मुंबई, (Railway Pass Holders Higher Class Travel) : रेल्वेच्या पासधारकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे रेल्वे कर्मचाऱ्यांचे विशेषाधिकार पास (Privilege Pass), सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पूरक पास (Post Retirement Complimentary Pass) आणि विधवा पासधारकांना राजधानी, दुरांतो आणि शताब्दी यांसारख्या प्रीमियम रेल्वे गाड्यांमध्ये त्यांच्या पात्र वर्गापेक्षा उच्च वर्गातून प्रवास करता येणार आहे. यासाठी संबंधित उच्च वर्गाच्या तिकिटाचे लागू असलेले अतिरिक्त भाडे भरावे लागणार आहे. रेल्वे बोर्डाने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भात स्पष्टीकरण जारी केले आहे.
रेल्वे बोर्डाच्या आरबीई क्रमांक ८६/२०२६ नुसार, रेल्वे सेवक (पास) नियम, १९८६ मधील अनुसूची-२ च्या नियम ३(एक्स) अंतर्गत ही सवलत लागू करण्यात आली आहे. यापूर्वी मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये पासधारकांना पात्रतेपेक्षा उच्च वर्गात प्रवास करण्यासाठी अतिरिक्त भाडे भरून प्रवासाची सुविधा उपलब्ध होती. मात्र, राजधानी, दुरांतो आणि शताब्दी यांसारख्या प्रीमियम गाड्यांच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो का, याबाबत स्पष्टता नव्हती.(Railway Pass Holders Higher Class Travel)
या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने वाणिज्य संचालनालयाशी चर्चा करून प्रीमियम गाड्यांनाही नियम ३(एक्स) लागू असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पात्रतेपेक्षा उच्च वर्गात प्रवास करू इच्छिणाऱ्या पासधारकांना लागू भाड्यातील फरक भरून प्रवास करता येणार आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी CRIS/PRS आणि CRIS/HRMS यांना आरक्षण प्रणाली (PRS) तसेच HRMS मधील ई-पास मॉड्यूलमध्ये आवश्यक बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे पासधारकांच्या प्रवासाच्या सुविधेत वाढ होणार असून, यासंदर्भातील यापूर्वीच्या सर्व सूचना रद्द करून सुधारित प्रवास पात्रता लागू करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या वित्त संचालनालयाच्या सहमतीने हा निर्णय जारी करण्यात आला आहे.(Railway Pass Holders Higher Class Travel)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.