संघ शताब्दीपूर्ती काळात ६५ हजार हिंदू संमेलनांतून साधला सामाजिक संवाद; अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची माहिती

    01-Nov-2026   
 
RSS Hindu Sammelans
 
मुंबई (RSS Hindu Sammelans) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्तीदरम्यान आयोजित हिंदू संमेलने हा संघाच्या सामाजिक संपर्क उपक्रमांचा महत्त्वपूर्ण भाग ठरला. ग्रामीण भागातील गावांचे समूह करून तयार करण्यात आलेल्या मंडलांमध्ये तसेच शहरी वस्त्यांमध्ये आतापर्यंत ६५ हजार ६६० हिंदू संमेलने आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांमध्ये संवाद आणि सहभाग वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली.
 
संघाच्या वार्षिक ‘अखिल भारतीय कार्यकारी मंडळा’ची तीन दिवसीय बैठक (२, ३, ४ नोव्हेंबर) यंदा मध्य प्रदेशातील इंदूर येथे मालवा प्रांतात होत आहे. या पार्श्वभूमिवर शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. या बैठकीत शताब्दी वर्षातील कार्यक्रमांचा आढावा घेण्यासोबतच संघटनात्मक विस्तार, हिंदू संमेलने, गृहसंपर्क अभियान, सेवा कार्यांमधील समाजाचा सहभाग तसेच युवक आणि महिलांमध्ये वाढलेला संपर्क यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.(RSS Hindu Sammelans)
 
माध्यमांना संबोधित करताना सुनील आंबेकर यांनी देशभरात झालेल्या हिंदू संमेलनांतून सामाजिक संपर्काला प्राधान्य दिल्याचे सांगितले. ते म्हणाले, या संमेलनांच्या अनुभवांचा आढावा घेण्यासोबतच त्यातून प्राप्त झालेल्या सूचना आणि सामाजिक प्रतिक्रियांचा आगामी उपक्रमांमध्ये कशा प्रकारे समावेश करता येईल, यावरही बैठकीत विचार होणार आहे. शताब्दी वर्षात आयोजित कार्यक्रमांना भविष्यात सातत्यपूर्ण सामाजिक संपर्क आणि सहभागाची जोड देण्याच्या दृष्टीने ही समीक्षा महत्त्वाची ठरणार आहे. गृहसंपर्क अभियानाचाही बैठकीच्या प्रमुख विषयांमध्ये समावेश आहे.
 
गृहसंपर्क अभियानाला समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सेवा कार्यांचा विस्तार आणि सामाजिक हितासाठी काम करणाऱ्या विविध संघटनांमध्ये वाढत असलेला उत्साह यावरही चर्चा होणार आहे. अनेक संघटनांनी संघासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आवश्यकतेनुसार स्वयंसेवकांच्या सहकार्याने अशा प्रयत्नांना पुढे नेण्याबाबत विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.(RSS Hindu Sammelans)
 
ते पुढे असेही म्हणाले की, संघटनात्मक रचनेतील संभाव्य बदल, जनजागरण, पंचपरिवर्तन, अमली पदार्थांचे वाढते आव्हान, डिजिटल माध्यमांवर प्रसारित होणारा मजकूर, बाह्य शक्तींचा हस्तक्षेप आणि जागतिक परिस्थिती या विषयांवरही विचारमंथन बैठकीत होणार आहे. सरसंघचालकांच्या विदेश दौऱ्यांमधून मिळालेले अनुभव तसेच जगातील प्रमुख व्यक्तींशी संवाद अधिक व्यापक करण्याच्या रणनीतीवरही बैठकीत चर्चा होईल.
 
या बैठकीत संघाच्या विस्ताराशी संबंधित आकडेवारी आणि शताब्दी वर्षादरम्यान आलेले अनुभव हे प्रमुख विषय असतील. देशभरात संघाच्या दैनंदिन शाखांची संख्या वाढून १ लाख १ हजार १५१ झाली आहे. याशिवाय साप्ताहिक, मासिक आणि अन्य प्रकारचे मिलन कार्यक्रम देशभरातील १ लाख १० हजार ८४९ ठिकाणी सुरू आहेत. ऑक्टोबर २०२५ पासून आतापर्यंत देशभरात १३ हजार नव्या शाखा सुरू झाल्या आहेत. या आकडेवारीतून संघाच्या संघटनात्मक उपक्रमांचा भौगोलिक विस्तार स्पष्ट होतो. शताब्दी वर्षाच्या आधी संघाने तीन वर्षांसाठी कार्यविस्ताराची योजना आखली होती. या कालावधीत संघाचा विस्तार, समाजातील विविध घटकांशी संपर्क प्रस्थापित करणे आणि स्वयंसेवकांचा सहभाग व्यापक करण्यावर भर देण्यात आला. आता शताब्दी वर्षातील कार्यक्रमांची मालिका पूर्ण झाल्यानंतर अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला जाईल. कोणत्या भागांमध्ये संघाच्या गतिविधी वाढल्या, कोणत्या क्षेत्रांत समाजाचा सहभाग अधिक राहिला आणि प्राप्त अनुभवांच्या आधारे आगामी काळात कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, यावर चर्चा होणार आहे.(RSS Hindu Sammelans)
 
या तीन दिवसीय बैठकीत संघाचे सर्व सहा सहसरकार्यवाह, अखिल भारतीय कार्यविभागांचे प्रमुख आणि कार्यकारिणीचे सदस्य सहभागी होतील. याशिवाय देशभरातील ४६ प्रांतांचे प्रांत संघचालक, प्रांत कार्यवाह, प्रांत प्रचारक आणि त्यांचे सहकारी पदाधिकारी उपस्थित राहतील. संघाच्या सर्व ११ क्षेत्रांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही या बैठकीत सहभाग अपेक्षित आहे. अशा प्रकारे संघाच्या राष्ट्रीय नेतृत्वापासून विविध प्रांत आणि क्षेत्रांतील प्रमुख कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचा सहभाग या बैठकीत असणार आहे.
या पत्रकार परिषदेला सुनील आंबेकर यांच्यासह मंचावर मालवा प्रांत संघचालक डॉ. प्रकाश शास्त्री उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय सहप्रचारप्रमुख नरेंद्र ठाकूर, प्रदीप जोशी आणि मध्य क्षेत्राचे प्रचारप्रमुख कैलाशचंद्र यांचीही विशेष उपस्थिती होती.
 
महिला आणि युवकांच्या सहभागाचाही आढावा
 
शताब्दी वर्षादरम्यान आयोजित कार्यक्रमांमध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय राहिला आहे. गृहसंपर्क अभियान, हिंदू संमेलने आणि अन्य उपक्रमांच्या अनुभवांतून हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. याशिवाय शहरे, गावे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये युवकांसाठी आयोजित कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत या कार्यक्रमांचा सकारात्मक दृष्टिकोनातून आढावा घेतला जाणार आहे. समाजातील ज्या घटकांपर्यंत संघाचा संपर्क वाढला आहे, त्यांच्याकडून मिळालेल्या सूचना आणि अपेक्षांच्या आधारे आगामी उपक्रमांची दिशा निश्चित करण्यावर विचार होईल. युवकांशी संवाद, सामाजिक विषयांबाबत जागरूकता आणि सेवा कार्यांमधील सहभाग या संदर्भात मिळालेले अनुभव या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असतील.(RSS Hindu Sammelans)
 
संघटनात्मक रचनेतील बदलांवर महत्त्वपूर्ण चर्चा
 
इंदूर येथील बैठकीच्या अजेंड्यावरील एक महत्त्वाचा विषय म्हणजे संघाच्या संघटनात्मक रचनेत संभाव्य बदल. सुनील आंबेकर यांच्या माहितीनुसार, संघटनात्मक संरचनेबाबत यापूर्वी विचारविनिमय झाला आहे. आता अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत या विषयावर पुढील चर्चा होऊन भविष्यातील व्यवस्थेच्या स्वरूपाबाबत विचार केला जाईल. प्रस्तावित संघटनात्मक रचनेनुसार पुढील वर्षी मार्चपासून काम सुरू करण्याची तयारी आहे. त्यामुळे या बैठकीतील विचारमंथन संघाच्या आगामी कार्यपद्धतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासोबतच संघटनात्मक कार्यामध्ये जनजागरणाची भूमिका काय असावी, यावरही चर्चा प्रस्तावित आहे. सामाजिक जीवनात अनेक विषय असे असतात, ज्याबाबत योग्य माहिती आणि दृष्टिकोन समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक असते. अशा विषयांना जनजागरणाच्या माध्यमातून प्रभावीपणे समाजासमोर मांडण्याच्या पद्धतींवर विचार केला जाणार आहे. सामाजिक संपर्कातून मिळालेले अनुभव संघाच्या आगामी कार्यक्रमांशी कशा प्रकारे जोडता येतील, यावरही मंथन होईल.
 
अमली पदार्थांपासून डिजिटल कंटेंटपर्यंत; विविध आव्हानांवर मंथन
 
संघटनात्मक विस्तारासोबतच समकालीन सामाजिक आव्हाने आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरही बैठकीत व्यापक चर्चा होणार आहे. अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येपासून ते डिजिटल माध्यमांवर प्रसारित होणारा मजकूर, बाह्य शक्तींचा हस्तक्षेप आणि बदलती जागतिक परिस्थिती हे विषय चर्चेच्या केंद्रस्थानी असतील. विजयादशमीच्या निमित्ताने सरसंघचालकांनी केलेल्या उद्बोधनात मांडलेल्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आगामी कार्यदिशेच्या दृष्टीने चर्चा होणार आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत समोर येणाऱ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर जनजागरण आणि संघटनात्मक उपक्रमांची भूमिका यावर विचार केला जाईल. या चर्चांच्या आधारे आगामी काळातील प्राधान्यक्रम आणि कार्यक्रमांना दिशा देण्याचा प्रयत्न असेल. याशिवाय संघाच्या पंचपरिवर्तनाशी संबंधित विषयांचाही बैठकीच्या अजेंड्यात समावेश आहे. या विषयांवर आगामी काळासाठी योजना तयार करण्याबाबत विचारविनिमय होईल. शताब्दी वर्षादरम्यान झालेल्या कार्यक्रमांतून मिळालेले अनुभव आगामी उपक्रमांशी जोडणे हा या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असेल.(RSS Hindu Sammelans)
 
अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन दौऱ्यांतील अनुभवांवरही चर्चा
 
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या यंदाच्या अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन दौऱ्यांवरही अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या दौऱ्यांदरम्यान त्यांनी हिंदुत्वाची संकल्पना, भारताची प्रगती आणि जागतिक शांततेच्या संदर्भात भारताची भूमिका या विषयांवर आपले विचार मांडले होते. विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्तींशी झालेल्या संवादाच्या अनुभवांचाही आढावा घेतला जाणार आहे. यासोबतच आगामी काळात जागतिक स्तरावरील संपर्क आणि संवादाचे प्रयत्न अधिक व्यापक करण्याबाबत विचार होईल. बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारताचे विचार आणि दृष्टिकोन जागतिक स्तरावर मांडण्यासंदर्भातील अनुभव या चर्चेचा भाग असतील. सरसंघचालकांच्या आगामी वर्षातील विदेश दौऱ्यांच्या नियोजनावरही बैठकीत विचार केला जाणार आहे.
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर