भारतीय शेअर बाजार हा केवळ अमेरिकन बाजारावर अवलंबून राहील, हा गैरसमज यंदा गुंतवणूकदारांनी मोडला. ‘सेन्सेस’ आणि ‘निफ्टी’ गेल्या काही दिवसांत इतक्या दिवसांचा आळस झटकत उच्चांकावर पोहोचले. ऐन दिवाळीत सोन्यालाही झळाळी प्राप्त झाली. संपूर्ण भारत दिवाळी साजरी करताना, गुंतवणूकदारांचा उत्साह काय सांगतो, त्याचे हे आकलन...
सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १०७ अंकांनी वधारला आणि ८१ हजार १०७ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘एनएसई’ ५८ अंकांनी वाढून, २५ हजार ४५ वर होता. दिवसभर सरकारी बँकांमध्येही खरेदी दिसली. यंदाच्या तिमाहीत सरकारी बँकांचा निव्वळ नफा बदलल्याचे परिणाम, सध्या बाजारात दिसत आहेत. सोबतच ‘फार्मा’ कंपन्यांच्या समभागांमध्येही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. ‘आयटी’ आणि ‘मेटल’ शेअर्समध्ये मात्र विक्रीचा सपाटा दिसून आला. ‘मुहूर्त ट्रेडिंग’मध्ये झालेली पडझड लक्षात घेता, आज शेअर बाजारावर गुंतवणूकदारांचे लक्ष होते. मात्र, खरेदीचा कल दिसल्याने, दोन्ही निर्देशांक सकारात्मक स्थितीमध्ये बंद झाले. सद्यस्थिती लक्षात घेता, अमेरिकन मध्यावधीत ट्रम्प यांच्या पक्षाचा पराभव, सोन्यातील विक्री, कच्च्या तेलाचे घसरलेले भावाचे पडसाद भारतीय शेअर बाजारात दिसले.
दक्षिण कोरियाचा ‘कोस्पी’, हाँगकाँगचा ‘हँगसेंग’ शेअर बाजारात विशेष कामगिरी करु शकलेला नाही. अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांकही, सुमार कामगिरी करत आहेत. अमेरिकेतील सत्तास्पर्धेमुळे भारतीय नेतृत्वावरच विश्वास ठेवत, परकीय गुंतवणूकदारांनी एकूण ४२ हजार ८४५ कोटींची खरेदी केली. ट्रम्प असो वा बायडन कोणालाही सलग दोन वेळा सत्ता राखता आलेली नाही. याउलट, भारतात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात, भाजपने तिसर्यांदा सत्ता स्थापन केली. भारताशेजारची लहान राष्ट्रेही अराजकतावाद्यांच्या तावडीतून सुटलेले नाही. भारतातही ‘रिजीम चेंज’चा प्रयत्न ‘सीजेपी’ आंदोलनातून दिसला. ‘एसी’ हॉटेल्समध्ये बसून, दिवाळी पार्ट्या झोडण्यात मश्गुल असलेल्या ‘कॉकरोच’ना, हा ४१ हजार कोटींचा आकडा दिसणार नाही. कच्च्या तेलाचे भाव २०२० नंतर पहिल्यांदाच ९७ डॉलरवर पोहोचले आहेत. गेल्या आठवड्यात यात १६ टक्के घसरण झाली. ऑक्टोबर अखेरीस कच्च्या तेलाने सहा महिन्यांचा उच्चांक गाठला होता. सध्याची घसरण पाहता, इंधन दर कमी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
परकीय गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात, सुमारे आठ हजार कोटींची गुंतवणूक केवळ सरकारी रोख्यांमध्ये केली आहे. रुपया मजबूत होत असताना, सरकारी रोख्यांमधून मिळणारे व्याज आकर्षण ठरत आहे. ‘लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (सीसीआयएल)च्या आकडेवारीनुसार, ‘फुली अॅसेसिबल रूट’अंतर्गत सरकारी रोख्यांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांची एकूण गुंतवणूक, दि. २ नोव्हेंबर रोजी ३.५७ लाख कोटी रुपये होती. दि. ९ नोव्हेंबरपर्यंत ही गुंतवणूक ३.६५ लाख कोटींवर पोहोचली. म्हणजेच, एकाच आठवड्यात गुंतवणुकीत सुमारे ७ हजार ९६९ कोटी रुपयांची वाढ झाली.
