दुष्काळ म्हटले की डोळ्यांसमोर उभी राहते ती तहानलेली जमीन, करपलेली पिके आणि पाण्यासाठी वणवण करणारी माणसे. पण जमिनीवरच्या पर्जन्याच्या कमतरतेचे पडसाद समुद्राच्या पाण्यातही उमटू शकतात, ही बाब आपल्या सहज लक्षात येत नाही. कारण समुद्र आणि जमीन या दोन स्वतंत्र परिसंस्था असल्या, तरी त्यांचे नाते पाऊस, वारे, तापमान आणि नद्यांच्या प्रवाहातून घट्ट जोडलेले आहे. ’एल निनो’, मान्सूनमधील बदल आणि समुद्राच्या तापमानातील चढउतार यांचा सागरी अन्नसाखळीवर होणारा परिणाम अखेरीस मत्स्यसंपत्तीपर्यंत पोहोचू शकतो. महाराष्ट्रातील दुष्काळाचे सावट आणि त्याचा समुद्र आणि कोळी बांधवांच्या उपजीविकेवर होणार्या सांभव्य परिणामांचा मागोवा घेणारा हा लेख..
महाराष्ट्रात यावर्षी जुलै महिन्यात बहुतेक भागांत भरपूर पाऊस पडला. शेतकर्यांनी पेरण्या केल्या. पण, नंतर पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके जळू लागली. त्याने दुष्काळाचा दाह बसू लागला. तसे ‘एल निनो’मुळे यावर्षी पाऊस कमीच राहणार, हा अंदाज हवामान खात्याने दिला होताच. तरी पण आपण पावसाविषयी आशावादी होतोच. महाराष्ट्रात सध्या दुष्काळाच्या झळांमुळे केवळ शेतकरीच नव्हे, तर सर्वसामान्य जनताही त्रस्त झाली आहे. अन्नधान्याचे भाव वाढत आहेत, धरणांमध्ये साठवलेले पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत पुरावे, यासाठी पाणीवापराचे नियोजन आणि खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. या दुष्काळामुळे काही छोट्या नद्या कोरड्या पडल्या असून; गोदावरी, कृष्णा, भीमासारख्या मोठ्या नद्यांचा प्रवाहही पुढे आटेल. परिणामी, नद्यांतील जीवसृष्टीसही धोका आहेच.
महाराष्ट्राला ७२० ते ८७७ किमी समुद्रकिनारा असून, आपल्या समुद्रातून मत्स्यउत्पादन भरपूर होते आहे. महाराष्ट्र देशातील प्रमुख सागरी मत्स्यउत्पादक राज्यांपैकी एक. राज्यातील सागरी मासे उत्पादन २०२३-२४ मध्ये सुमारे ४.३४ लाख मेट्रिक टन होते; तर २०२४-२५ मध्ये ते वाढून, ४.६४ लाख मेट्रिक टन एवढे झाले. भारतातील मत्स्य क्षेत्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठे योगदान देते. २०२३-२४ मध्ये भारताने १७.८१ लाख मेट्रिक टन समुद्री खाद्यपदार्थांची निर्यात करून, सुमारे ६० हजार ५२४ कोटींचे परकीय चलन मिळवले. पण, सध्याच्या दुष्काळाचा परिणाम समुद्रातील मत्स्य उत्पादनावर होऊ शकतो. परिणामी, समुद्रावर उपजीविका असलेल्या कोळी बांधवांनाही, या दुष्काळाची झळ पोहोचेल का? हा प्रश्न अनेकांना पडणे स्वाभाविकच.
प्रशांत महासागरातील ‘एल निनो’चा प्रभाव सर्वच महासागरात होतो, तसा आपल्या अरबी समुद्रावरही दिसतो. ‘एल निनो’ विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील पाण्याचे तापमान, सरासरीपेक्षा वाढण्याशी संबंधित हवामानविषयक घटना आहे. समुद्र आणि वातावरण यांच्यातील परस्परसंबंधांमध्ये त्यामुळे बदल होतात. या बदलांचा परिणाम जगातील विविध प्रदेशांतील पर्जन्यमान, वारे आणि तापमानावर होतो. भारतीय मान्सूनच्या दृष्टीने ‘एल निनो’ला विशेष महत्त्व. ‘एल निनो’च्या काळात भारतातील नैऋत्य मान्सून कमकुवत होण्याची शक्यता वाढते. मात्र, प्रत्येक ‘एल निनो’च्या वर्षी भारतात सर्वत्र कमी पाऊस पडतोच, असे नाही. हिंद महासागराच्या तापमानातील बदल, ‘इंडियन ओशन डायपोल’ आणि इतर वातावरणीय घटकही मान्सूनवर परिणाम करतात.
भारताच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दि. ३० जुलै २०२६ रोजी दिलेल्या माहितीनुसार, २०२६च्या नैऋत्य मान्सूनच्या काळात ‘एल निनो’ची स्थिती विकसित झाली होती आणि जुलैमध्ये ती मध्यम स्वरूपाची होती. तिची तीव्रता आणि भारतीय हवामानावरील परिणाम हे इतर महासागरीय व वातावरणीय परिस्थितींवरही अवलंबून असतात. ‘एल निनो’चा परिणाम समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, वार्यांची दिशा व तीव्रता, पाण्याचे अभिसरण आणि पोषकद्रव्यांचे वितरण यावर होऊन यामध्ये बदल होतात, याचाच परिणाम समुद्रातील अन्नसाखळीवर होतो.
भारताच्या पश्चिम किनार्याजवळील अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वार्यांना विशेष महत्त्व आहे. या वार्यांमुळे समुद्राच्या खोल भागातील थंड आणि पोषकद्रव्ययुक्त पाणी, काही किनारी भागांत वर येते. या प्रक्रियेला ‘अपवेलिंग’ म्हणतात. या पोषकद्रव्यांमुळे ‘वनस्पती प्लवक’ (फायटोप्लँटन) या सूक्ष्म वनस्पतींची वाढ होते. त्यांच्यावर ‘प्राणी प्लवक’ (झुप्लँटन) आणि इतर सूक्ष्मजीव अवलंबून असतात. पुढे हे जीव अनेक माशांचे अन्न ठरतात. समुद्राच्या तापमानात वाढ झाली, वार्यांचे स्वरूप बदलले किंवा पोषकद्रव्यांचा पुरवठा कमी झाला, तर या अन्नसाखळीतील काही घटक प्रभावित होऊन माशांच्या वाढीवर, प्रजननावर, पिलांच्या जगण्यावर किंवा त्यांच्या वितरणावर याचा परिणाम होतो.
२०१५ मधील तीव्र ‘एल निनो’च्या काळात, पूर्व अरबी समुद्रातील प्राथमिक उत्पादकतेत घट झाल्याचे एका संशोधनात नोंदवले गेले आहे. दुसर्या अभ्यासात भारतीय तेल सार्डिनच्या प्रजननावर झालेला पाऊस, ‘अपवेलिंग’ आणि समुद्राच्या तापमानातील बदलांचा संबंध तपासण्यात आला. हे संशोधन हवामान आणि मत्स्यसंपत्ती यांचा संबंध समजून घेण्यासाठी महत्त्वाचेच आहे; परंतु त्यावरून महाराष्ट्रातील सर्वच माशांचे उत्पादन प्रत्येक ‘एल निनो’च्या वर्षी घटते, असा सरसकट निष्कर्ष काढता येत नाही.
