सध्या देशात दीपावली पर्व मोठ्या उत्साहात सुरु आहे. नकारात्मकतेवर सकारात्मकतेने विजय मिळवण्याचे हे दिवस. या दिवाळीमधील धनत्रयोदशी म्हणजे भगवान धन्वंतरी यांचा प्रकट दिन. आयुर्वेदाचे देणं त्यांनी विश्वाला दिले. या आयुर्वेदाने सुखी आणि स्वास्थ्य आरोग्याची व्याख्या केली असून, त्याचे मार्गही सांगितले आहेत. याचा दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणारा हा लेख...
सणांची राज्ञी-दिवाळी ही भारतभर व जिथे जिथे भारतीयांचे वास्तव्य आहे, अशा सर्व देशांमध्ये उत्साहात साजरी केली जाते. वसुबारसेपासून भाऊबीजेपर्यंत, प्रत्येक तिथीला एक वेगवेगळे महत्त्व आहे. प्रत्येक तिथी विविध नात्यांचा आनंदोत्सव आहे. गोमाता, लक्ष्मी (देवी-देवता), नवान्न (शेतात आलेले नवीन पीक), असुराचे दमन (आपल्यातील व सभोवतालातील नकारात्मक कृती व विचारांवर मात), एकोपा, समृद्धी, समाधान, आनंद, आरोग्यप्राप्ती इ. संदेशच ही सणांची राज्ञी घेऊन येते.
दिवाळी जसजशी जवळ येते, घर, परिसरात आपल्याला सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते. प्रत्येक व्यक्ती काही ना काही ‘अपग्रेड’ करण्याची धडपड करू लागते. घरातील स्वच्छता, नवीन व्हेन्चर, नवीन खरेदी, प्रवास, मिष्टान्न, भेटी-गाठी, नात्यांचे पुनरुज्जीवन, या सगळ्यांसाठीची खरेदी इ. या सगळ्यात, एक सकारात्मक ऊर्जा सामावलेली आहे. काहीतरी शुभ सुरू होतंय, ही जाणीवच सर्व भरतीयांच्या मनात या काळात जागृत होते. यात केवळ एक समाजच नव्हे, तर सर्वच भारतीय उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.
रुसवे-फुगवे, आजार आणि दुःख मागे लोटून, एकत्र येऊन सण साजरा करण्यात असलेला आनंद आणि समाधान वेगळेच असतेे.
भारताच्या विविध राज्यांत, दिवाळीच्या विविध तिथी भिन्न भिन्न पद्धतीने साजर्या केल्या जातात. पोशाख, फराळ, पूजन इ.मध्येही विविधता आहे. या विविधतेमध्येदेखील एकप्रकारची एकता आहे, एकोपा आहे. ही सुखाची चाहूलच प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचते. आबालवृद्ध प्रत्येकजण, यामध्ये आपल्या क्षमतेनुसार उत्सहाने सहभागी होत असतात. सांगीतिक कार्यक्रम, सामूहिक समारंभ, प्रदर्शनांमधून, कलात्मकताही पुढे येते. या सर्व गोष्टी आपल्याला आनंददायी तर ठरतातच, पण त्याचबरोबर क्रियाशीलतेकडेही नेतात. कारण, कुठल्याही प्रकारच्या कलात्मक नवनिर्मितीसाठी, मनाची सकारात्मकता खूप गरजेची असते. समूहाची सकारात्मकता ही तर अधिकच ऊर्जादायी ठरते. म्हणजे, या एकत्रीकरणामुळे प्रत्येक व्यक्तीची ऊर्जा ही ‘पॉझिटिव्ह अपग्रडेशेन’च्या दिशेने वाटचाल सुरू करते, असे म्हणणे चुकीचे ठरू नये.
