मुंबई (Yamuna Cruise Service): शहराच्या गजबजाटापासून काही क्षण दूर, वाहत्या नदीच्या सान्निध्यात शांतपणे वेळ घालवण्याची संधी आता दिल्लीकरांना मिळणार आहे. दिल्लीची ओळख, इतिहास आणि संस्कृती ज्या यमुना नदीशी जोडली गेली आहे, त्याच यमुनेच्या पात्रातून आता पर्यटनाची एक नवी सफर सुरू झाली आहे. सोनिया विहार ते जगतपूर या नदीपट्ट्यात सुरू झालेली मनोरंजनात्मक क्रूझ सेवा दिल्लीच्या पर्यटनाला नवे आकर्षण देण्याबरोबरच नागरिकांना आपल्या नदीशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न ठरणार आहे.
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते दि १० नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या उपस्थितीत या पहिल्या मनोरंजनात्मक यमुना क्रूझ सेवेचे उद्घाटन झाले. ३० प्रवासी क्षमतेच्या इलेक्ट्रिक क्रूझमधून सुमारे सहा किलोमीटरच्या ये-जा प्रवासाचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे, या सफरीत केवळ नदीचे सौंदर्य अनुभवता येणार नाही, तर यमुनेशी जोडलेला सांस्कृतिक आणि पौराणिक वारसाही नव्या पद्धतीने समोर येणार आहे. (Yamuna Cruise Service)
यमुना ही दिल्लीसाठी केवळ एक नदी नाही, तर शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. मात्र, शहरीकरणाच्या वाढत्या वेगात नदी आणि नागरिक यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर क्रूझ सेवा सुरू करण्याचा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. नदीच्या पात्रातून होणारा प्रवास नागरिकांना शहराकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देईल. (Yamuna Cruise Service)
यमुनेचा इतिहास, श्रीकृष्णाची लीला!
या पर्यटनस्थळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यमुनेचा पौराणिक आणि आध्यात्मिक वारसा उलगडणारा म्युझिकल फाउंटन आणि प्रकाश-ध्वनी कार्यक्रम. सूर्यदेव, यम आणि श्रीकृष्णाच्या दिव्य लीलांशी जोडलेल्या यमुनेच्या कथांचा यातून परिचय करून दिला जाणार आहे. विशेषतः श्रीकृष्णाच्या कालियामर्दनाची कथा प्रकाश आणि ध्वनीच्या माध्यमातून सादर केली जाणार आहे. (Yamuna Cruise Service)
याशिवाय खाद्यपदार्थांसाठी फूड कोर्ट, खरेदीसाठी स्वतंत्र क्षेत्र, मुलांसाठी खेळण्याची जागा आणि स्केटिंग व रॉक क्लाइंबिंगसारख्या साहसी खेळांची सुविधाही विकसित करण्यात आली आहे. फ्लोटिंग जेट्टी, तिकीट काउंटर, ऑनलाइन बुकिंग, प्रतीक्षागृह आणि स्वच्छतागृहांमुळे पर्यटकांचा अनुभव अधिक सोयीस्कर करण्याचा प्रयत्न आहे. (Yamuna Cruise Service)
पर्यावरणपूरक पर्यटनाला प्राधान्य
या क्रूझसाठी ३० आसनी इलेक्ट्रिक बोटीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे नदी पर्यटनाला चालना देतानाच स्वच्छ आणि पर्यावरणपूरक जलवाहतुकीचा पर्यायही पुढे येत आहे. राष्ट्रीय जलमार्ग कायदा, २०१६ अंतर्गत यमुनेला राष्ट्रीय जलमार्ग-११० म्हणून घोषित करण्यात आले आहे. या जलमार्गाचा मनोरंजनात्मक नौकानयन आणि पर्यटनासाठी उपयोग करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे. यमुना क्रूझ प्रकल्प हा केवळ पर्यटनाचा उपक्रम नसून नदीकाठाचा परिसर नागरिकांसाठी आकर्षक सार्वजनिक ठिकाण बनविण्याच्या व्यापक संकल्पनेचा भाग आहे. (Yamuna Cruise Service)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.