मुंबई (Rampur CRPF Attack) : उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी मोहम्मद शरीफ ऊर्फ सोहेल याची गोळ्या झाडून हत्या केली. २००७ मध्ये रामपूर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्यांपैकी तो एक होता. खजुरिया पोलीस ठाण्यापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. नियमित पोलीस पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून शरीफ घरी परतत असताना काही मिनिटांतच त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
रामपूरचे पोलीस अधीक्षक अनिल सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीफ आपल्या २१ वर्षीय मुलासोबत दुचाकीवरून जात होता. मुलगा दुचाकी चालवत होता, तर शरीफ मागे बसला होता. यावेळी पनवारिया गावाच्या चौकाजवळ दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात शरीफला अनेक गोळ्या लागल्या. त्याला तातडीने बिलासपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या हल्ल्यात त्याचा मुलगा सुखरूप बचावला. चेहरा झाकून आलेले हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Rampur CRPF Attack)
रामपूर येथील सीआरपीएफच्या ग्रुप सेंटरवर ३१ डिसेंबर २००७ च्या रात्री दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी पहाटेपूर्वी छावणीवर हल्ला चढवला होता. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने या हल्ल्याचा कट रचला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे सात जवान आणि एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला होता, तर गोळीबारात अन्य पाच जण जखमी झाले होते. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. (Rampur CRPF Attack)
हल्ल्यानंतर पोलिसांनी शरीफला अटक केली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून त्याचे नाव समोर आले होते. २०१९ मध्ये रामपूर न्यायालयाने शरीफसह अन्य पाच जणांना या प्रकरणात दोषी ठरवले होते. (Rampur CRPF Attack)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक