काश्मीरचा लाल चौक जिथे एकेकाळी दहशतवाद्यांनी तिरंगा फडकवून दाखवण्याचे आव्हान भारतीयांना दिले होते. आज त्याच चौकात आनंदाने दिवाळी साजरी होत आहे, ‘हनुमान चालिसा’पठण उच्चारवात होत आहे. ‘कलम ३७०’ हटविल्यानंतरचे काश्मीरचे बदलते रुप, अधिकच मोहक दिसणारे आहे हे नक्की...
काही काळापूर्वी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरातील लाल चौक हा भाग म्हणजे, भारतविरोधी तत्त्वांचा बालेकिल्लाच. याच लाल चौकात पाकिस्तानचे झेंडे फडकत होते. तेथे तिरंगा राष्ट्रध्वज फडकविणे धाडसाचेच मानले जाई. पण, जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे ‘कलम ३७०’ रद्द करण्यात आल्यानंतर, तेथील सारेच चित्र हळूहळू पालटले. हिंदू देव-देवतांच्या मिरवणुका, लाल चौकातून वाजतगाजत जात असल्याचे दिसू लागले. काश्मीरमधील काही नेते अजूनही पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेत असले, तरीही त्या केंद्रशासित प्रदेशातील वातावरण बदलत असल्याचेच अशा उदाहरणांवरून दिसते. दीपावलीच्या सणानिमित्ताने श्रीनगरचा लाल चौक दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. एवढेच नव्हे, तर दीपावली सणाच्या निमित्ताने, लाल चौकात ‘हनुमान चालीसा’चेही उच्चरवात पठण करण्यात आले.
लाल चौकातील घंटाघर परिसर दिव्यांनी उजळून निघाला होता. लाल चौकात दीपावली साजरी होत असलेली पाहून, त्या भागात आलेले पर्यटक आनंदून गेले. लाल चौकात दिवाळी साजरी होत असल्याचे पाहून आपण आनंदून गेलो आहोत, असे गुजरातमधून आलेल्या एका पर्यटकाने सांगितले. राष्ट्रीय हितासाठी येथील लोक करीत असलेले कार्य आणि लाल चौकात दिवाळी साजरी होत असल्याचे पाहून आनंद वाटला, असे तो पर्यटक म्हणाला. दिल्लीहून आलेला अन्य एक पर्यटक पहिल्यांदाच काश्मीरला आला होता. येथील वातावरण अगदी आनंदी आहे. काश्मीर खूप बदलले आहे, असे तो म्हणाला. तर, अन्य एकाने लाल चौकात ‘हनुमान चालीसा’चे पठण होत असल्याबद्दलही आनंद व्यक्त केला. "भाजपची राजवट आणि मोदी-शाह यांचे नेतृत्व, यामुळेच हे शय झाले,” असेही तो म्हणाला. लाल चौकातील दिवाळीप्रमाणेच जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांनी, दिवाळी आनंदात साजरी केली. या जवानांनी सीमेलगत दीप प्रज्वलित केले. त्यामध्ये महिला सैनिकांचाही समावेश होता.
ज्या श्रीनगरच्या लाल चौकात एकेकाळी भारतविरोधी घोषणा दिल्या जायच्या, पाकिस्तानचे झेंडे फडकविले जायचे, त्याच लाल चौकात दिवाळीनिमित्त असंख्य दिवे उजळले. काश्मीरमधून विस्थापित झालेला काश्मिरी हिंदू समाजही लवकरात लवकर आपल्या मायभूमीत परत येईल, आणि आपापल्या घरी दिवाळीसह सर्व सण अत्यंत उत्साहात साजरा करील, असा विश्वास यानिमित्ताने बाळगायला हरकत नाही.
अमेरिका : दिवाळी समारंभात आणले विघ्न
अमेरिकेतील सिएटलमध्ये तेथील हिंदू समाजाने आयोजित दिवाळी निमित्ताच्या कार्यक्रमात विघ्न आणण्याचा प्रयत्न, जेक लांग आणि थॉमस अॅलन या दोघांनी केला. कार्यक्रमात व्यत्यय आणताना, या दोघांनी हिंदूविरोधी फलक झळकविले आणि भारतविरोधी घोषणा दिल्या. गेल्या दि. ७ नोव्हेंबर रोजी तेथील हिंदू समाजाने, दिवाळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात वर उल्लेखित दोघांनी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. ‘डीपोर्ट ऑल डॉट हेड्स’ अशा घोषणा त्यांच्याकडून दिल्या जात होत्या. या घटनेचा अमेरिकन काँग्रेसच्या सदस्य प्रमिला जयपाल यांच्यासह भारतीय अमेरिकन समाजाच्या नेत्यांनी, आणि अन्य हिंदू संघटनांनी तीव्र निषेध केला. ही निदर्शने म्हणजे, वंशवाद आणि फाजील धार्मिक हटवादाचे द्योतक असल्याची टीकाही, विविध संघटनांकडून करण्यात आली.
सिएटलमधील एका सभागृहात दिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना, त्यात हे दोघे निदर्शक घुसले, आणि त्यांनी हिंदूविरोधी आणि भारतविरोधी घोषणा दिल्या. ‘स्टॉप हिंदू रिप्लेसमेंट ऑफ ख्रिश्चन्स’ अशा घोषणाही ते देत होते. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या काहींनी त्या दोघा निदर्शकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर समाजमाध्यमांवर लांग याने निदर्शनाची छायाचित्रे टाकली; तसेच हिंदू समाजाविरुद्ध आक्षेपार्ह भाषाही वापरली. लांग याने केलेला आणखी एक आरोप पाहता, त्याचा संबंध अलीकडेच झालेल्या मध्यावधी निवडणुकांशी जोडता येईल. ‘डेमोक्रॅटिक पक्षास लाभदायी ठरेल, असे वर्तन टेसासमधील हिंदू समाजाने केले,’ असा आरोप त्याने केला.
या सर्व प्रकाराचा निषेध करताना, अमेरिकेतील भारतीय उद्योजक अजय जैन भुतोरिया यांनी, ‘सदर प्रकार हा फाजील धार्मिक हटवादाचा आहे,’ असे म्हटले. "दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव. कुटुंब, समाज यांनी आनंदाने साजरा करायचा सण. हिंदू अमेरिकन आणि स्थलांतरित भारतीय समाजास अशाप्रकारे लक्ष्य करणार्यांना, या देशात थारा नाही. प्रत्येक अमेरिकन व्यक्तीस आपली सांस्कृतिक परंपरा, धार्मिक वारसा जपण्याचे आणि सण-समारंभ साजरे करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे,” असेही त्यांनी म्हटले. उत्तर अमेरिकेतील हिंदू समाजाच्या संघटनेनेही या प्रकारचा तीव्र निषेध केला आहे. तसेच सिएटल आणि आसपासच्या प्रदेशातील हिंदू समाजास, सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. ज्या जेक लांग या व्यक्तीने ही निदर्शने केली, तो टोकाच्या उजव्या विचारसरणीचा कार्यकर्ता आहे. ‘व्हाईट रिप्लेसमेंट’ नावाच्या संघटनेचा तो कार्यकर्ता आहे. दि. ६ जानेवारी २०२१ या दिवशी वॉशिंग्टनमधील अमेरिकन कॅपिटॉल इमारतीवर जो हल्ला झाला, त्यात तो सहभागी होता. त्याला चार वर्षे कारावासाची शिक्षाही झाली होती. पण, डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा दुसर्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हा पहिल्याच दिवशी त्याला दया दाखवण्यात आली. त्यानंतर लांग समाजमाध्यमांवर सक्रिय होता. लांग याच्या हिंदूविरोधाची पाळेमुळे कशात दडली आहेत, त्याची कल्पना यावरूनच यावी.
‘युनेस्को’कडून भारताचा सन्मान!
‘महाभारत’, ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ आणि कल्हणरचित ‘राजतरंगिणी’ या ग्रंथांच्या हस्तलिखितांची, ‘युनेस्को’च्या ‘मेमरी ऑफ वर्ल्ड एशिया - पॅसिफिक रिजनल रजिस्टर’मध्ये नोंद करण्यात आली. यामुळे एकाअर्थी, भारताच्या समृद्ध ऐतिहासिक वारशास जागतिक मान्यताच मिळाली. सांस्कृतिक मंत्रालयाने गेल्या दि. ५ नोव्हेंबर या दिवशी, या निर्णयाची माहिती दिली. यासंदर्भात ‘युनेस्को’ने जी प्रमाणपत्रे दिली, त्यांची छायाचित्रेही या मंत्रालयाने आपल्या ‘एस’ खात्यावर प्रसिद्ध केली. ‘युनेस्को’च्या संबंधित विभागाची बैठक इंडोनेशियातील जकार्ता येथे संपन्न झाली. त्यामध्ये या ग्रंथांचा समावेश संबंधित रजिस्टरमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या निर्णयाचे स्वागत केले. भारताच्या या थोर सांस्कृतिक वारशाची ‘युनेस्को’ने नोंद घेतल्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.
या तीनही ग्रंथांची हस्तलिखिते वेगवेगळ्या कालखंडातील आहेत. ‘महाभारता’चे जे हस्तलिखित आहे, ते भूर्जपत्रावर आहे. हे हस्तलिखित पुणे येथील ‘भांडारकर प्राच्यविद्या’ संस्थेमध्ये आहे. दुसरे हस्तलिखित म्हणजे, ‘कौटिलीय अर्थशास्त्र’! हे हस्तलिखित ताडाच्या पानांवर लिहिण्यात आले असून, ते म्हैसुरू येथील ‘प्राच्यविद्या संशोधन’ संस्थेमध्ये आहे. सुशासन, कूटनीती, करपद्धती, आर्थिक व्यवस्थापन, लष्करी संघटन, कायदा आणि शासन करणार्यांची कर्तव्ये आदी संदर्भातील सखोल चर्चा, या ग्रंथामध्ये आहे. तिसरा ग्रंथ आहे, कल्हणरचित ‘राजतरंगिणी’. १२व्या शतकातील हा ग्रंथ असून, त्याचे हस्तलिखित श्रीनगर येथील ‘श्री. प्रताप सिंह वाचनालय’ संकुलातील ‘प्राच्यविद्या संशोधन’ वाचनालयात आहे. हा ग्रंथ म्हणजे, काश्मीरचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. त्या प्रदेशातील राजघराणी, राजे, राजकीय घडामोडी आणि ऐतिहासिक परंपरा आदींची माहिती, यामध्ये आहे. यापूर्वी, भारताच्या तीन हस्तलिखितांची नोंद, या रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये गोस्वामी तुलसीदास यांचे ‘रामचरितमानस’, १५व्या शतकातील ‘पंचतंत्र’ हस्तलिखित आणि ‘सहृदयलोक - लोचन’ या भारतीय काव्यशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथांचा, २०२४ मध्येच ‘युनेस्को’ने आपल्या रजिस्टरमध्ये समावेश केला. आता आणखी तीन महान भारतीय ग्रंथांची ‘युनेस्को’ने दखल घेतली आहे. भारताच्या या ग्रंथांची दखल घेऊन भारतीय संस्कृती, ज्ञानपरंपरा यांची जागतिक पातळीवर ओळख करून देण्यामध्ये, ‘युनेस्को’ने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.