सिंहस्थ कुंभमेळा आध्यात्मिक अर्थव्यवस्थेचा महामंत्र !

    01-Nov-2026
 
 
Simhastha Kumbh Mela Spiritual Economy
 
३१ ऑटोबर २०२६, दुपारी १२ वाजून २ मिनिटे, नाशिकचे रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरचे कुशावर्त तीर्थ. एकाच वेळी दोन ठिकाणी एकच धर्मध्वज फडकला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेले हे ध्वजारोहण केवळ एका सोहळ्याचीच नव्हे, तर १२ वर्षांनी येणार्‍या भारतीय सभ्यतेच्या सर्वात मोठ्या आध्यात्मिक आणि आर्थिक चक्राची सुरुवात असेल. सिंहस्थ का भरतो? याचे उत्तर पुराणाबरोबरच खगोलशास्त्रातही आहे. गुरू ग्रह जेव्हा सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा गोदावरीच्या तीरावर अमृताचा अंश येत असल्याची श्रद्धा आहे. हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी समुद्रमंथनातील अमृताचे थेंब पडले. पण, नाशिकचा सिंहस्थ इतरांपेक्षा वेगळा आहे.त्याचे वेगळेपण त्याच्या १३ आखाडे, दोन तीर्थक्षेत्रे या अनोख्या परंपरेत दडलेले आहे.
 
१७८९ मध्ये शैव आणि वैष्णव साधूंमध्ये स्नानाच्या अग्रक्रमावरून संघर्ष झाला. तेव्हा पेशव्यांनी दूरदर्शी तोडगा काढला की, वैष्णवांचे तीन आखाडे ‘दिगंबर अनी’, ‘निर्वाणी अनी’ आणि ‘निर्मोही अनी’ नाशिकच्या रामकुंड येथे स्नान करतील; तर शैवांचे सात आणि ‘उदासीन-निर्मल’चे तीन असे एकूण दहा आखाडे त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथे स्नान करतील. यामुळे एका वादाचे रूपांतर, दोन शहरांच्या समृद्ध परंपरेत झाले. संघर्षातूनही समन्वय शोधणे, हेच भारतीय धर्मव्यवस्थेचे खरे वैशिष्ट्य. हा केवळ इतिहास नसून, आज जेव्हा आपण कुंभाकडे पाहतो, तेव्हा त्याचे आध्यात्मिक-आर्थिक महत्त्व लक्षात येते.
 
गेल्या काही वर्षांत ‘टेम्पल इकोनॉमी’ हा शब्द रूढ झाला. पण, आता अर्थतज्ज्ञ त्यापुढे जाऊन ‘कुंभ इकोनॉमी’ असा अधिक व्यापक शब्द वापरत आहेत. ‘डन अ‍ॅण्ड ब्रॅडस्ट्रीट’ने तर त्याला ‘कुंभोनॉमी’ असेही म्हटले. याबाबत ‘प्रयागराज महाकुंभ २०२५’चा डेटा बोलका असून, त्यामध्ये ४० ते ४५ कोटी भाविक, २.५ लाख कोटी रुपयांचे व्यवहार, १२ लाख तात्पुरत्या नोकर्‍या आणि भारताच्या ‘जीडीपी’मध्ये ०.७७ टक्क्याचे थेट योगदान दिले होते.
यालाच ‘कुंभ मल्टिप्लायर इफेट’ म्हणतात. सरकारने ६ हजार ४०० कोटी रुपयांची पायाभूत गुंतवणूक केली आणि त्याच्या ३.१ पट म्हणजेच, जवळपास २९.२ अब्ज डॉलरचे उत्पादन त्यातून झाले. थेट खर्च ९.४ अब्ज, अप्रत्यक्ष ८.३ अब्ज आणि प्रेरित ११.५ बिलियन! हा पैसा ‘फाईव्ह स्टार’ हॉटेलच्या तिजोरीत नाही, तर गोदाकाठच्या फूलविक्रेत्याकडे, नावाड्याकडे, चहाच्या टपरीवर, टेंट बनवणार्‍या कारागिराकडेच जातो. हॉटेलचे भाडे १ लाख रुपये प्रतिरात्र असतानाही, तंबू हाऊसफुल्ल होतात. १ हजार ५०० रुपयांच्या डॉर्मेटरीपासून, ते ३५ हजार रुपयांच्या कॉटेजपर्यंत सगळे काही विकले जाते. हाच हिंदू अर्थव्यवस्थेचा विकेंद्रित, स्थानिक आणि सर्वसमावेशक असा मूळ गाभा आहे.
 
नाशिकच्या संदर्भात हा मुद्दा अधिक महत्त्वाचा! आपण अनेकदा नाशिकला ‘वाईन कॅपिटल’ म्हणून मिरवतो. तो एक उद्योग आहेच; पण नाशिकची खरी आणि शाश्वत ओळख ‘डिव्हाईन कॅपिटल’ म्हणूनच असायला हवी. कारण, ‘वाईन कॅपिटल’चा बाजार काही हजार कोटींचा, तर ‘डिव्हाईन कॅपिटल’ची अर्थव्यवस्था हजारो कोटींची आणि पिढ्यान्पिढ्या टिकणारी आहे. या ‘डिव्हाईन’ राजधानीला आता केवळ भाविकांचीच नाही, तर नव्या उपक्रमांचीही गरज आहे. पंतप्रधानांच्या ‘इनोव्हेशन फॉर सेवा’ या संकल्पनेची आणि कुंभासाठी जाहीर झालेल्या ‘इनोव्हेशन चॅलेंज’च्या अचूक वेळेची मनापासून दाद द्यावीशी वाटते.
 
कुंभ आता केवळ त्रिशूळ आणि शंखनादापुरताच मर्यादित राहिलेला नाही, तो ‘ड्रोन मॅपिंग’, ‘एआय’आधारित गर्दी व्यवस्थापन, डिजिटल दान, ‘क्यूआर’ कोडवर हरवले-सापडले केंद्र, ‘रिअल टाईम’ भाषांतर आणि सौरऊर्जेवर चालणार्‍या ‘टेंटसिटी’चा झाला आहे. प्रयागराजमध्ये अनेक ‘स्पिरिच्युअल स्टार्टअप्स’नी त्यांची उत्पादने ‘लॉन्च’ केली. केवळ नाशिकच्याच नव्हे, तर राज्यातील तरुण अभियंत्यांनी, ‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हायला हवे.
 
दि. २९ जुलै २०२७ रोजी होणारी १४ किमीची नगर प्रदक्षिणा, दि. २ ऑगस्ट आणि दि. ३१ ऑगस्ट २०२७ची दोन अमृतस्नाने, ही तर कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे व्यवस्थापन आहे. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान जर महाराष्ट्राचा युवावर्ग बनवू शकला, तर आपल्या तरुणांची एनर्जी आणि कल्पकता देशभरातील युवावर्गासाठी नक्कीच प्रेरक ठरेल. 
म्हणूनच, दि. ३१ ऑक्टोबरचे ध्वजारोहण हा एक संदेश आहे की, भारताचा विकासाचा मार्ग केवळ कारखान्यातून जात नाही, तर तो गोदावरीच्या घाटावरूनही जातो. जिथे श्रद्धा ‘रोजगार’ होते आणि संस्कृती त्यासाठीचे ‘भांडवल’. तिथे कुंभमेळा ही सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक समृद्धीकडे आणि सामाजिक सुबत्तेकडे नेणारी सुंदर यात्रा होते.
 
-प्रिया सावंत
९००४०६०३५३
(लेखिका इंडस्ट्रियल सायकॉलॉजिस्ट असून, विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांतच्या उपाध्यक्ष आहेत.)




संबंधित मजकूर