय विरोधाभास आहे. जिच्या चरणांवर सृष्टीतील श्रेष्ठ देवता नतमस्तक आहेत, ती स्वतः आपल्या प्रियतमाच्या स्वागतासाठी तत्परतेने उठते. तिचे हे वर्तन स्वतःच्या श्रेष्ठत्वाची जाणीव नसल्यामुळे नसून, प्रेमाच्या सहजस्फूर्त अविष्कारामुळे आहे. शंकराचार्यांना येथे देवीच्या गौरवापलीकडे, तिच्या प्रेममय स्वरूपाचेही दर्शन घडवायचे आहे. इतकेच नाही, तर जगताची सम्राज्ञीही पतीप्रेमापुढे सर्वकाही तुच्छ मानते, हा सिद्धान्तही आचार्य मांडतात. पती-पत्नी प्रेमाचे हे अत्यंत अनुपम, वेगळे आणि भावपूर्ण वर्णन आचार्य करतात.
या श्लोकातील ‘तव परिजनोक्तिर्विजयते’ हा शब्दप्रयोग विशेष लक्षवेधी. शंकराचार्य देवीच्या कृतीपेक्षा, तिच्या परिचारिकांच्या उद्गारांचाच गौरव करतात. देवीच्या चरणांवर नतमस्तक देवतांच्या मस्तकांवरील मुकुट रत्नजडित आणि कठीण आहेत. देवी शिवांच्या स्वागतासाठी उतावीळ झाल्याने तिचा पाय त्या मुकुटांवर पडण्याची शयता आहे. म्हणून परिचारिका तिला सावध करतात. येथे अत्यंत सूक्ष्म भावनात्मक सौंदर्य आहे. परिचारिकांना ब्रह्मा, विष्णू किंवा इंद्र यांच्या मुकुटांच्या सुरक्षिततेची चिंता नाही. त्यांना चिंता आहे, ती त्या मुकुटांमुळे आपल्या स्वामिनीच्या कोमल चरणांना ठेच लागू नये याची!
 
या एकाच कल्पनेतून देवीच्या सेविकांचे तिच्या विषयीचे वात्सल्य, आत्मीयता आणि सेवाभाव व्यक्त होतो. संपूर्ण प्रसंग एखाद्या सुंदर नाट्यदृश्यासारखा डोळ्यांसमोर उभा राहतो. शंकराचार्य येथे देवतांचा अवमान करीत नाहीत. उलट, ब्रह्मा, विष्णू आणि इंद्र यांचे ऐश्वर्य किती महान आहे, हे गृहीत धरूनच त्याहून श्रेष्ठ पराशक्तीचे महत्त्व अधोरेखित करतात. देवतांच्या मुकुटांशी तुलना केल्याने देवीच्या चरणांचे कोमलत्वही अधिक प्रभावीपणे व्यक्त होते.
 
आध्यात्मिक अर्थ : या श्लोकाचा सर्वांत महत्त्वाचा आध्यात्मिक पैलू म्हणजे शिवशक्तीचे अभिन्नत्व. शिव शक्तीशी संयुक्त असतील, तरच सृष्टीच्या व्यापारासाठी समर्थ होतात. शक्तीशिवाय शिवांचे स्पंदनही संभवत नाही, असा या विधानाचा आशय. हे लक्षात घेतल्याशिवाय २९व्या श्लोकाचा अर्थ उलगडत नाही. श्री ललिता ही पराशक्ती आहे आणि तर भगवान शिव हे परमचैतन्याचे स्वरूप. शक्ती ही चैतन्याची अभिव्यक्ती असून, या दोघांचे अस्तित्व परमार्थतः अभिन्न आहे. श्री ललिता सहस्रनामातील ‘शिवशक्त्यैयरूपिणी’ हे नाम याच तत्त्वाची प्रचिती देते.
 
अशा परिस्थितीत देवी शिवांच्या स्वागतासाठी उठते, याचा अर्थ शिव तिच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत किंवा ती शिवांपेक्षा कनिष्ठ आहे, असा नाही. ते परमेश्वराच्या दोन अभिन्न स्वरूपांतील प्रेममय संवादाचे काव्यात्मक चित्रण आहे. शिव हे निरपेक्ष, निश्चल चैतन्याचे प्रतीक मानले, तर शक्ती ही त्याच चैतन्याची सर्जनशील, गतिशील अभिव्यक्ती आहे. चैतन्य आणि त्याची शक्ती यांना वास्तवात वेगळे करता येत नाही. अग्नी आणि त्याची दाहकतेप्रमाणेच त्यांचे नाते अभिन्न आहे. म्हणूनच, देवीचे शिवांकडे उत्कंठेने जाणे, हे साधकासाठी सुंदर आध्यात्मिक रूपक ठरते. शक्तीची समस्त क्रियाशीलता ज्या परमचैतन्यात अधिष्ठित आहे, त्याच चैतन्याशी तिचे अखंड ऐय आहे. या ऐयाचा प्रेममय अविष्कार म्हणजे, शिव-पार्वती दाम्पत्य.
 
ऐश्वर्य आणि माधुर्य यांचा विलक्षण संगम : या श्लोकातील आणखी एक सुंदर दडलेले रहस्य म्हणजे, परमेश्वरीच्या ठायी अपरिमित ऐश्वर्य असूनही तिच्या प्रेमामध्ये औपचारिकतेचा लवलेश नाही. मानवाल सत्ता, संपत्ती किंवा प्रतिष्ठा मिळाली की, अनेकदा त्याच्या वागण्यात कृत्रिमता येतो. परंतु, जगदंबेचे वर्तन असे नाही. ती विश्वमहाराज्ञी आहे, तरी शिवांच्या स्वागतासाठी उठताना तिला आपल्या सार्वभौम अधिकाराचा विचारही स्पर्श करीत नाही. तिच्या या कृतीतून एक सुंदर मूल्य व्यक्त होते की, श्रेष्ठत्वाची खरी कसोटी आपल्या श्रेष्ठत्वाचे प्रदर्शन करण्यात नसून, प्रेमापुढे त्याचा अहंकार सहज विसरण्यात आहे. अर्थात, हा देवीच्या सहज प्रेमाचा हा आध्यात्मिक भावार्थ आहे. भक्तीच्या भाषेत सांगायचे, तर ऐश्वर्यभाव साधकाला परमेश्वराच्या महानतेची जाणीव करून देतो आणि माधुर्यभाव त्याला परमेश्वराशी आत्मीयतेने जोडतो. या श्लोकात या दोन्ही भावनांचा अप्रतिम समन्वय आहे.
 
‘सौन्दर्यलहरी’तील हा श्लोक साधकाला तीन गोष्टी शिकवतो ः
 
- प्रथम, विश्वातील कोणतेही सामर्थ्य स्वतंत्र आणि निरंकुश नाही. प्रत्येक शक्तीमागे एक व्यापक दैवी अधिष्ठान आहे, याचे भान आवश्यक.
 
- दुसरे म्हणजे, कितीही मोठे ऐश्वर्य लाभले तरी प्रेम, नम्रता आणि आत्मीयतेचे महत्त्व कमी होत नाही. उलट, त्यांच्या अभावी ऐश्वर्यच पूर्ण होत नाही.
 
- तिसरे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, साधनेचे अंतिम प्रयोजन केवळ शक्ती किंवा सिद्धी प्राप्त करणे नसून, त्या शक्तीचे परमचैतन्याशी असलेले अभिन्नत्व अनुभवणे हे आहे.
 
(क्रमश:)
९३७००४३९०१
( लेख वाचून आणि संपादित केला आहे)
लेखक- सुजीत भोगले
 




संबंधित मजकूर