अटल सेतूची कनेक्टिव्हिटी थेट पुण्यापर्यंत;एमएमआरडीएच्या जोडमार्गाला वेग; ७.३५ किमी सहापदरी मार्गाचे काम प्रगतिपथावर


Atal Setu Mumbai Pune Connector
 
मुंबई, (Atal Setu Mumbai Pune Connector) : मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते वाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अटल सेतू-मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोडमार्ग प्रकल्पाचे ६७ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर दक्षिण मुंबई ते पुणे प्रवासाच्या वेळेत अंदाजे ६० ते ९० मिनिटांची बचत होण्याची अपेक्षा आहे. तसेच पनवेल परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे आणि गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अधिक गतिमान होणार आहे.
 
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ७.३५ किलोमीटर लांबीचा सहापदरी उन्नत मार्ग विकसित करण्यात येत आहे. सध्या अटल सेतूवरून येणारी वाहतूक पनवेल मुख्य जंक्शन परिसरात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि अन्य प्रमुख मार्गांवरील वाहतुकीशी एकत्रित होते. त्यामुळे विशेषतः गर्दीच्या वेळेत या परिसरात वाहतुकीचा ताण वाढतो. ही समस्या दूर करण्यासाठी चिर्ले आणि पळस्पे विभागांतून स्वतंत्र सहापदरी उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. यामुळे वाहनांना पनवेलमधील गर्दीचे जंक्शन टाळून थेट मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवेश करता येणार आहे.(Atal Setu Mumbai Pune Connector)
 
प्रकल्पाच्या चिर्ले विभागातील पायाभरणीची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. एकूण ११३ खांबांसाठीच्या आणि ४२ ओपन फाउंडेशन काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. एकूण १५५ पैकी १५३ खांब उभारण्यात आले असून, खांब उभारणीचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. उन्नत मार्गाच्या डेक स्लॅबचे ४९ टक्के काम पूर्ण झाले असून, २४० पैकी ११७ स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. मातीचा भराव टिकवून ठेवणाऱ्या आरई वॉलचे ९० टक्के, तर रेल्वे उड्डाणपुलाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. गर्डरच्या ओतकामाचे आणि जुळणीचे बहुतांश कामही पूर्ण झाले आहे.
 
पळस्पे विभागात एकूण २१ पायाभरणी गटांपैकी १५ गटांचे काम पूर्ण झाले असून, पायाभरणीच्या कामाने ७१ टक्के प्रगती साधली आहे. खांबांच्या बांधकामाचे ३८ टक्के काम पूर्ण झाले आहे. गर्डरच्या आरई वॉल पॅनेलचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकामही वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यमान रस्ते आणि पुलांच्या पायाभूत सुविधांच्या वर तिसऱ्या स्तरावर उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. त्यामुळे उपलब्ध जागेचा कार्यक्षम वापर करून विद्यमान वाहतूक व्यवस्था सुरू ठेवतानाच नवीन मार्ग विकसित करणे शक्य होत आहे.(Atal Setu Mumbai Pune Connector)
 
विमानतळ, बंदर आणि औद्योगिक क्षेत्रांना फायदा
 
या जोडमार्गामुळे केवळ मुंबई-पुणे प्रवासच वेगवान होणार नसून मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि गोवा या प्रमुख आर्थिक व पर्यटन केंद्रांमधील संपर्कही अधिक सक्षम होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना अधिक सुलभ मार्ग उपलब्ध होईल. तसेच जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाकडे जाणाऱ्या मालवाहतुकीला आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ व ३४८ वरील वाहतूक व्यवस्थापनाला याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. पनवेल मुख्य जंक्शनवरील वाहतुकीचा ताण कमी झाल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गादरम्यानचा वाहतूक प्रवाह अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचण्याबरोबरच मालवाहतूक, लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक क्षेत्रांच्या कार्यक्षमतेतही वाढ होऊ शकते.(Atal Setu Mumbai Pune Connector)
 
प्रकल्पाने ६७ टक्के भौतिक प्रगती साध्य करणे हा अंमलबजावणीतील महत्त्वाचा टप्पा आहे. चिर्ले विभागातील पायाभरणी आणि स्तंभ उभारणीची कामे जवळपास पूर्ण झाली असून पळस्पे विभागातही प्रमुख संरचनात्मक कामे वेगाने सुरू आहेत. अटल सेतू आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग यांच्यातील महत्त्वाचा दुवा पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल आणि विद्यमान जंक्शनवरील ताण कमी होईल.
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर