पश्चिम घाटामधील संशोधन, अध्यापन आणि पर्यावरणविषयक धोरणांमधील कार्यातून निसर्गसंवर्धनाची एक वेगळी दिशा अधोरेखित करणारे डॉ. अंकूर पटवर्धन यांच्याविषयी...
निसर्गातील प्रत्येक घटकाचे स्वतंत्र महत्त्व असते. एखादी वनस्पती, तिच्यावर अवलंबून असणारे कीटक किंवा त्या वनस्पतीला आश्रय देणारी परिसंस्था यांच्यातील परस्परसंबंध समजून घेणे म्हणजे, जैवविविधतेचा अभ्यास. या परस्परसंबंधांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून वेध घेत पश्चिम घाटातील समृद्ध वनस्पतिसंपदेच्या संवर्धनासाठी सातत्याने संशोधन करणारे नाव म्हणजे, डॉ. अंकूर अरुण पटवर्धन. संशोधन, अध्यापन, पर्यावरणीय धोरणे आणि लोकसहभागातून संवर्धन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेषतः दुर्मीळ औषधी वनस्पती, देवराया आणि फुलपाखरांच्या परिसंस्थेतील भूमिकेवर त्यांनी केलेले संशोधन उल्लेखनीय आहे.
डॉ. पटवर्धन यांनी पुण्यातील एस. पी. महाविद्यालयातून ‘वनस्पतिशास्त्र’ विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून ‘पर्यावरणशास्त्र’ विषयात पदव्युत्तर शिक्षण आणि ‘पीएचडी’ पूर्ण केली. २००३ मध्ये आबासाहेब गरवारे महाविद्यालयात ‘व्याख्याता’ म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे सहयोगी प्राध्यापक आणि जैवविविधता विभागप्रमुख म्हणून २००९ ते एप्रिल २०२५ पर्यंत त्यांनी काम पाहिले. २०१५ ते २०१९ याकाळात महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि विनाअनुदानित विभागाचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. २००१ पासून ‘रानवा’ (RANWA) या पर्यावरणविषयक संस्थेचे मानद सचिव आणि संशोधन प्रकल्प समन्वयक म्हणून ते कार्यरत आहेत.
जगातील महत्त्वाच्या जैवविविधता ‘हॉटस्पॉट्स’पैकी एक असलेल्या ‘पश्चिम घाटातील वनस्पतिसंपदेचा अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय. या प्रदेशातील संकटग्रस्त वनस्पतींचे वितरण, लोकसंख्येची स्थिती, नैसर्गिक अधिवास आणि संवर्धनाच्या शक्यता यांचा त्यांनी अभ्यास केला आहे. वावडिंग, सीतेचा अशोक आणि नरक्या यांसारख्या औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी त्यांनी संशोधन केले आहे. विशेषतः सप्तरंगी आणि नरक्या लागवडीसाठी आणि रोपवाटिका तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. सह्याद्री-कोकण जैविक मार्गिकेतील सीतेच्या अशोक वृक्षाचे वितरण आणि लोकसंख्येच्या स्थितीवरील त्यांचे संशोधन २०१६ मध्ये ‘करंट सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. वनस्पतिसंपदेचे ‘मॅपिंग’ आणि ‘जीआयएस’-रिमोट सेन्सिंग’च्या साहाय्याने संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण क्षेत्रांची ओळख पटवण्याचे कामही त्यांनी केले. देवराया म्हणजे, स्थानिक समाजाने श्रद्धेतून जपलेली नैसर्गिक वनक्षेत्रे. डॉ. पटवर्धन यांनी उत्तर पश्चिम घाटातील देवरायांचा पर्यावरणीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अभ्यास केला. पुणे जिल्ह्यातील आजीवळी देवराईच्या संवर्धनावरही त्यांनी काम केले. २०१२ ते २०१७ या कालावधीत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या सहकार्याने राबवलेल्या देवराईंच्या परिसंस्था सेवा मूल्यांकन प्रकल्पात त्यांचा सहभाग होता. देवरायांचे सांस्कृतिक महत्त्व आणि जैवविविधता संरक्षणातील त्यांची भूमिका यावर २०२१ मध्ये त्यांचा संशोधन लेख आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला.
फुलपाखरे आणि इतर कीटक परागीभवनाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. या प्रक्रियेचा अभ्यास करताना फुलपाखरांना आकर्षित करणारे नैसर्गिक घटक विकसित करण्यावर डॉ. पटवर्धन यांनी संशोधन केले. या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी मे २०१९ मध्ये त्यांना नेदरलॅण्ड्सस्थित ‘एल्सेव्हिअर फाउंडेशन’ आणि ‘आयएससी-थ्री’ यांच्याकडून ‘ग्रीन अॅण्ड सस्टेनेबल केमिस्ट्री चॅलेंज अवॉर्ड’ प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. याशिवाय, पश्चिम घाटातील वनस्पतींची फुलांची वैशिष्ट्ये, मधुरस आणि परागीभवन करणार्या कीटकांचा अभ्यासही त्यांच्या संशोधनाचा भाग आहे.
संशोधनाबरोबरच पर्यावरणविषयक निर्णयप्रक्रियेतही त्यांनी योगदान दिले आहे. २०१७ ते २०२० या कालावधीत ते महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य होते. २०२३ ते २०२६ या कालावधीत महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळावर सदस्य म्हणून त्यांनी काम केले. महाबळेश्वर-पाचगणी पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या उच्चस्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष म्हणून २०१७ ते २०२१ दरम्यान त्यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच केंद्रीय कॅम्पा प्राधिकरणाच्या सनियंत्रण गटाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ‘आययूसीएन’च्या 'Western Ghats Plant Specialist Group'चे सदस्य म्हणून त्यांचे योगदान राहिले आहे.
औद्योगिक आणि विकास प्रकल्पांचे पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (EIA), जैवविविधता व्यवस्थापन आराखडे आणि कार्बन साठवण क्षमतेचे मूल्यांकन अशा क्षेत्रांतही त्यांनी काम केले आहे. डॉ. पटवर्धन यांचे ४६ निवडक संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार संशोधक विद्यार्थ्यांनी ‘पीएचडी’ प्राप्त केली. २०२५-२६ मध्ये त्यांनी ‘इकोरिव्हायव्हा नेचर फाऊंडेशन’ या पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणार्या संस्थेची स्थापना केली, व ते संचालक म्हणूनही काम पाहत आहेत.निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व समजून घेऊन त्याच्या संरक्षणासाठी विज्ञानाचा उपयोग करणे, हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख. त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!