दुष्काळामुळे नद्यांमधून समुद्रात येणार्या गोड्या पाण्याचे प्रमाणही, काही भागांत कमी होऊ शकते. त्यामुळे खाड्या, नदीमुखे आणि किनारी पाण्यातील क्षारता व पोषकद्रव्यांच्या वितरणात बदल होऊन, अशा बदलांचा परिणाम काही माशांच्या पिलांवर, झिंग्यांच्या जीवनचक्रावर आणि खाड्यांवर अवलंबून असलेल्या जीवांवर होतो. समुद्रातील परिस्थिती ही केवळ पावसावरच अवलंबून नसते. माशांची संख्या आणि मासेमारी यांवर समुद्राचे तापमान, प्रवाह, प्रजननाचा काळ, अन्नाची उपलब्धता, मासेमारीचा प्रयत्न, जाळ्यांचा प्रकार आणि इतर अनेक घटक परिणाम करतात. काही प्रजातींची उपलब्धता कमी होऊ शकते, तर काही प्रजातींचे वितरण बदलल्यामुळे त्या दुसर्या भागांत अधिक आढळू शकतात. त्यामुळे यावर्षी पापलेट, सुरमई, रावस, झिंगे किंवा खेकडे कमी मिळतील, असे आताच निश्चितपणे सांगणे योग्य ठरणार नाही.
दुष्काळ काळात प्रखर सूर्यप्रकाशामुळे, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याची शक्यता असते. मात्र, समुद्राचे तापमान केवळ सूर्यप्रकाशावरच अवलंबून आहे, असे नाही. वार्यांचा वेग, बाष्पीभवन, समुद्रातील प्रवाह आणि खोल पाण्याचे वर येणे, यांचाही त्यावर परिणाम होतोच. त्यामुळे जमिनीवरील उष्णता आणि समुद्राच्या तापमानातील वाढीचा थेट संबंध गृहीत धरता येत नाही. अरबी समुद्रात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान दीर्घकाळ असामान्यरीत्या वाढल्यास, त्याला ‘समुद्री उष्णतेची लाट’ म्हणतात. अशा परिस्थितीत पाण्याचे थर मिसळण्याची प्रक्रिया आणि खोल पाण्यातील पोषकद्रव्यांचा वरच्या थरात होणारा पुरवठा बदलू शकतो. त्याचा परिणाम फायटोप्लँटनच्या वाढीवर आणि पुढे सागरी अन्नसाखळीवर होतो.
माशांच्या प्रजननाचा काळ, पिलांची वाढ, अन्नाची उपलब्धता आणि स्थलांतर यांवरही तापमानाचा परिणाम होतो. त्यामुळे काही प्रजातींची पकड कमी होऊ शकते किंवा त्यांचे वितरण बदलू शकते. मात्र, या प्रक्रियांचा महाराष्ट्राच्या किनार्यावरील मत्स्य उत्पादनावर यंदा किती परिणाम झाला आहे, हे ठरवण्यासाठी समुद्राच्या तापमानाची आणि मासळी उतराईची प्रत्यक्ष आकडेवारीच तपासणे आवश्यक आहे.
दुष्काळ आणि हवामानातील बदलांचा मत्स्यसंपत्तीवर परिणामाची उदाहरणे जगभरात दिसून येतात. भारताच्या आग्नेय अरबी समुद्रात २०१२ ते २०१५ या काळात, तेल सार्डिनच्या पकडीत मोठी घट झाली. संशोधनानुसार, कमकुवत मान्सून, ‘एल निनो’शी संबंधित समुद्राच्या तापमानातील वाढ, माशांच्या प्रजननातील बदल आणि अतिमासेमारी या घटकांचे या घटीमध्ये योगदान होते. त्यामुळे हवामानातील बदल आणि मत्स्यसंपत्ती यांचा संबंध स्पष्ट होतोच; परंतु याचे एकमेव कारण दुष्काळ किंवा ‘एल निनो’ नव्हते.
ऑस्ट्रेलियातील खाड्यांमध्ये केलेल्या संशोधनातही, दुष्काळाच्या काळात काही व्यावसायिक माशांच्या पकडीचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले. नदीतून येणारे गोडे पाणी कमी झाल्यास खाडीतील क्षारता, पोषकद्रव्यांचा पुरवठा आणि माशांच्या अधिवासात बदल होऊन त्याचा परिणाम मत्स्यसंपत्तीवर होतो.
दुष्काळाच्या काळात कोळी बांधवांनी काय करावे?