दीपावली हा सण केवळ भारतापुरताच मर्यादित राहिला नाही, तर तो जागतिक उत्सवाचे केंद्र ठरतो आहे. भारतीय जल्लोषात दिवाळी साजरी करतातच; पण जगभरात जिथे जिथे भारतीय पोहोचले आहेत, तिथे तिथे त्यांनी दिवाळीचा आनंदही सोबत नेला. ऑनलाईन खरेदी-विक्रीनेही यंदा जुने विक्रम मोडीत काढण्याचे ठरवले की काय? अशी स्थिती आहे. भारतीय बाजारपेठांमध्ये तर उत्साहच संचारलेला आहे. मात्र, ऑनलाईन बाजारपेठांनीही दिवाळी खरेदीचा सपाटाच लावला आहे. हा खरेदीचा ओघ केवळ कंदील, दिवे, मिठाईपुरताच मर्यादित न राहाता घरगुती वस्तू, जिन्नसची मागणीही वाढली आहे. घरात नव्या इलेट्रॉनिक वस्तू, सौंदर्यप्रसाधने, सजावटीच्या वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली.
‘झेप्टो’, ‘स्वीगी’, ‘झोमॅटो, ‘इन्स्टामार्ट’, ‘फ्लिपकार्ट मिनिट्स’सारख्या ‘क्वीक कॉमर्स’ कंपन्यांनी, दिवाळीसाठी विविध जाहिराती केल्या होत्या. केवळ पणत्यांच्या ४.६८ लाख ऑर्डर्स ‘झेप्टो’वर मिळाल्या. कपड्यांची मागणी गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. इतकेच नव्हे, तर फुले-हार-पुष्पगुच्छ आदींच्या ऑर्डर्स अडीच पटींनी वाढल्या. ‘स्वीगी’-‘इन्स्टामार्ट’च्या विक्रीत १६२ टक्क्यांची वाढ दिसली. हा ट्रेंड केवळ मोठ्या शहरांपुरताच मर्यादित नसून, ‘फाईव्ह-जी’ इंटरनेटमुळे गावाखेड्यातही पोहोचला आहे. यंदा ‘कॉर्पोरेट गिफ्टिंग’ हा नवा कल बाजारात दिसला. बर्याच कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी खास दिवाळी भेट म्हणून, विविध भेटवस्तू दिल्या. त्यामुळे याकाळात इलेक्ट्रॉनिस वस्तू, बॅग आदींच्या घाऊक विक्रीत त्याचे पडसाद दिसले. पुढील वर्षी हा कल आणखी स्पष्ट दिसेल. ‘डिजिटल अकाऊंटिंग’पर्यंत पोहोचलेल्या व्यापारी वर्गाचा प्रवास अजूनही, लक्ष्मीपूजनाला वही-खात्याची संस्कृती विसरलेला नाही. त्यामुळे इतक्या झगमगाटातही ‘व्होकल फॉर लोकल’चा संदेश व्यवस्थित पोहोचला आहे. मालाड येथे राहणार्या संकेत उतेकर या मराठी तरुणाचे ‘आठवणींचे घर’ नावाचे ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंट असून, त्याचे ‘इन्स्टाग्राम’वर एकूण २२ हजार फॉलोअर्स आहेत. त्याने यंदा ‘इन्स्टाग्राम’ला कल्पकतेची जोड देत, एकूण बाराशे कंदीलांची विक्री केली. यातून किमान चार ते पाच लाखांची त्याची उलाढाल केली. संकेतप्रमाणे अजूनही तरुण या पद्धतीने व्यवसाय करत आहेत. ‘इन्स्टाग्राम’वर केवळ ‘कन्टेंट क्रिएटर’ म्हणून न राहता, कित्येक मंडळी स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत.
यंदा सोनेखरेदीचाही उत्साह शिगेला पोहोचला आहे. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजेच्या मुहूर्तावर केलेल्या सोनेखरेदीची एकूण विक्री ६२ हजार कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या लक्ष्मीपूजनापर्यंत सोन्याने १४ टक्के परतावा दिल्याचे, ‘ऑल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल’चे अध्यक्ष राकेश रोकडे यांनी सांगितले. हे आकलन लिहेपर्यंत दिवसाअखेर सोन्याचा दर १.४४ लाख प्रतितोळा इतका होता. रोकडे यांच्या मते, सोन्यातील गुंतवणुकीचा परतावा ३ हजार २०० टक्के इतका आहे. कुठल्याही इतर गुंतवणुकीने हा आकडा गाठलेला नाही. भारतीयांची सोनेखरेदीची परंपरा लक्षात घेता, राष्ट्रीय शेअर बाजार एक ‘इलेट्रॉनिक गोल्ड रिसिट’ हा पर्याय आणत आहे. आपल्या डी-मॅट खात्यात, गुंतवणूकदार सोने खरेदी-विक्री ‘जीएसटी’विना करू शकतात. एकूणच, भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास, शेअर बाजारातील तेजी, सोन्याची झळाळी आणि दिवाळीच्या खरेदीतील उत्साह, हे देशाच्या आर्थिक चैतन्याचे सकारात्मक संकेत आहेत.