मुंबई (Dattatreya Hosabale Statement) : समाजात फूट पाडण्याचा आणि परस्परांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींपासून समाजाने सावध राहिले पाहिजे. सामाजिक समरसता, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वावलंबन यांना प्राधान्य देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
वृंदावन येथील केशवधाममध्ये आयोजित अन्नकूट प्रसादम् आणि गिरिराज पूजन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी सभागृहात उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांशी संवाद साधताना शिक्षण, सामाजिक समरसता आणि समाजातील एकात्मतेचे महत्त्व विशद केले. (Dattatreya Hosabale Statement)
केशवधाममध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाजात अर्थपूर्ण योगदान द्यावे आणि राष्ट्राच्या प्रगतीत सकारात्मक भूमिका बजावावी, असे आवाहन होसबाळे यांनी केले. सध्याच्या काळात सामाजिक समरसतेची आवश्यकता अधोरेखित करताना ते म्हणाले की, समाजात फूट पाडून परस्परांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींबाबत समाजाने सतर्क राहिले पाहिजे. अशा विघातक प्रवृत्तींना रोखण्यासाठी आणि समाजातील एकात्मता अधिक मजबूत करण्यासाठी सकारात्मक व संघटित सामाजिक शक्ती उभी राहणे आवश्यक आहे. (Dattatreya Hosabale Statement)
आज जगभरात अस्वस्थतेचे वातावरण असताना भारताने आपल्या जीवनपद्धतीतून आदर्श निर्माण करून संपूर्ण मानवतेला दिशा दाखविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. भारत आपल्या आचरणातून आणि कृतीतून या मूल्यांचे दर्शन घडवेल, तेव्हाच संपूर्ण जगाला योग्य दिशा दाखवू शकेल, असेही त्यांनी सांगितले. (Dattatreya Hosabale Statement)
भारताला ‘विश्वगुरू’ बनविण्याच्या संकल्पनेविषयी बोलताना होसबाळे म्हणाले की, कोणतीही आंतरराष्ट्रीय संघटना भारताला विश्वगुरू ही पदवी बहाल करणार नाही. तर भारतीय नागरिकांचे आचरण, व्यवहार आणि त्यांचे आदर्श जीवन यांमधून भारताला हा सन्मान प्राप्त होईल. हिंदू समाजाने स्वावलंबी बनले पाहिजे, समाजातील दुर्बल घटकांना आधार दिला पाहिजे, संघटित राहिले पाहिजे आणि समाजात फूट पाडण्याच्या प्रयत्नांबाबत सदैव सजग राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. (Dattatreya Hosabale Statement)
सभागृहातील मुख्य कार्यक्रमानंतर होसबाळे यांनी केशवधाम परिसरात गोवर्धन महाराजांचे (गिरिराजजी) पारंपरिक पूजन केले. शेणापासून तयार करण्यात आलेल्या गोवर्धन महाराजांच्या मूर्तीचे वैदिक मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींनुसार पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. (Dattatreya Hosabale Statement)