सशस्त्र नक्षलवादाचा बीमोड झाला. पण, शहरात साळसूदपणे वावरत, जंगलातील सशस्त्र नक्षल्यांना मदत पोहोचवणार्या दिमागी नक्षल्यांची कारस्थानेही मुळापासून उपटून काढणे गरजेचे. कारण, जंगलातील नक्षली हातात शस्त्रे घेतात. मात्र, त्यांना शस्त्रास्त्र चालवण्याचे आदेश देण्यात, हल्ल्याच्या कटकारस्थानामध्ये शहरी नक्षल्यांचा हात असतो, हे अनेकवेळा सिद्ध झाले. त्यामुळेच तर झारखंडमध्ये ६३ भयंकर हिंसक घटनांमध्ये गुन्हेगार असलेला संजय यादव कारवाई टाळण्यासाठी महाराष्ट्राच्या ठाकुर्लीत लपू शकला. परिसरात गायीच्या गोठ्यात गवळीकाम करत सुरक्षित राहिला. मात्र, महाराष्ट्र ‘एटीएस’पुढे त्याची डाळ शिजली नाही आणि त्याला नुकतीच अटक झाली.
हा संजय यादव ‘सीपीआय’ (माओवादी) या प्रतिबंधित नक्षलवादी संघटनेच्या ‘झोनल कमिटी’चा सक्रिय सदस्य आणि ‘झोनल कमांडर.’ त्याला पकडण्यासाठी झारखंड सरकारने दहा लाखांचे इनाम जाहीर केले असून, २०१९ साली त्याने भाजप कार्यालयाला बॉम्बने उडवण्याचा प्रयत्न केला होता. तो देशविघातक आणि नक्षली कारवायांमध्ये सक्रिय असल्याने, त्याच्याविरुद्ध ‘यूएपीए’अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. झारखंडमध्ये आणि बिहारमधील एकूण ६३ गुन्ह्यांमध्ये सामील असलेला हा नक्षली गेल्या दीड वर्षांपासून फरार होता. झारखंडमध्ये त्याच्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी तो महाराष्ट्रातील ठाकुर्ली परिसरात लपून होता. कुणाला संशय येऊ नये म्हणून गोठ्यात गवळीकाम करत होता. गायीचे दूध काढणे, गुरांना चारा-पाणी देणे ते गोठा स्वच्छ करणे, अशी कामे करत होता. अर्थातच, हा सगळा देखावा होता. याआड परिसरातले ‘नक्षली नेटवर्क’ बांधण्याचा त्याचा प्रयत्न असेल का? याबाबत गोठ्याच्या मालकाची पोलिसांनी कसून चौकशीही केली.
अनोळखी ठिकाणी सुरक्षित राहण्यासाठी या नक्षलीला मदत करणारे कुणीतरी असणारच. त्याला ठाकुर्लीमध्ये बनावट आधारकार्ड बनवून देणारे कोण असतील? तो नव्या शहरात स्थिरावण्यासाठी त्याला कोण पाठबळ देत होते? यामागच्या शहरी नक्षलवाद्यांना-दिमागी नक्षल्यांना शोधून त्यांचा बीमोड करणे गरजेचेच. नक्षलवाद संपवायलाच हवा!
काळ बिकट आहे...
भाजी काय केली,’ असे म्हणून तिचा पती सारखा तिच्याशी वाद घालायचा. त्यावरून त्यांची सातत्याने भांडणे व्हायची. जेवायला बसले की, हा वाद सुरू व्हायचा. कालपरवा असाच वाद सुरू होता. मग काय, संतप्त पत्नीने सरळ स्वयंपाकघरातील चाकू उचलला आणि पतीच्या छातीतच खुपसला. पती जागीच गतप्राण झाला. ही घटना अहमदाबादची. दुसरी याच दिवसाची घटना कल्याणची. गुलशनचा पती गुलशनकडून पैसे मागत होता. तिने नकार देताच, त्याने उकळत्या मटणाच्या रश्शाचे पातेले तिच्या अंगावर ओतले. त्यात तिच्यासह दोघांचा पाच वर्षांचा मुलगाही होरपळला, भाजला. सगळ्याच नात्यात आणि मैत्रीमध्येही क्षुल्लक कारणाने राग-संताप अनावर होऊन जीव घेण्यापर्यंतच्या घटना घडत आहेत. हिंसा माणसाला नवी नाही. मात्र, आजकाल हिंसेचा इतका अतिरेक का व्हावा?
जगभरात हेच सुरू आहे. जरा काही मनाविरुद्ध झाले की, लगेच दुसर्याचा जीव घेण्यापर्यंत मजल जाते. अर्थात, राग ओसरल्यावर केलेल्या कृत्याच्या परिणामाची भीतीही वाटतेच. कायद्याने शिक्षा होईल किंवा लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? याची भीतीही वाटतेच. पण, गुन्हा हातून घडल्यावर नंतर पश्चात्ताप करण्यात काहीच फायदा उरत नाही. सततचा ताणतणाव, भौतिक हव्यास आणि निरर्थक पाहिलेली खोटी स्वप्ने, खरेतर ती पूर्ण होणारी नसतातच. ही स्वप्ने पूर्ण होत नाहीत म्हणून मग निराशा. ही निराशा केवळ निराशा नसते, तर त्यात ज्याने कष्टाने यश मिळवले, त्याच्याबद्दल हिंसक असूयाही असते, द्वेष असतो, मत्सर असतो. ‘मला मिळाले नाही आणि त्याला मिळते,’ या विचाराने मनःस्थिती सैरभैर झालेली असते. हे सगळे मानसिक विकृतीमध्ये बदलते आणि व्यक्ती गुन्हेगारीची पायरी गाठतो. भौतिक प्रगती आणि त्यासाठी सुखाची लालसा, महत्त्वाकांक्षा आवश्यक आहे. मात्र, त्याआड माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा मरत चालली आहे. ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ हे किंवा ‘तुम्हीच तुमच्या भाग्याचे विधाते आहात’, ‘मनावर विजय मिळवा, जगावर विजय मिळवाल,’ हे सत्य साधुसंत सांगून गेलेत, यावर प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आली आहे, अन्यथा, काळ बिकट आहे.
९५९४९६९६३८