मुंबईत गोमातेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा संतापजनक प्रकार

साकीनाक्यात १५ दुचाकी, वीज मीटर आणि दुकानांचीही जाळपोळ; सीसीटीव्हीच्या आधारे आकाश यादवला अटक

    01-Nov-2026   

 Mumbai Sakinaka Cow Burning Case
 
मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात गोमातेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ एका किरकोळ वादातून संतापलेल्या आकाश यादव याने गायीच्या तोंडावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा, तसेच परिसरातील १५ दुचाकी पेटवून देण्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता त्याने वीज मीटर आणि तीन ते चार व्यावसायिक दुकानांच्या भागांचीही जाळपोळ केली. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपीला बुधवारी अटक केली.
 
खैरणी रोडवरील चौधरी इस्टेट कंपाउंड, यादव नगर परिसरात पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. स्थानिक रहिवासी विजय यादव आणि त्यांचा भाऊ जनावरांच्या गोठ्याजवळ झोपले असताना गायींच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांना जाग आली. बाहेर येऊन पाहिले असता एका गायीच्या तोंडाला आग लागल्याचे दिसले. विजय यांच्या भावाने तातडीने आग विझवली; मात्र तोपर्यंत गाय भाजली होती. विजय यांच्या गोठ्यात आठ जनावरे असल्याची माहिती आहे. त्यानंतर परिसरातील दुचाकी, वीज मीटर आणि दुकानांनाही आग लावल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी आकाशने पार्क केलेल्या काही दुचाकी पाडल्या होत्या. यावरून विजय यादव यांनी त्याला जाब विचारला असता दोघांमध्ये वाद झाला. आकाशने शिवीगाळ करून धमकी दिल्याचाही आरोप आहे. याच वादातून सूड घेण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचा संशय आहे.
 
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहाटे पाच ते सहा या वेळेत आकाश पेट्रोलची बाटली घेऊन फिरताना दिसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याआधारे त्याची ओळख पटवून अटक करण्यात आली. आरोपी दारूच्या नशेत असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यासह अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. गोमातेवरील या क्रूर कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, जखमी जनावरावर उपचार आणि या अमानुष कृत्यामागील नेमकी पार्श्वभूमी तपासण्याची मागणी होत आहे.
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर