मुंबई (Madras High Court Periyar Statue Removal) : तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील एका प्राचीन शिवमंदिराच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात आलेला ई. व्ही. रामासामी नायकर तथा पेरियार यांचा पुतळा हटविण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने दिले आहेत. तंजावरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा पुतळा चार आठवड्यांच्या आत अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. कंदियूर येथील प्राचीन ब्रह्मा सिरकांडीश्वर मंदिराच्या मालकीच्या जागेवर हा पुतळा उभारण्यात आला होता. भगवान शिवाच्या भक्तांसाठी श्रद्धास्थान असलेल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातील पुतळ्याच्या स्थापनेला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
अशी माहिती आहे की, मदुराई जिल्ह्यातील एझुमलाई येथील रहिवासी रामा रविकुमार यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती वेलमुरुगन आणि रामकृष्णन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागाची आवश्यक परवानगी न घेताच मंदिराच्या मालकीच्या जागेवर हा पुतळा उभारण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. हिंदू धार्मिक श्रद्धांवर टीका करणाऱ्या व्यक्तीचा पुतळा हिंदू मंदिराच्या मालकीच्या जागेवर कसा उभारण्यात आला, असा प्रश्नही या प्रकरणामुळे उपस्थित झाला आहे.(Madras High Court Periyar Statue Removal)
याचिकाकर्ते रविकुमार यांच्या म्हणण्यानुसार, मंदिराच्या जागेवर पेरियार यांचा पुतळा उभारण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत संबंधित विभागाकडे माहिती मागवली होती. १४ मे रोजी मंदिराचे कार्यकारी अधिकारी तथा सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्यांकडून त्यांना उत्तर मिळाले. संबंधित मंदिर हे प्राचीन असल्याचे आणि ४ सप्टेंबर २०२५ रोजी मंदिराचा महाकुंभाभिषेक सोहळा पार पडल्याचे या उत्तरात नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे, मंदिराच्या मालकीच्या जागेवर ई. व्ही. रामासामी यांचा पुतळा उभारण्यासाठी हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागाने कोणतीही परवानगी अथवा मंजुरी दिलेली नसल्याचेही माहिती अधिकारातून स्पष्ट झाले.
विभागाची आवश्यक परवानगी नसतानाही पुतळा उभारण्यात आल्याचे या उत्तरावरून सिद्ध होत असल्याचा युक्तिवाद रविकुमार यांनी केला. त्यानंतर त्यांनी पुतळा हटविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. माहिती अधिकारातून मिळालेल्या उत्तरात मंदिराच्या मालकीच्या जागेवरील अन्य काही अतिक्रमणांचाही उल्लेख करण्यात आला होता. देवस्थान विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही अतिक्रमणे हटविण्याची नोंद केली होती. यामध्ये चो. राजा, मोहम्मद इस्माईल, धर्मराज, जगदीशन, मेरी पॅप्रिस्टल, दिनेश कुमार, ओ. आर. एच. फारूक, सी. शेखर आणि ओ. आर. मोहम्मद फारूक यांचा समावेश होता. याशिवाय मंदिराच्या परिसराभोवती उभारण्यात आलेल्या स्टीलच्या जाळीच्या कुंपणासाठी मंदिराच्या निधीतून १ लाख ३४ हजार ९१५ रुपये खर्च करण्यात आल्याची माहितीही या उत्तरातून समोर आली.(Madras High Court Periyar Statue Removal)
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, मंदिराच्या संरक्षक भिंतीजवळ १९९० मध्ये पेरियार यांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र, त्यांचा आक्षेप केवळ पुतळा उभारण्यासाठी आवश्यक परवानगी घेतली नसल्यापुरता मर्यादित नव्हता. पुतळ्याच्या खाली लावण्यात आलेल्या शिलालेखातील मजकुरावरही त्यांनी आक्षेप घेतला. या शिलालेखात देवाच्या अस्तित्वाचे नाकारत देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या आणि त्याची उपासना करणाऱ्या लोकांविषयी अवमानकारक भाषा वापरण्यात आली आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. मंदिराच्या मालकीच्या जागेवर हिंदू धार्मिक श्रद्धांचा स्पष्टपणे विरोध करणारा संदेश असलेला पुतळा उभारणे हे त्या परिसराच्या धार्मिक स्वरूपाशी विसंगत असल्याचा युक्तिवादही त्यांनी केला.
दरम्यान, मद्रास उच्च न्यायालयाने आता तंजावरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मंदिराच्या मालकीच्या जागेवरून पेरियार यांचा पुतळा हटवून अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत निश्चित केली आहे.(Madras High Court Periyar Statue Removal)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक