विश्वाची जुळी भावंडे?

    01-Nov-2026

Multiverse Theory 
 
आपण ज्या विश्वात राहतो, तेच संपूर्ण वास्तव असल्याचे आपण सहज गृहीत धरतो. आपल्या डोक्यावर दिसणारे आकाश, असंख्य तारे, अब्जावधी दीर्घिका आणि त्यांच्या पलीकडे पसरलेली अपरिमित काळोखी पोकळी, हेच सर्वकाही आहे, असे आपल्याला वाटते. पण, एक क्षण कल्पना करा, या विश्वाच्या पलीकडे आणखी एखादे विश्व असेल तर? कदाचित, तिथेही तारे जन्माला येत असतील, ग्रह तयार होत असतील, दीर्घिका फिरत असतील आणि कदाचित, पृथ्वीसारख्या जगावर जीवनाची एखादी वेगळीच कहाणीही लिहिली जात असेल. अशा विश्वांची संख्या एक-दोन नव्हे, तर असंख्य असू शकते. काही आपल्या विश्वासारखी, काही पूर्णपणे वेगळी आणि काही तर भौतिक नियमांच्या वेगळ्याच स्वरूपात अस्तित्वात असू शकतात.
 
विज्ञानकथांमधील कल्पना वाटणारा हा प्रश्न, आधुनिक भौतिकशास्त्रातील अत्यंत रोचक चर्चेचा विषय आहे. या व्यापक कल्पनेला ‘बहुविश्व’ किंवा ‘मल्टिव्हर्स’ म्हटले जाते. ‘बहुविश्व’ ही सिद्ध वैज्ञानिक वस्तुस्थिती नाही. ‘मल्टिव्हर्स’ हा एकच सिद्धान्त नसून, विश्वाच्या स्वरूपाविषयीच्या अनेक वेगवेगळ्या सैद्धांतिक कल्पनांसाठी वापरला जाणारा व्यापक शब्द आहे. त्यातील काही कल्पना विश्वाच्या आरंभीच्या अत्यंत वेगवान विस्ताराशी संबंधित आहेत. काही ‘क्वांटम’ यांत्रिकीच्या व्याख्यांशी, तर काही मूलभूत भौतिक स्थिरांक आणि संभाव्य विश्वरचनांशी निगडित आहेत. त्यामुळे ‘अनेक विश्वे आहेत’ असे सरळ विधान करण्यापेक्षा, ‘काही सिद्धान्तांनुसार अनेक विश्वांची शक्यता निर्माण होते’ असे म्हणणे अधिक वैज्ञानिक ठरते.
 
बहुविश्वाच्या कल्पनेशी जोडलेली एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे, ‘विश्व-प्रसरण’ म्हणजेच, ‘कॉस्मिक इन्फ्लेशन’! विश्वाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात अवकाशाने अत्यंत अल्पकाळात प्रचंड वेगाने विस्तार केला असावा, अशी ‘विश्व-प्रसरणा’ची कल्पना आहे. ही प्रक्रिया विश्वाची मोठ्या प्रमाणावरील, जवळजवळ सपाट रचना कशी अस्तित्वात आली आणि वैश्विक सूक्ष्म तरंग पार्श्वभूमीमध्ये दिसून येणार्‍या सूक्ष्म घनता-विचलनांची बीजे कशी पेरली गेली असावीत, हे स्पष्ट करू शकते. विश्व-प्रसरणाच्या काही प्रारूपांमध्ये विश्वाचा विस्तार काही भागांत थांबून, इतर भागांत सुरू राहू शकतो. अशा परिस्थितीत स्वतंत्र ‘बुडबुडे’ किंवा बुडबुड्यांसारखे वैश्विक प्रदेश तयार होऊ शकतात. प्रत्येक बुडबुड्याच्या आत, विश्वाचा विस्तार आणि उत्क्रांती स्थानिक पातळीवर स्वतंत्रपणे घडू शकते. याच संकल्पनेला ‘शाश्वत विश्व-प्रसरण’ म्हणतात.
 
या ‘बबल विश्वां’ची कल्पना विशेष रोचक अशीच. कारण, प्रत्येक विश्वातील परिस्थिती अगदी आपल्या विश्वासारखीच असेल असे नाही. काही सैद्धांतिक प्रारूपांमध्ये मूलभूत स्थिरांकांची मूल्ये वेगळी असू शकतात. गुरुत्वाकर्षणाची तीव्रता, कणांचे गुणधर्म किंवा विश्वातील ऊर्जेचे वितरण बदलल्यास तार्‍यांची निर्मिती, दीर्घिकांची उत्क्रांती आणि ग्रहांची निर्मिती यांनाही वेगळे स्वरूप प्राप्त होऊ शकते. काही विश्वांत तारे तयार होण्यासाठी आवश्यक परिस्थितीच निर्माण झाली नसेल, काही विश्वे फार अल्पकाळ टिकतील, तर काहींची रचना आपल्या विश्वापेक्षा अगदीच वेगळी असू शकते.
 
मग, या कल्पनेत ‘आपल्यासारख्या दुसर्‍या पृथ्वी’ची शक्यता येते कुठे? येथे दोन वेगळ्या गोष्टी समजून घेणे आवश्यक असेच. पहिली म्हणजे, आपल्या स्वतःच्या विश्वात पृथ्वीसारखे ग्रह असणे आणि दुसरी म्हणजे, पूर्णपणे दुसरे विश्व अस्तित्वात असणे. पहिली शक्यता खगोलशास्त्रात प्रत्यक्ष निरीक्षणाच्या कक्षेत आहे. आपल्या आकाशगंगेतच हजारो परग्रह सापडले असून, त्यापैकी काही ग्रह त्यांच्या तार्‍याभोवती अशा अंतरावर फिरतात की, पृष्ठभागावर योग्य परिस्थिती असल्यास द्रव पाणी टिकण्याची शयता असू शकते. पण, असा ग्रह सापडला, तरी तो आपल्या विश्वातीलच एक भाग असेल. बहुविश्वातील ‘दुसरे विश्व’ मात्र, आपल्या अवकाश-कालाच्या निरीक्षणीय विश्वापलीकडील स्वतंत्र वास्तव असू शकते.
 
‘बहुविश्व’ संकल्पनेचा सर्वांत कठीण प्रश्न म्हणजे, त्याचा पुरावा कसा मिळवणार? विज्ञानात कोणतीही कल्पना महत्त्वाची ठरण्यासाठी तिची चाचणी करता येणे आवश्यक असते. एखादे दुसरे विश्व आपल्या निरीक्षणीय विश्वापासून इतके दूर असेल की, त्यातून कोणताही प्रकाश किंवा संकेत आपल्यापर्यंत पोहोचणार नसेल, तर त्याचे थेट निरीक्षण करणेच अशक्य ठरू शकते. तरीही, काही वैज्ञानिकांनी दुसर्‍या ‘बबल विश्वा’शी संभाव्य टक्कर झाल्यास आपल्या विश्वाच्या सुरुवातीच्या प्रकाशात, विशेषतः वैश्विक सूक्ष्म तरंग पार्श्वभूमीत काही विशिष्ट नमुने दिसू शकतात का, याचा अभ्यास केला आहे. अशा शक्य संकेतांचा शोध घेण्यात आला असला, तरी आजपर्यंत दुसर्‍या विश्वांच्या अस्तित्वाचा निर्णायक निरीक्षणात्मक पुरावा मिळालेला नाही.
 
बहुविश्वाची आणखी एक सुप्रसिद्ध संकल्पना ‘क्वांटम मेकॅनिस’मधून उदयास येते. २०व्या शतकाच्या मध्यावर ‘ह्यू एव्हरेट’ यांनी मांडलेल्या ‘मेनी-वर्ल्ड्स इंटरप्रिटेशन’नुसार, ‘क्वांटम’ प्रक्रियांचे सर्व संभाव्य परिणाम एका व्यापक ‘क्वांटम’ वर्णनामध्ये स्वतंत्र शाखा म्हणून पुढे येऊ शकतात. सर्वसामान्य भाषेत, प्रत्येक संभाव्य परिणामासाठी एक वेगळे ‘विश्व’ निर्माण होते. तथापि, हे ‘बबल युनिव्हर्स’च्या संकल्पनेपेक्षा मूलभूतपणे वेगळे आहे. येथे चर्चा ‘क्वांटम’ अवस्थांच्या शाखा-विभाजनावर केंद्रित आहे, तर वैश्विक बहुविश्वामध्ये विश्वाच्या स्वतंत्र प्रदेशांच्या निर्मितीचा समावेश असतो. ‘मेनी-वर्ल्ड्स इंटरप्रिटेशन’ हा ‘क्वांटम मेकॅनिस’ स्पष्ट करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अनेक दृष्टिकोनांपैकी एक आहे.
 
याहूनही वेगळी एक कल्पना म्हणजे, गणितीय किंवा ‘लॅण्डस्केप’ प्रकारच्या बहुविश्व संकल्पना. काही सिद्धान्तांनुसार, मूलभूत भौतिक नियमांची एकापेक्षा अधिक सुसंगत मांडणी शय असू शकते. अशा वेगवेगळ्या शयतांमधून विविध प्रकारच्या विश्वरचना निर्माण होऊ शकतात, अशी कल्पना काही सैद्धांतिक भौतिकशास्त्रीय चौकटींमध्ये दिसते. मात्र, इथले मोठे आव्हान म्हणजे, गणिती शयता आणि प्रत्यक्ष भौतिक वास्तव यामध्ये नेमका दुवा कसा प्रस्थापित करायचा?
 
बहुविश्वांच्या अस्तित्वाच्या संकल्पनेच्या चर्चेत एक प्रश्न वारंवार उपस्थित होतो की, आपल्या विश्वातील भौतिक स्थिरांकांची मूल्ये जीवनासाठी इतकी योग्य का आहेत? जर गुरुत्वाकर्षण, विद्युतचुंबकीय परस्पर क्रिया किंवा मूलभूत कणांचे गुणधर्म थोडे जरी वेगळे असते, तर तार्‍यांचे स्वरूप, रसायनशास्त्र आणि खुद्द जीवनाचे स्वरूपच पूर्णपणे बदलले असते. काही विचारवंत आणि भौतिकशास्त्रज्ञ या परिस्थितीचे स्पष्टीकरण, ‘अ‍ॅन्थ्रोपिक तत्त्व’ या चौकटीतून देतात. या संकल्पनेतील एका दृष्टिकोनानुसार, जर अनेक विश्वे असतील, तर त्यांपैकी एखाद्या विश्वात जीवन निर्माण होण्यासाठी योग्य परिस्थिती असणे स्वाभाविक आहे. कारण, जीवन शक्य असलेल्या विश्वातच आपण राहू शकतो. मात्र याचा अर्थ, अनेक विश्वे खरोखर अस्तित्वात आहेत, असा नाही. त्यासाठी अजून ठोस पुरावा नाही.
 
‘एखादी गोष्ट शक्य आहे’ आणि ‘ती खरोखर अस्तित्वात आहे, याचा पुरावा मिळाला आहे’ या दोन वेगळ्या गोष्टी. हे बहुविश्वाच्या चर्चेतील महत्त्वाचे वैज्ञानिक तत्त्व आहे. एखादी कल्पना गणिताच्या दृष्टीने योग्य वाटली, तरी ती निसर्गात प्रत्यक्ष अस्तित्वात आहेच, असे नाही. त्यासाठी निरीक्षण, प्रयोग आणि मोजमाप यांमधून पुरावा मिळणे आवश्यक ठरते. बहुविश्वाच्या बाबतीत असा पुरावा मिळवणे कठीण असून, कदाचित आपल्या विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील काही खुणांमधून इतर विश्वांचे अप्रत्यक्ष संकेत मिळू शकतील. भविष्यात अधिक प्रगत दुर्बिणी आणि वैश्विक निरीक्षणांमुळे काही नवीन गोष्टी समोर येऊ शकतात किंवा दुसरे विश्व आपल्यापासून इतके दूर असू शकते की, त्यातून आलेली कोणतीही माहिती आपल्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. त्यामुळे त्या विश्वाच्या अस्तित्वाचा थेट पुरावा मिळवणे, कदाचित आपल्याला कधीच शय होणार नाही.
 
तरीही, या प्रश्नाचे महत्त्व कमी होत नाही. कारण, बहुविश्वाची कल्पना आपल्याला केवळ ‘दुसरे विश्व आहे का?’ एवढेच विचारायला लावत नाही. ती ‘विश्व’ या शब्दाचा अर्थच नव्याने विचारायला भाग पाडते. आपण पाहू शकतो, तेच संपूर्ण वास्तव आहे का? आपल्या निरीक्षणीय विश्वाच्या पलीकडे अवकाश-कालाचे आणखी प्रदेश आहेत का? भौतिक नियम सर्वत्र एकसारखेच आहेत का? आणि सर्वांत मूलभूत प्रश्न म्हणजे, ‘संपूर्ण विश्व’ म्हटले; तर त्याचा अर्थ नेमका काय?
 
आजच्या घडीला विज्ञानाकडे या प्रश्नाचे निश्चित उत्तर नाही. आपले विश्व एकमेव आहे की, ते अनेक विश्वांपैकी फक्त एक आहे, हेही अद्याप उघडे कोडेच आहे. आपण ज्या विश्वाला ‘संपूर्ण विश्व’ समजतो, ते खरोखरच संपूर्ण आहे का?
 
लेखक- सुजाता बाबर




संबंधित मजकूर