विवेक हरवलेले स्वातंत्र्य!

    11-Nov-2026
 
Religious Extremism in Bangladesh
 
राष्ट्राची उभारणी केवळ भौगोलिक सीमांच्याच आधारे होत नसते. त्या राष्ट्रातील समाज कोणती जीवनमूल्ये स्वीकारतो, व्यक्तीच्या स्वातंत्र्याला किती महत्त्व देतो आणि विवेकाला किती स्वतंत्र स्थान देतो, यावरच त्याचे राष्ट्रीय जीवन निश्चित होते. धर्म ही व्यक्तीची श्रद्धा असू शकते; परंतु जर धर्माच्या बुरख्याआड धर्मांधताच संपूर्ण समाजाच्या बुद्धीवर अधिराज्य गाजवू लागली, तर राष्ट्राच्या शासन व्यवस्थेचा पायाच दुर्बल होतो. बांगलादेशात अलीकडे घडणार्‍या घडामोडी, बांगलादेशातील दुर्बल शासन व्यवस्थेकडेच अंगुलीनिर्देश करतात.
 
याचे ताजे उदाहरण म्हणजे, बांगलादेशातील खुलना रेल्वे स्थानकात घडलेली धर्मांधतेची साक्ष देणारी घटना. ‘नोबेल’ पुरस्कारविजेते आणि प्रसिद्ध साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्रावर धर्मांधाकडून शाई फासण्यात आली. त्यांच्या चित्राच्या बाजूला आक्षेपार्ह पोस्टर्सही लावण्यात आली. त्यामध्ये, ‘बांगलादेशात मुस्लीम आणि बांगलादेशविरोधी टागोरांना स्थान नाही; भारताचा गौरव अमान्य आहे,’ असा आशय व्यक्त करण्यात आला. याच भिंतीवर फकीर लालन शाह, काझी नजरूल इस्लाम आणि एस. एम. सुलतान यांचीही चित्रे होती. मात्र, लक्ष्य केवळ टागोरच ठरले! ही घटना बांगलादेशच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेवरील आघातच आहे. कारण, रवींद्रनाथ टागोर जरी भारतीय असले, तरी बांगलादेशचे राष्ट्रगीत हे त्यांचेच काव्य. १९७१च्या बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धात रवींद्रनाथ टागोरांची गाणीच आंदोलकांची शक्ती होती. मात्र, आजच्या धर्मांध बांगलादेशला याचा विसर पडला आहे. १९७१ मध्ये स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीमागे भाषिक अस्मिता, सांस्कृतिक स्वातंत्र्य आणि राजकीय समानतेची आकांक्षा होती. पाकिस्तानच्या धार्मिक राष्ट्रवादाने बंगाली जनतेवर केलेली भाषिक आणि राजकीय दडपशाही, या संघर्षाचे प्रमुख कारण. ज्या पाकिस्तानविरुद्ध संघर्ष करून स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले, त्याच पाकिस्तानशी पुन्हा जवळीक साधण्याची प्रवृत्तीच, सांप्रत धर्मांधतेचा मूलाधार आहे.
 
शेख हसीना यांच्या सत्ताकाळात वस्त्रोद्योग, निर्यात, वीजपुरवठा, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास क्षेत्रात बांगलादेशने प्रगती केली. २००९ मध्ये पाच टक्के असलेला ‘जीडीपी’ वाढीचा दर, २०१९ मध्ये जवळपास आठ टक्क्यांच्या आसपास पोहोचला. ‘कोविड’ काळात तीन टक्क्यांवर घसरलेला ‘जीडीपी’, शेख हसीना यांनी ७.५ टक्क्यांपर्यंत सावरला. यात अनेक घरात सुबत्ता आली, अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला.
 
मात्र, धर्मांधांनी तथाकथित क्रांतीच्या नावाखाली त्यांचे सरकार पाडल्यावर, ऑगस्ट २०२४ मध्ये मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. याच काळात धर्मांध गटांचा प्रभाव, हिंदूंवरील हल्ले आणि त्यांच्या सांस्कृतिक स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या घटना वाढल्या. महागाई, मंदावलेली गुंतवणूक आणि रोजगारातील अनिश्चिततेमुळे अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने वाढली. मात्र, युनूस यांनी हिंदू आणि भारतद्वेष्टी भूमिका सोडली नाही. यामुळेच फेब्रुवारी २०२६ मध्ये, तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर आले. धार्मिक सलोखा आणि सर्व नागरिकांच्या समान अधिकारांची आश्वासने त्यांनी खुलेपणाने दिली.मात्र, धर्मांधतेविरुद्धच्या आणाभाका प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यात, हेे सरकारही अपयशी ठरल्याचे टागोरांच्या प्रसंगावरून स्पष्ट होते.
 
गंभीर म्हणजे, बांगलादेशातील वाढता भारतद्वेष! पाकिस्तान आणि चीनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न रहमान सरकार करताना, होणारा भारतविरोध बांगलादेशच्या हिताचा नाही. पाकिस्तानशी धार्मिक जवळीक वाढवून, बांगलादेशला लाभ होणार नाही. मुस्लीम उम्माच्या एकात्मतेच्या नावाखाली पाकिस्तानशी जवळीक साधल्याने, बांगलादेशी नागरिकांचे कोणते प्रश्न सुटणार आहेत? भारतद्वेषाने रोजगार निर्माण होत नाहीत किंवा गरिबीही दूर होत नाही, हे रेहमान सरकारने ध्यानात घ्यायला हवे. राष्ट्राचे भवितव्य शिक्षण, विज्ञान, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायाने निश्चित होते. टागोरांच्या चित्रावरील शाई उद्या पुसता येईल; परंतु समाजाच्या विवेकावर चढलेला धर्मांधतेचा थर पुसण्यासाठी वैचारिक परिवर्तनच आवश्यक आहे. अन्यथा, बांगलादेशचे राजकीय स्वातंत्र्य टिकेल; पण त्या स्वातंत्र्यामागील मूल्यांचे काय? हा प्रश्न अनुत्तरितच राहील.
 
लेखक- कौस्तुभ वीरकर




संबंधित मजकूर