मुंबई (BAPS Hindu Temple Diwali Celebration Abu Dhabi) : संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान यांनी अबुधाबी येथील बॅप्स हिंदू मंदिरात आयोजित दीपावली सोहळ्याला नुकतीच उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या हस्ते सात प्रकाशमान किरणांचा समावेश असलेल्या ‘युनिटी ऑफ लाइट्स’ या विशेष प्रकाशरचनेचे उद्घाटन करण्यात आले. युएईच्या सात अमिरातींचे प्रतीक असलेल्या या सात प्रकाशकिरणांतून देशाची एकता, सामर्थ्य आणि सामायिक राष्ट्रीय अस्मिता अधोरेखित करण्यात आली. भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरांचा उत्सव साजरा करण्यासाठी हजारो नागरिक मंदिरात एकत्र आले होते. या सोहळ्यातून भारत आणि युएई यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीचेही दर्शन घडले. युएईच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासात भारतीय समुदायाने दिलेल्या योगदानाचे शेख नाहयान यांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाला समुदाय विकास विभागाचे अध्यक्ष शमिस अली खलफान अल धाहेरी यांच्यासह विविध देशांचे राजदूत, वरिष्ठ सरकारी अधिकारी, मुत्सद्दी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भारताचे महावाणिज्यदूत डॉ. इम्माडी विष्णू वर्धन रेड्डी, सर्बिया आणि दक्षिण कोरियाचे राजनैतिक प्रतिनिधी तसेच विविध धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही या सोहळ्यात सहभागी झाले होते. मंदिराचे स्वामी ब्रह्मविहारीदास यांनी शेख नाहयान यांचे स्वागत केले. त्यांच्या आगमनानिमित्त पारंपरिक वाद्यवृंदाने स्वागतधून सादर केली. त्यानंतर शेख नाहयान यांनी पारंपरिक दीपप्रज्वलन केले, अन्नकूट सोहळ्याचे दर्शन घेतले आणि भारतीय समुदायातील कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला.(BAPS Hindu Temple Diwali Celebration Abu Dhabi)
मंदिराच्या खुल्या रंगमंचावर उपस्थित हजारो नागरिकांना संबोधित करताना शेख नाहयान यांनी युएई, भारत आणि जगभरात दीपावली साजरी करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. दीपावली हा प्रकाश, आशा आणि नवचैतन्याचा उत्सव असल्याचे सांगत, तो अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो, असे त्यांनी नमूद केले. दीपावलीशी संबंधित मूल्ये ही कोणत्याही धर्माच्या किंवा संस्कृतीच्या मर्यादेत बांधलेली नाहीत. दयाळूपणा, परस्पर समजूतदारपणा आणि एकमेकांप्रती आदर या गुणांमधूनच न्याय्य आणि यशस्वी समाजाची निर्मिती होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
युएईमध्ये साजऱ्या होत असलेल्या ‘कुटुंब वर्षा’च्या पार्श्वभूमीवर दीपावलीचे महत्त्व अधोरेखित करताना शेख नाहयान म्हणाले की, हा सण विविध पिढ्यांना एकत्र आणतो. कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ करतो आणि आई-वडिलांकडून मुलांपर्यंत परंपरा व संस्कार पोहोचवण्याचे काम करतो. सशक्त कुटुंबांमधून सशक्त समाजाची निर्मिती होते आणि अशा समाजाच्या बळावर शांततापूर्ण व समृद्ध राष्ट्र उभे राहते, असे त्यांनी सांगितले. ‘युनिटी ऑफ लाइट्स’ या सात प्रकाशकिरणांच्या रचनेचा उल्लेख करताना त्यांनी ही कलाकृती युएईच्या सामर्थ्याचा आधार असलेल्या राष्ट्रीय एकतेचे सुंदर प्रतीक असल्याचे म्हटले. मैत्री आणि सहकार्याच्या माध्यमातून सर्वांसाठी उज्ज्वलभविष्याचा मार्ग प्रकाशमान होतो, असेही त्यांनी नमूद केले.(BAPS Hindu Temple Diwali Celebration Abu Dhabi)
युएईमध्ये सहिष्णुता, सौहार्द आणि शांततापूर्ण सहअस्तित्व ही केवळ तत्त्वे नसून दैनंदिन जीवनात आचरणात आणली जाणारी मूल्ये आहेत, असे शेख नाहयान यांनी स्पष्ट केले. राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दूरदृष्टीमुळे जगाच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांना युएईमध्ये सन्मानाने राहता येते, आपल्या धर्माचे स्वतंत्रपणे पालन करता येते, परंपरा जपता येतात आणि देशाच्या प्रगतीत योगदान देता येते, असे त्यांनी सांगितले.
भारत-युएई मैत्रीचे शेख नाहयान यांच्याकडून कौतुक
भारत आणि युएई यांच्यातील संबंधांवर बोलताना शेख नाहयान यांनी दोन्ही देशांना दीर्घकालीन भागीदार संबोधले. परस्पर सहकार्य, विश्वास आणि समान आकांक्षा यांचा समृद्ध इतिहास या दोन देशांना जोडतो, असे त्यांनी सांगितले. भारत-युएई संबंध केवळ सरकारी करारांपुरते मर्यादित नसून दोन्ही देशांतील नागरिकांमधील दैनंदिन संवाद आणि परस्पर संबंधांमुळे ते अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. युएईच्या विकासात भारतीय समुदायाने दिलेल्या योगदानाचा त्यांनी विशेष उल्लेख केला. भारतीय नागरिकांची मेहनत, उद्यमशीलता, कौशल्य आणि समर्पण यांमुळे युएईची अर्थव्यवस्था उभारण्यास मदत झाली असून देशाचे सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनही समृद्ध झाले आहे, असे ते म्हणाले. भारतीय समुदायाने आपल्या परंपरा जपतानाच त्या व्यापक समाजापर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांनी आभार मानले. सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना या उत्सवातील प्रकाशाने विविध समुदायांमधील बंध अधिक दृढ व्हावेत आणि शांतता, मैत्री व परस्पर समजूतदारपणाला प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.(BAPS Hindu Temple Diwali Celebration Abu Dhabi)
अन्नकूटमध्ये एक हजारांहून अधिक सात्त्विक पदार्थांची सजावट
दीपावली सोहळ्यातील प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे पारंपरिक अन्नकूट उत्सव. ‘अन्नाचा पर्वत’ असा अर्थ असलेल्या या उत्सवासाठी बीएपीएसच्या महिला स्वयंसेविकांनी एक हजारांहून अधिक सात्त्विक पदार्थ तयार केले होते. वर्षभर मिळालेल्या आशीर्वादांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही अन्नसजावट करण्यात आली होती. यंदाच्या अन्नकूट सजावटीची संकल्पना मंदिराच्या सुरुवातीच्या काळात युद्धाच्या दिवसांत आश्रयासाठी आलेल्या एका छोट्या कॉकटेल पक्ष्याच्या कथेवर आधारित होती. स्वामींनी या पक्ष्याची काळजी घेत त्याला पुन्हा निरोगी केले होते. या घटनेतून प्रेरणा घेऊन विविध हिंदू देवतांशी संबंधित पक्ष्यांच्या कलात्मक प्रतिकृती साकारण्यात आल्या. या सजावटीतून भक्ती, ज्ञान, धैर्य आणि सौहार्द या मूल्यांचे प्रतीकात्मक दर्शन घडवण्यात आले. हिंदू धर्मातील ‘सेवा’ अर्थात निःस्वार्थ स्वयंसेवेच्या परंपरेनुसार तयार केलेले हे अन्न समाजातील नागरिक, श्रमिक वसाहतींमधील कामगार आणि गरजू व्यक्तींना वितरित करण्यात येणार आहे. भारताचे महावाणिज्यदूत डॉ. इम्माडी विष्णू वर्धन रेड्डी यांनीही प्रसाद वितरण केंद्रावर स्वयंसेवकांसोबत सहभागी होत भाविकांना प्रसादाचे वाटप केले.(BAPS Hindu Temple Diwali Celebration Abu Dhabi)
मंदिराला आतापर्यंत पन्नास लाखांहून अधिक भाविकांची भेट
दि. ६ ते १० नोव्हेंबर या पाच दिवसांच्या दीपोत्सवाला पहिल्या दोन दिवसांतच ३० हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली. अबुधाबीतील बॅप्स हिंदू मंदिराचे उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत जगातील १०० हून अधिक देशांतील जवळपास ५० लाख नागरिकांनी या मंदिराला भेट दिली आहे. हिंदू धर्माच्या परंपरा आणि संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी हे मंदिर विविध देशांतील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरत आहे.(BAPS Hindu Temple Diwali Celebration Abu Dhabi)