दुष्काळाचा परिणाम समुद्रातील मत्स्यसंपत्तीवर होईल की नाही, याची वाट पाहण्यापेक्षा मच्छीमार कुटुंबांनी आर्थिक आणि व्यावसायिक नियोजनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
मासेमारीचा खर्च आणि उत्पन्न यांचा हिशोब ठेवावा : एखाद्या फेरीत मिळालेल्या मासळीच्या प्रमाणाबरोबरच इंधन, बर्फ, मजुरी आणि दुरुस्तीचा खर्च नोंदवावा. मासळीची पकड कमी असताना, तोट्यात जाणार्या फेर्या ओळखण्यासाठी याचा उपयोग होईल.
मासळीचे मूल्यवर्धन करावे : शक्य असेल तेथे स्वच्छता, योग्य पद्धतीने वाळवणे, खारवणे, बर्फाचा वापर आणि सुरक्षित साठवणीवर भर द्यावा. महिलांचे बचत गट, सहकारी संस्था आणि स्थानिक बाजारपेठ यांच्या मदतीने, प्रक्रिया केलेल्या मासळीची विक्री वाढवता येऊ शकते. मात्र, त्यासाठी स्वच्छता, दर्जा आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेणेही आवश्यक आहे.
शासकीय योजनांची माहिती घ्यावी : मत्स्यव्यवसाय विभाग, मत्स्य सहकारी संस्था आणि स्थानिक प्रशासनाकडून उपलब्ध कर्जसुविधा, विमा, अनुदान आणि इतर मदत योजनांची माहिती घ्यावी. प्रत्येक योजनेच्या पात्रतेच्या अटी तपासूनच त्यासाठी अर्ज करावा.
उपलब्ध संसाधनांचा शाश्वत वापर करावा : मासळी कमी मिळत असल्यास अधिक दूर जाऊन किंवा अधिक इंधन खर्च करून, मासेमारी करणे नेहमीच फायदेशीर ठरेल असे नाही. स्थानिक परिस्थिती, हवामानाचे अंदाज आणि मासेमारीविषयक सल्ले यांचा विचार करून निर्णय घ्यावा. प्रजननकाळातील निर्बंध आणि किमान आकारासंबंधी नियमांचे पालन करणेही आवश्यकच आहे.
महाराष्ट्राच्या किनार्यावरील मत्स्यसंपत्तीवर सध्याच्या दुष्काळाचा, हवामानातील बदलांचा परिणाम समजून घेण्यासाठी दीर्घकालीन निरीक्षणे आवश्यक आहेत. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, पाऊस, नदीप्रवाह, खाड्यांतील क्षारता, प्लँटनची उपलब्धता आणि प्रजातींनुसार मासळीची पकड यांचा एकत्रित अभ्यास व्हायला हवा.
महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग, केंद्रीय समुद्री मत्स्य संशोधन संस्था, हवामान विभाग, विद्यापीठे आणि मच्छीमार सहकारी संस्थांनी उपलब्ध माहितीचा उपयोग करून, स्थानिक पातळीवर मार्गदर्शन करणेही गरजेचेच आहे. मासेमारीच्या उत्पन्नात घट झाल्यास, त्याची कारणे केवळ हवामानात शोधण्याऐवजी मासेमारीचा वाढलेला खर्च, बाजारभाव, संसाधनांवरील दबाव आणि इतर सामाजिक-आर्थिक घटकही तपासले पाहिजेत.
सारांशात दुष्काळाचा परिणाम शेतीपुरताच मर्यादित राहत नसून, त्याचे पडसाद समुद्रावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या जीवनावरही उमटू शकतात. ‘एल निनो’ आणि महासागरातील बदल यांचा सागरी परिसंस्थांशी संबंध आहे. मात्र, महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादनावर यावर्षी नेमका किती परिणाम होईल, हे वैज्ञानिक निरीक्षणे आणि अधिकृत आकडेवारीच्या आधारेच स्पष्ट होईल.
(लेखक मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे सेवानिवृत्त संचालक आहेत.)
लेखक -प्रा. डॉ. बाळासाहेब कुलकर्णी