दिवाळीतील एक तिथी धनत्रयोदशी. याच दिवशी धन्वंतरी जयंती असते. आयुर्वेदशास्त्राचे जनक म्हणजे भगवान धन्वंतरी. समुद्रमंथनसमयी समुद्रातून भगवान धन्वंतरी प्रकट झाले. यांच्या एका हातात अमृतकलश आणि एका हातात जळू आहे. चतुर्भुज धन्वंतरी हे विष्णू अवतार आहेत. त्यांच्या इतर दोन हातांमध्ये शंख आणि चक्र आहे. अशा भगवान धन्वंतरीचे आगमन, भारतीय वैद्यकशास्त्रात खूपच महत्त्वाचे मानले जाते. याच दिवशी धन्वंतरीपूजन, धन्वंतरी याग व आरोग्य व्याख्याने, धन्वंतरी पुरस्कार सारख्या कार्यक्रमांचे आयाजन होते. आयुर्वेद हे केवळ रुग्णांचे आजार बरे करण्याइतपतच मर्यादित असलेले शास्त्र नाही, तर स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य टिकविणे, हेदेखील आयुर्वेदाचे ब्रीद आहे. स्वास्थ्य म्हणताना केवळ शारीरिक स्वास्थ्यच आयुर्वेदाला अपेक्षित नसून,
"समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रियाः|
प्रसन्नात्मेन्द्रियमनः स्वस्थ इत्यभिधीयते॥”
‘सम’ म्हणजे संतुलित, ‘स्वस्थ व्यक्ती’ म्हणजे केवळ रोगाची अनुपस्थिती नव्हे, तर शरीरातील सर्व घटक (दोष, अग्नी, धातु, मलाची क्रिया म्हणजे चर्या इ.) सुस्थितीत कार्यरत असणे आणि आत्मा-इंद्रिय (ज्ञानेन्द्रिय व कर्मेन्द्रिय) प्रसन्न असणे. ‘स्वस्थ’ म्हणजे ‘स्व’ + ‘स्थ’ याचा शब्दशः अर्थ बघितल्यास स्वतःमध्ये नैसर्गिकरीत्या स्थिर असणे, असा होतो. शारीरिक कार्य सुरळीत कार्यरत असणे, मानसिक आणि आध्यात्मिक प्रसन्नता प्राप्त होणे आणि टिकणे, हेच पूर्णपणे शांत, समाधानी आणि प्रसन्नतेचे द्योतक आहे. असे स्वास्थ्य प्रत्येकाला लाभो, हीच प्रार्थना धन्वंतरींच्या चरणी दररोज आणि धन्वंतरी जयंती अर्थात धनत्रयोदशीच्या दिवशी विशेषत्वाने करावी.
आरोग्याची जी व्याख्या जागतिक आरोग्य संघटना म्हणजे ‘डब्ल्यूएचओ’ने केली आहे, त्यानुसार ‘आरोग्य म्हणजे केवळ आजार किंवा अशक्तपणा (दुर्बलता) यांचा अभाव नसून, संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यची उत्तम स्थिती होय.’ ही व्याख्याच स्वास्थ्याच्या व्याख्येशी मिळती-जुळती आहे. सुस्थिती, स्वस्थितीची सजगपणे स्वीकृती आणि काही त्रुटी/गुण-दोष ओळखल्यास, त्यावर मात करण्याचा प्रयत्न करण्यालाच ‘पॉझिटिव्ह अपग्रेशन’ म्हणावे.
अशी सुस्थिती टिकवण्यासाठी ‘दिनचर्या’ आणि ‘ऋतुचर्या’ या दोन संकल्पना, आयुर्वेदात विस्तृतपणे वर्णिलेल्या आहेत. सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या नित्यचर्या काय असाव्यात, त्यांचा क्रम काय असावा, ते तसे केल्यास त्याचे फायदे आणि न केल्यास तोटे याबद्दलचे सविस्तर वर्णनाही त्यात सांगितले आहे. ऋतुचर्येमध्येदेखील भारतीय (विस्तृत भारत) हवामान आणि ऋतूंचा विचार करून, प्रत्येक ऋतूमध्ये सभोवतालच्या हवामानातील बदल ओळखून, जाणून, त्याचा शरीरातील विविध घटकांच्या समतोलावर होणारा परिणाम आणि उत्पन्न होणार्या बदलांचे विस्तृत वर्णन करण्यात आले आहे. ऋतूनुरूप आपला पेहराव, व्यायाम, आहार आणि दैनंदिन जीवन यांमधील अपेक्षित बदलाबद्दलही त्यात सांगितले आहे. जर याचे काटेकोर पालन केले, तर शरीरातील विविध घटकांमधील संतुलन अबाधित राखणे सोपे होते. म्हणजेच स्वास्थ्य टिकते. याविपरीत (उलट) जर ऋतुचर्या-दिनचर्या जर न पाळता, स्वैराचार केला, तर विविध ‘एनसीडी’ज (नॉन-कम्युनिकेशन डिसिजेस) आणि काही संक्रामक रोगही उत्पन्न होऊन पसरण्यास वेळ लागत नाही.
त्यामुळे आरोग्याची गुरुकिल्ली ही प्रत्येक व्यक्तीच्या हातातच असते. स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतःकडेच बहुतांशी प्रमाणात असते. चिकित्सा-औषधोपचार हा विचार तात्पुरता समतोल प्रस्थापित करता येईपर्यंतच असावा. ‘लाईफलाँग मेडिकेशन’ ही उपचारपद्धतीच नसावी. आरोग्य मिळविणे आणि टिकविणे यांसाठी झटणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या दिवाळीच्या पर्वात आपण सर्वांनी स्वतःचे स्वास्थ्य राखण्याचे प्रयत्न करण्याचा संकल्प करूया. ’निरोगी-स्वस्थ भारता’ची सुरुवात आपण स्वतःपासूनच करू! ही दिवाळी आपल्या सर्वांना सुख-समृद्धीची, आनंदाची आणि आरोग्यपूर्ण जावो, ही धन्वंतरींच्या चरणी प्रार्थना! शुभ दीपावली!
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९