उत्तर प्रदेशच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसे सोनिया गांधींनी ‘बाबरा’चे मढे उकरणे, मल्लिकार्जुन खर्गे यांना दिवाळीत ‘ईद’ दिसणे, समाजवादी पक्षाने कारसेवकांच्या हत्याकांडाचे निर्लज्ज समर्थन करणे आणि वारीस पठाण यांना सत्तेचे स्वप्न पडणे, अशा दाढीकुरवाळू लांगूलचालनाला उधाण आले आहे. हा हिंदूविरोधी तुष्टीकरणाच्या राजकारणाचा नीचांकच म्हणावा लागेल!
भारताच्या राजकीय पटलावर तथाकथित निधर्मीवादाच्या नावाखाली बहुसंख्य हिंदू समाजाच्या भावना पायदळी तुडवण्याचाच खेळ, उघडपणे आणि निलाजरेपणाने सुरू आहे. काँग्रेसच्या मानसिकतेचा विचार केला, तर सोनिया यांनी ‘बाबरा’च्या नावाने अश्रू ढाळल्यानंतर, लगेचच खर्गे यांना दिवाळीत ‘ईद’ दिसली. अर्थात यात नवल ते काय? त्यांच्या मॅडमना ‘बाबर’ जवळचा वाटल्याने, यांना दिवाळीत ‘ईद’ आठवणारच! प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतील आगमनाचा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी. हा सण म्हणजे, भारताचा सांस्कृतिक आत्माच. या मांगल्याच्या पर्वाला ‘खुशियों की ईद’ असे संबोधून, काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी देशातील कोट्यवधी हिंदूंच्या भावनांचा जाणीवपूर्वक अपमान केला. सोनिया गांधींनी अयोध्येत बाबरी मशीद पडल्याचे दुःख व्यक्त करत, नक्राश्रू ढाळले होते. या अश्रूंचा ओलावा सुकतो न सुकतो, तोच त्यांच्या पक्षाध्यक्षांनी दिवाळीला ‘ईद’ म्हटले. त्यामागे अल्पसंख्याक ‘व्होटबँके’ला खूश करण्याचा आणि हिंदूंच्या सणांना इस्लामिक रंग फासण्याचा, कुटिल राजकीय अजेंडाच लपलेला आहे. भारताचा मुख्य सण असलेल्या दिवाळीच्या शुभेच्छा देताना, ‘शुभ दीपावली’ म्हणण्यासाठीही या नेत्यांची जीभ धजावत नाही. दिवाळीला ‘ईद’ म्हणण्याइतकी वैचारिक दिवाळखोरी आणि राजकीय लाचारी काँग्रेसमध्ये आली असेल, तर या पक्षाने स्वतःला ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेण्याचा अधिकारच गमावल्याचे का म्हणू नये? बहुसंख्याकांच्या भावना दुखावल्याने आपल्याला फटका बसेल, याची भीतीही आता या नेत्यांना उरलेली नाही, हेच यातून सिद्ध होते.
काँग्रेसच्या या सांस्कृतिक आक्रमणाला, आता समाजवादी पक्षानेही हिंसक वैचारिक जोड दिली आहे. समाजवादी पक्षाचे खासदार सनातन पांडे यांनी ‘बाबरी ढाच्या’च्या रक्षणासाठी, तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी १९९० मध्ये निशस्त्र कारसेवकांवर केलेल्या गोळीबाराचे निर्लज्ज समर्थन केले. "देशाचे संविधान वाचवण्यासाठी आणि संभाव्य गृहयुद्ध टाळण्यासाठीच रामसेवकांवर गोळीबाराचा आदेश दिला गेला,” असा संतापजनक युक्तिवाद पांडे यांनी केला. जनतेची दिशाभूल करण्यासाठी कारसेवकांवरील अत्याचाराचा ‘नॅरेटिव्ह’ पसरवला गेला, अशी मुक्ताफळे उधळत त्यांनी मुलायमसिंह यांच्या कृत्याची भलामणच केली. "भारताच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी गोळीबार करण्याचा आदेश दिला असेल, तर ते पाऊल पूर्णपणे योग्यच होते,” असे म्हणत, या खासदाराने लोकशाहीची आणि संविधानाची थट्टाही उडवली. निशस्त्र रामभक्तांच्या छातीवर गोळ्या झाडणे, हे कोणत्या संविधानात बसते? या गोळीबारात शेकडो निष्पाप कारसेवकांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. शरयूचे पाणी कारसेवकांच्या रक्ताने लाल झाले होते. त्यांच्या बलिदानाचा अवमान करण्याचे धाडस समाजवादी पक्ष कसा काय करतो? यातून हेच स्पष्ट होते की, समाजवादी पक्षाचा पायाच मुळी हिंदूंच्या द्वेषावर आणि तुष्टीकरणावर उभा आहे. अयोध्येतील राम मंदिर हे आता वास्तव असताना, जुन्या जखमा उकरून काढून त्यावर मीठ चोळण्याचा हा प्रकार भयंकर असाच!
एकीकडे काँग्रेस आणि समाजवादी पक्षासारखे पक्ष निधर्मीवादाच्या बुरख्याखाली हिंदूंच्या अस्मितेवर घाव घालत आहेत, तर दुसरीकडे याच लांगूलचालनाचे फळ म्हणून कट्टरतावादी शक्तींचे मनोधैर्य गगनाला भिडले आहे. ‘एआयएमआयएम’चे नेते वारीस पठाण यांनी नुकतेच केलेले विधान याचाच ढळढळीत पुरावा. "अब्दुल एक दिवस उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री आणि या देशाचा पंतप्रधानही होईल,” अशी बोंब पठाण यांनी ठोकली. "मुस्लिमांनी कोणत्याही एका राजकीय पक्षाची ‘व्होटबँक’ न राहता, आता स्वतःचे नेतृत्व निर्माण करावे आणि सत्तेच्या चाव्या हातात घ्याव्यात,” असे आवाहन त्यांनी केले. पठाण यांच्या या विधानामागे लोकसंख्येच्या जीवावर या देशावर मुस्लिमांचे सरकार प्रस्थापित करण्याची मानसिकता आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने आजवर ज्या ‘अब्दुल’च्या दाढ्या कुरवाळून आपली राजकीय पोळी भाजली, तोच ‘अब्दुल’ आता यांना थेट दिल्लीच्या तख्तावर बसवेल, अशी स्वप्ने ते पाहत आहे. हे सगळे एका सुनियोजित अजेंड्याचा भाग असून, यात तथाकथित पुरोगामी पक्ष आपलीच कबर खोदत आहेत, हेच वास्तव आहे.
काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने आजवर सत्तेसाठी ज्या पद्धतीने अल्पसंख्याकांचे लांगूलचालन केले, त्याचीच परिणती म्हणजे वारीस पठाण यांच्यासारखे नेते बहुसंख्याकांना आव्हान देण्याची भाषा करू लागले. तुष्टीकरणाच्या या खेळात संविधानाचा हत्यार म्हणून वापर होत आहे. आपल्या सोयीचे असते, तेव्हा हेच नेते संविधानाची प्रत हातात घेऊन ‘संविधान बचाओ’ म्हणून गळा काढतात आणि बहुसंख्य हिंदूंच्या भावनांचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र तेच संविधान कारसेवकांवरील गोळीबाराचे समर्थन करण्यासाठी वापरतात. हा फक्त दुटप्पीपणा नसून, तो बहुसंख्य समाजाच्या अस्तित्वावरील सुनियोजित हल्ला आहे. हिंदू समाजाच्या सहिष्णुतेचा आणि औदार्याचा अंत पाहण्याचे हे प्रकार आता थांबवलेच पाहिजेत.
या तिन्ही घटना वरकरणी वेगवेगळ्या आणि स्वतंत्र वाटत असल्या, तरी त्यांचा धागा एकच आहे तो म्हणजे उत्तर प्रदेशात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका. मुस्लीम मतपेटीच्या लांगूलचालनासाठी सुरु असलेले प्रयत्न आहेत. दिवाळीला ‘ईद’ म्हणणारे खर्गे आणि बाबरीसाठी रडणार्या सोनिया, रामभक्तांच्या हत्याकांडाला संविधानिक ठरवणारे सनातन पांडे आणि पंतप्रधानपदावर डोळा ठेवणारे वारीस पठाण ही सर्व मंडळी एकाच नाण्याच्या वेगवेगळ्या बाजू.हिंदूंच्या सणांना इस्लामिक रंग फासायचा, हिंदूंच्या नरसंहाराचे उघडपणे समर्थन करायचे आणि या बहुसंख्य समाजाला राजकीयदृष्ट्या दुबळे ठरवून सत्ता मिळवायची, असा हा सुनियोजित डाव आहे. देशातील बहुसंख्य समाज या ‘सेक्युलर’ राजकारणाच्या जाळ्यातून बाहेर पडून आपल्या सांस्कृतिक आणि राजकीय अस्तित्वासाठी एकवटत नाहीत, तोपर्यंत हिंदूच्या उत्सवावर, परंपरांवर असे वार होतच राहतील. रामसेवकांच्या रक्तावर उभे राहिलेले राजकारण आणि सणांचा अपमान करणारी ही प्रवृत्ती वेळीच ओळखून जागेवर ठेचली नाही, तर भविष्यात हा देश आपली मूळ ओळख हरवून बसेल, हाच यातून मिळालेला धोक्याचा संदेश आहे.