गोवर्धन पूजेतून मणिपूरमध्ये जपला जातोय अनोखा सांस्कृतिक वारसा!

    11-Nov-2026   
 
 
Govardhan Puja in Manipur
 
मुंबई (Govardhan Puja in Manipur) : भक्तिभाव, परंपरा आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेची भावना अशा वातावरणात १० नोव्हेंबर रोजी मणिपूरमध्ये ठिकठिकाणी गोवर्धन पूजा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सेवाभारती मणिपूरच्या वतीने इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील हराओरौ येथील राजर्षी भाग्यचंद्र कौशल्य विकास केंद्रात दहाव्या वार्षिक गोवर्धन पूजा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
 
गोवर्धन पूजेने या सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर विविध भक्तिपर कार्यक्रम आणि मणिपूरमधील पारंपरिक कथाकथनाची कला असलेल्या ‘वारी लिबा’चे सादरीकरण करण्यात आले. वेयेनबाम चिंगलेन आणि प्रफुल्लो यांनी गोवर्धन पूजेशी संबंधित कथा पारंपरिक शैलीत सादर केल्या. या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांसह सुमारे ३०० जण उपस्थित होते. पारंपरिक मणिपुरी पद्धतीच्या प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.  (Govardhan Puja in Manipur)
 
केवळ सेवाभारतीच्या आयोजित कार्यक्रमापुरताच हा उत्सव मर्यादित नव्हता, तर मणिपूरमधील अनेक भागांतही गोवर्धन पूजा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक कुटुंबांनी, विशेषतः लहान मुलांनी माती, गवत आणि पानांचा वापर करून गोवर्धन पर्वताच्या छोट्या प्रतिकृती तयार केल्या. त्यांना फुले, दिवे तसेच गायी आणि वासरांच्या छोट्या मूर्तींनी सजविण्यात आले. यावेळी मातीपासून नंदीची प्रतिकृती तयार करून ती या गोवर्धन पर्वताच्या प्रतिकृतीसमोर ठेवण्यात आली. भाविकांनी तिची विधिवत पूजा केली.  (Govardhan Puja in Manipur)
 
पूजेनंतर नंदीची प्रतिकृती लैनिंगथौ सनामही यांच्या समोर नेऊन ठेवण्यात आली. तेथे पुन्हा प्रार्थना आणि पूजाविधी करण्यात आले. मणिपूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत खोलवर रुजलेली ही अनोखी प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. राज्यातील विविध धार्मिक श्रद्धा आणि स्थानिक परंपरांचा सुंदर संगम या प्रथेतून दिसून येतो. लहान मुलांसाठी हा उत्सव केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नव्हता, तर सर्जनशीलता आणि सामूहिक सहभागाचा आनंद देणारा ठरला. मुलांनी गोवर्धन पर्वताच्या प्रतिकृती सजविण्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे परिसरातील मोकळ्या जागा रंगीबेरंगी सजावटीने आणि उत्सवी वातावरणाने खुलून गेल्या. (Govardhan Puja in Manipur)
 
मणिपूरमधील गोवर्धन पूजा उत्सवातून धार्मिक परंपरा स्थानिक सांस्कृतिक प्रथा, कौटुंबिक सहभाग आणि सामूहिक उत्सवांच्या माध्यमातून आजही जिवंत असल्याचे दिसून आले. पिढ्यान्‌पिढ्या भक्तीभाव आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य या परंपरांमधून सुरू आहे. याप्रसंगी राज्यसभा खासदार अधिकारिमायुम शारदा देवी यांनी मणिपूरच्या जनतेला गोवर्धन पूजेच्या शुभेच्छा दिल्या. राज्यातील सर्व समाजघटकांमध्ये शांतता, समृद्धी आणि सौहार्द नांदावे, अशी प्रार्थना त्यांनी केली.  (Govardhan Puja in Manipur)
 
विविध संकटांचा सामना करणाऱ्या आणि कुटुंबांपासून दुरावलेल्या नागरिकांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी भगवान श्रीकृष्णांनी प्रत्येक कुटुंबाला आनंद, आशा आणि नव्या उमेदीचे आशीर्वाद द्यावेत, अशी प्रार्थना केली. तसेच, राज्याला कायमस्वरूपी शांतता आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गोवर्धन पूजा हा उत्सव दैवी संरक्षण, निसर्गाप्रती कृतज्ञता आणि श्रद्धा, विनम्रता व एकजुटीतून मिळणाऱ्या सामर्थ्याची आठवण करून देतो, असे त्या म्हणाल्या. (Govardhan Puja in Manipur)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर