प्रतिकूलतेवर मात करत स्वतःसोबतच समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणार्या पनवेलच्या अॅड. शुभांगी दत्तात्रय झेमसे. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
''जगद्गुरू शंकराचार्यांनी तुझी ओटी भरली, तुला आशीर्वाद दिला पोरी. हे तुझ्या आजवरच्या कामाचे फळ आहे,” डॉ. शंकर झेमसे त्यांच्या सुनबाईला म्हणजे, अॅड. शुभांगी झेमसे यांना म्हणाले. हे ऐकून शुभांगी यांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रूच तरळले. कारण, आजपर्यंतचे आयुष्य हे नीतिमत्ता जपत, अत्यंत धार्मिकतेने जनसेवा करण्यातच व्यतित झाले होेते. सामाजिक बांधिलकी जपत, गरजूंना सहकार्य करायचे, मार्गदर्शन करायचे, हे कार्य त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग. अॅड. शुभांगी झेमसे म्हणजे पेण-पनवलेच नव्हे, तर रायगडमधलेच एक प्रतिष्ठित सेवाभावी नाव!
त्या सध्या रायगडच्या बालकल्याण समितीच्या सदस्या आहेत. त्यांनी भूषवलेल्या विविध पदांचा उल्लेख करणे अपरिहार्य असेच. त्या माजी नगरसेविका असून, त्या ’पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँके’च्या ‘डायरेक्टर’ही होत्या. त्यांनी नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीचे सभापतीपदही भूषवलेले असून, ‘युनिक बाजार को-ऑप. हाऊसिंग सोसायटी’च्याही त्या अध्यक्ष राहिल्या होत्या. ‘रोटरी’, ‘इनरव्हील’ क्लबसारख्या संस्थांवर त्यांनी विविध पदांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. काळण समाजाच्या मध्यवर्ती संघटनेच्याही त्या महिला अध्यक्ष होत्या. ‘राज्य महिला आयोग’, ‘रायगड जिल्हा महिला दक्षता समिती’, ‘सृहित जीवन ट्रस्ट’, ‘कोकण एज्युकेशन माजी विद्यार्थी संघटना’, ‘संस्कृतीसंवर्धन’ या अनेक संघटनांमध्येही त्या आजही कार्यरत आहेत.
त्यांनी रायगड जिल्ह्यातील १५ शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन आणि इनसिनरेटर मशीनही बसवल्या. पेणमध्ये ग्रामीण रुग्णालयात ज्या मातेने मुलीला जन्म दिला, तिची खण-नारळ आणि साडीचोळी देऊन सत्कार कारायचा, असा उपक्रमही त्यांनी अनेक वर्षे राबवला. हिंसाचाराविरोधात न्याय मिळावा म्हणून, त्यांनी अनेक महिलांना मार्गदर्शनपर सहकार्यही केले आहे. अनाथ बालक, निराधार महिला दिव्यांग बांधवांसाठीचे त्यांचे कार्य उल्लेखनीय असेच. ‘कोरोना’ काळात तर त्यांनी शोषित-वंचित गटातील समाज-भगिनींसाठी, खूप मोठे सेवाकार्य केले आहे. या आणि इतर अशाच अनेक सेवाभावी कार्यासाठी, शुभांगी यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले.
काळण समाजाचे कृष्णनाथ आणि विजया लाड हे दाम्पत्य. उभयतांना आठ अपत्ये, त्यांपैकीच एक म्हणजे शुभांगी. कृष्णनाथ हे गणपतीची मूर्ती आणि देखावे बनवण्यात अत्यंत प्रवीण. पण, ही कामे काही बारमाही नाही. त्यामुळे घरी गरिबीने हातपाय पसरलेले. विजयाबाई अत्यंत समाजशील. परिसरातील महिलांना कधीही काहीही समस्या आल्या की, त्या विजयाबाईंचा सल्ला घेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोंड्याचा मांडा करून कुटुंब कसे चालवायचे, हा आदर्श विजयाबाईंकडून घेण्यासारखाच. कृष्णनाथ आणि विजयाबाई मुलांना सांगत, "कुणी कितीही वाईट वागले, तरी आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. जिथे असू, तिथे सगळ्यांचे चांगले कसे होईल, यासाठीच काम करायचे.” या वातावरणातच शुभांगी वाढत होत्या.
शुभांगी जात्याच हुशार. त्या लहानपणापासूनच शिक्षणासोबतच कामही करू लागल्या. बाबांनी बनवलेल्या नागमूर्ती आणि इतर मूर्तींना रंगकाम करणे, त्या बाजारात विकणे, ही सगळी कामे त्या लहानपणापासून करत. त्या इयत्ता बारावीला असतानाच, त्यांना पितृशोक झाला, लाड कुटुंब पोरके झाले. घरची थोडी का होईना, जबाबदारी उचलण्यासाठी शुभांगी बारावीच्या परीक्षेनंतर कामाला जाऊ लागल्या. काम करतानाच, त्यांनी शिक्षणही सुरू ठेवले.
पदवीधर झाल्यावर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांचा विवाह अॅड. दत्तात्रय झेमसे या अत्यंत सज्जन आणि होतकरू युवकाशी झाला. विवाहानंतर शुभांगी यांनी कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले. पुढे त्यांना दोन अपत्येही झाली. याच काळात शुभांगी यांना नगरसेविका होण्याचा योग आला. पाच वर्षांनंतर दुसर्यांदा त्यांना, नगरसेविका होण्याची संधी चालून आली. मात्र, त्यांच्या आठ वर्षांच्या लेकाचा अपघात होऊन, पायाला मार लागल्याने त्याला चालण्यासाठीच किमान दोन-तीन वर्षे लागणार होती. या काळात आई म्हणून मुलाची काळजी घेणे, यालाच प्राधान्य देत त्यांनी स्वेच्छेने ही संधी नाकारली.
कुटुंब आणि मातृत्व, बालसंगोपन हे कोणत्याही राजकीय कारकिर्दीपेक्षा महत्त्वाचे आहे, असेच त्यांचे मत होते. असे जरी असले, तरी त्यांनी त्यांचे सामाजिक कार्य सुरूच ठेवले. महिला बालक आणि दिव्यांगासाठी आजही त्या अखंड काम करत आहेत. त्या म्हणतात, "अनाथ बालक, दिव्यांग आणि महिला यांच्या आयुष्यात न्यायहक्क आणि सुविधा मिळाव्यात, यासाठी यापुढेही कार्यरत राहणार आहे. माझे कुटुंब, माझा समाज सोबत आहेच.” अॅड. शुभांगी झेमसे यांसारख्या स्त्रिया म्हणजे, प्रतिकूलतेतही सामाजिक बांधिलकी जपत, समाजसेवेतून सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित करणार्या दीपस्तंभ आहेत. नारी तू नारायणी!