‘हर भक्त श्रीराम तक'; रामलल्लांच्या दर्शनासाठी दृष्टिबाधितांकरीता स्वतंत्र दर्शनमार्ग

    11-Nov-2026   

Ram Temple Accessibility for Visually Impaired 
 
मुंबई (Ram Temple Accessibility for Visually Impaired) : अयोध्येतील भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिरात दृष्टिबाधित भाविकांना सुलभ, सुरक्षित आणि स्वतंत्रपणे दर्शन घेता यावे, यासाठी एका अनोख्या मानवतावादी उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. ‘हर भक्त श्रीराम तक’ या विशेष प्रकल्पांतर्गत दीपोत्सवाच्या पावन पर्वावर मंदिर परिसरात ८०० मीटर लांबीच्या स्पर्शसंवेदनशील (टॅक्टाइल) आणि ब्रेल लिपीची सुविधा असलेल्या विशेष मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. या मार्गामुळे दृष्टिबाधित भाविकांना मंदिर परिसरातील रस्त्यांची ओळख पटवणे आणि कोणाच्याही मदतीशिवाय आपल्या आराध्य रामलल्लांचे दर्शन घेणे शक्य होणार आहे.
 
लोकसहभागाच्या अनोख्या डिजिटल प्रारूपातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात आला आहे. ‘हर भक्त श्रीराम तक’ या अभियानांतर्गत देशभरातील भाविकांना एका डिजिटल मंचावर ‘राम’ नाम लिहिण्याचे आवाहन करण्यात आले होते. या अभियानात ३.४५ लाखांहून अधिक नागरिकांनी सहभागी होत डिजिटल माध्यमातून आपले योगदान दिले. त्यांच्या सहभागातून मंदिरात आधुनिक ब्रेल आणि स्पर्शसंवेदनशील मार्गाची निर्मिती करणे शक्य झाले.(Ram Temple Accessibility for Visually Impaired)
 
या सुलभ दर्शन मार्गाच्या उद्घाटनानिमित्त पवित्र सरयू नदीच्या तीरावर विशेष दीपदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दीड लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. या पवित्र प्रसंगी आयटीसीचे विभागीय मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित डोगरा म्हणाले की, श्रद्धा आणि भक्तीचा अनुभव समाजातील प्रत्येक व्यक्तीला सहज आणि सुलभपणे घेता आला पाहिजे. हा प्रकल्प रामनगरीत दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वतंत्रपणे दर्शन व पूजाअर्चा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल.(Ram Temple Accessibility for Visually Impaired)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर