वेद ही भारतीय संस्कृतीची आदिम चेतना. ऋषींच्या अंतःप्रज्ञेतून प्रकटलेले हे ज्ञान शब्द, स्वर आणि उच्चारांच्या अखंड परंपरेतून एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे प्रवाहित होत राहिले. या परंपरेचे जतन म्हणजे ऋषीप्रणीत ज्ञानदृष्टी आणि आध्यात्मिक साधनेचा दीप अखंड तेवत ठेवणे होय. आपले संपूर्ण आयुष्य वेदाध्ययन, वेदाध्यापन आणि वेदसेवेसाठी समर्पित करणारे वैदिक सम्राट पूज्यपाद श्रीकृष्णशास्त्री गोडशे गुरुजी हे अशाच तपःपूत गुरुपरंपरेचे तेजस्वी प्रतिनिधी. गोडशे गुरुजी यांच्या जन्ममहोत्सवाच्या सांगतेनिमित्त दि. २८ ऑक्टोबर २०२६ ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित शुल यजुर्वेद माध्यंदिन शाखेचे शतसंहिता पारायण व स्वाहाकार महायज्ञाच्यानिमित्त गोडशे गुरुजी यांच्या पवित्र चरणी समर्पित ही भावपूर्ण शब्दसुमनांजली!
दमूर्ती श्रीकृष्णशास्त्री गोडशे गुरुजी यांचा जन्म दि. ७ ऑक्टोबर १९२५ रोजी, उत्तर प्रदेशातील परम पावन नगरी असलेल्या वाराणसीत (काशी) झाला. ते वेदविद्यापारंगत वैदिक सम्राट काशिनाथभट्ट गोडशे आणि माता अन्नपूर्णा यांचे ज्येष्ठ सुपुत्र. बालपणीच ‘अन्नप्राशन संस्कारा’च्या वेळी इतर सर्व वस्तू बाजूला सारून, बाल श्रीकृष्णाने ‘ग्रंथ आणि सरस्वती’ची निवड केली, जो त्यांच्या अलौकिक भविष्याचा पहिलाच दैवी संकेत होता.
वयाच्या अवघ्या १५व्या वर्षापर्यंत गुरुजींनी ऋषिपरंपरेनुसार, ‘शुल यजुर्वेद माध्यंदिन शाखे’ची संहिता, शतपथब्राह्मण, पद, क्रम, जटा अष्ट विकृती आणि सलक्षण घनपाठ प्रातिशाख्य अत्यंत लिष्ट स्तरांचे संपूर्ण अध्ययन, कंठस्थ दशग्रंथांचे अध्ययन आपल्या वडिलांकडून परंपरागत पद्धतीने पूर्ण केले. काशीमधील त्यांचे गुरुजी म्हणजे, सातव्या पिढीतील अलौकिक विद्वान, काशीमधील तत्कालीन अत्यंत ज्येष्ठ-श्रेष्ठ वैदिक विद्वान वेदाचार्य रामनाथजी मिश्र यांनी, गुरुजींची अफाट विद्वत्ता आणि तीक्ष्ण बुद्धी, एकही स्वर उच्चारणाची चूक न करता पाठांतर करण्याच्या क्षमतेवर प्रसन्न होऊन या लहान वयाच्या बालकाचा ’दिव्य वैदिक मूर्ती’ म्हणून गौरव केला होता. गुरुजी सांगत की, श्रीरामनाथजी मिश्र म्हणजे वेदविद्येचा ब्रह्मराक्षसच म्हणजेच, काशीतील सर्वोच्च महान पंडित. सहा फूट उंची, पहाडी आवाज, त्यांच्यासमोर ‘पदक्रम जटाघनादि’ चर्चेने म्हणणारे गोडशे गुरुजी एकमेव होते. काशीच्या प्रसिद्ध ‘सांगवेद विद्यालय’ येथे गोडशे गुरुजी यांनी ‘वेदां’चे सखोल अध्ययन केले. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी त्यांनी ‘शुल यजुर्वेदाची घनपाठा’पर्यंतची, सर्वोच्च काठिण्य पातळीची परीक्षाही अत्यंत उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली.
परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर गुरुजींनी श्रीक्षेत्र द्वारका वेद भवन, गुजरात येथे, तब्बल एक तप ‘शुल यजुर्वेदा’चे अविरत अध्यापन करुन, तेथील संपूर्ण पिढीच वेदसंपन्न केली. प. पू. स्वामी गंगेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने, गुरुजींचे नाशिकच्या पवित्र पावनभूमीत आगमन झाले. येथील प्रसिद्ध वेद मंदिरात त्यांनी अनेक वर्षे ‘प्रधानाचार्य’ (मुख्य आचार्य) म्हणून, नि:स्वार्थीपणे ‘वेद’ अध्यापनाचे कार्य केले. जीवनातील प्रथम चार विद्यार्थी घनांत शिकविले. त्यानंतर प. पू. स्वामी हृदयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या कैलासमठ येथे सन २००३ पर्यंत त्यांनी, अविरतपणे ‘वेद’ अध्यापनाचे पवित्र कार्य केले.
गुरुजींनी वयाच्या अवघ्या १८व्या वर्षापासून अध्यापनाच्या या पवित्र कार्याला सुरुवात केली होती. आज त्यांचे हजारो विद्यार्थी संपूर्ण देशभर आणि जगाच्या पाठीवर, सनातन धर्माचा ध्वज फडकवत आहेत. गुरुजींचा विद्यार्थी आहे असे समजल्यावर त्याची कुणी परीक्षाच घेत नसे. कारण, दगडालादेखील ‘वेद’ म्हणण्यास भाग पाडतील, अशी त्यांची ख्याती होती. विद्यार्थ्यांनी आपल्यासारखेच मंत्रोच्चार करावेत, हा त्यांचा कायमच प्रयत्न असे. अत्यंत निःस्वार्थीपणे त्यांनी विद्यार्थ्यांना पुत्रवत प्रेम दिले.
त्यामुळेच आजचा जो शताब्दी सांगता महोत्सव होत आहे, ते केवळ त्यांच्यावरील असलेल्या निखळ श्रद्धा व निस्सीम प्रेमाचेच प्रतिफळ. त्यांनी अनेक वैदिक आचार-विचार संपन्न घनपाठी वैदिक विद्यार्थी तयार करून वेदपुरुषाची, भारतीय ज्ञानपरंपरेची सेवा केली आहे. वेदांची ही मुखोद्गत परंपरा, शिष्यांद्वारे पुढील पिढीत निरपेक्ष बुद्धीने प्रसारित करण्याचे महान कार्यच त्यांनी संपूर्ण जीवनभर केले. महाराष्ट्रामध्ये ‘शुल यजुर्वेदा’चे विशेष करून, ‘विकृती पाठा’चे पुनरुज्जीवन करण्याचे एकमेव श्रेय गोडशे गुरुजींना जाते.
गोडशे गुरुजींच्या विद्वत्तेचा आदर भारताच्या सर्वोच्च आध्यात्मिक आणि सामाजिक पीठांनी नेहमीच केला. शृंगेरी शारदा पीठ, तसेच कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य, व अन्य पीठानीही गुरुजींना ‘वैदिक सम्राट’ ही सर्वोच्च पदवी बहाल केली. तसेच परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले (स्वाध्याय परिवार) आणि वेद दर्शनाचार्य प. पू. स्वामी गंगेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्याकडूनही, गुरुजींचा ‘वैदिक रत्न’ म्हणून सर्वोच्च पदवीने सन्मान करण्यात आला होता.
पूज्य स्वामी गंगेश्वरानंदजी महाराजद्वारा प्रकाशित ‘भगवान चतुर्वेद’ या जगातील अत्यंत पवित्र आणि महाकाय ग्रंथातील, ‘शुल यजुर्वेद माध्यंदिन संहिता’ मुख्य संपादकीय (संपादकत्व) कार्य गोडशे गुरुजींनी स्वतः केले आहे. हा ग्रंथ आजही संपूर्ण भारतभर ‘सर्वांत शुद्ध आणि प्रामाणिक प्रत’ म्हणूनच सर्वोच्च मान्यता बाळगून आहे.
काशीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर श्रीगुरुजींचे यज्ञकार्यदेखील, गुरुजींच्या मार्गदर्शनाखालीच अत्यंत यशस्वी, विधिवत सिद्ध झाले होते. नाशिकमध्ये अमृत महोत्सवी कार्यक्रम व ‘सहस्रचंद्रदर्शन’ हे कार्यक्रम अतिशय विलक्षण पद्धतीने, सर्व शिष्यांनी साजरे केले. पुणे, दिल्ली, भोपाळ, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता, उज्जैन, काशी, सोलापूर, आळंदी, पंढरपूर, नागपूर इत्यादी भारताच्या प्रत्येक मुख्य शहरांत, त्यांचा सर्वोच्च नागरी सत्कारही संपन्न झाला होता. त्यांनी भारतभरात अनेक भव्यदिव्य यज्ञ-यागांचे ‘आचार्यत्व’ (मुख्य संचलन) केले होतेच, शिवाय विविध ठिकाणी ‘वेदपारायणे’ आणि ‘घनपारायणे’ही पूर्ण केली होती.
गुरुजींनी प्रतिकूल काळातही वेदांची परंपरा पूर्णपणे नि:स्पृहतेने जतन केली. वयाच्या ८४व्या वर्षांपर्यंत आपली आचारसंहिता आणि सतेज व गायत्री तुल्य वेदसंहिता, पदक्रम, जटा घनपाठापर्यंत अध्ययन निरभ्रांत ठेवणारे गोडशे गुरुजी म्हणजे, अपौरुषेय वेदांचे जिवंत एकमेव विद्यापीठच.
गोडशे गुरुजींचा हा अलौकिक ‘वेद’ वारसा, आज त्यांचे प्रमुख पट्टशिष्यही दिमाखदारपणे प्रवाहित करीत आहेत. गोडशे गुरुजींची वेदपरंपरेची ज्ञानगंगा गोदाकाठावर व सर्वत्र भारतभर अविरत घुमत आहे. आज गोडशे गुरुजींच्या जन्मशताब्दी सांगता महोत्सवाच्या निमित्ताने, सर्व भारतभरातील शिष्य-प्रशिष्यांनी आयोजित केलेले पाच दिवसीय १०० ‘शुल यजुर्वेद संहिता पारायणे’ आणि ‘स्वाहाकार’ हीच त्यांच्या चरणी वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरावी. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण काळामध्येच हा कार्यक्रम संपन्न होतोय, हा अतिशय पुण्यप्रत क्षण. या कार्यक्रमांचा कळस म्हणजे, दक्षिणाम्णाय शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधू शेखर भारती महास्वामीजी यांचा आशीर्वाद व प्रमुख उपस्थितीत ‘पूर्णाहुती’ कार्यक्रम म्हणजे, शताब्दीतील सर्वोत्कृष्ट पुण्यदायी क्षण! मी निश्चितपणे नमूद करू इच्छितो की, अनेक पिढ्यान्पिढ्या श्रीगुरुजींचा वारसा हा पुढे चालू राहील व गुरुजी हे कायम अजरामर राहतील, यात शंकाच नाही. गुरुजींना विनम्र श्रद्धांजली!
(लेखक नाशिकच्या महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचे प्रधानाचार्य संस्थापक आहेत.)
लेखक-वेदमूर्ती रवींद्र पैठणे