मोबाईल, इंटरनेटसारख्या संपर्कसाधनांच्या प्रगतीमुळे पारंपरिक टपालसेवेने आज बव्हंशी कात टाकली असली तरी बचत खाते, विमासेवा या माध्यमातून आजही भारतीयांचा टपालसेवेशी अगदी जवळचा संबंध येतो. तेव्हा, आज दि. ९ ऑक्टोबर रोजीचे ‘जागतिक टपाल दिना’चे औचित्य लक्षात घेता, १५ ऑक्टोबरपर्यंत ‘राष्ट्रीय टपाल सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने नव्या स्वरुपातील भारतीय टपाल सेवेचा आढावा घेणारा हा लेख...
रतीयांचे भारतीय टपाल सेवेशी अनेक दशकांचे ऋणानुबंध जुळलेले. नेहमीच्या टपालापासून बचत खाते असो अथवा बहुमूल्य विमासेवा वा आर्थिक व्यवहार, या सार्यांसाठी भारतीय नागरिकांचा भारतीय टपालसेवेशी अगदी जवळचा संबंध असतोच. अशा या आपल्या टपालसेवेने आपल्या प्रदीर्घकालीन सेवेला नवे स्वरूप देण्यासाठी व त्याला अधिकाधिक ग्राहकाभिमुख व उपयुक्त बनविण्यासाठी व्यापक योजना हाती घेतली आहे.
एरवी जनसामान्यांकडून ‘सरकारी खाते’ म्हणून गणल्या जाणार्या टपाल विभागात आता नव्याने व लक्षणीय स्वरूपात बदल घडून येत आहेत. व्यवसाय-व्यवस्थापनाच्या संदर्भात सांगायचे झाल्यास, हे बदल प्रामुख्याने सहा व्यावसायिक-सेवा क्षेत्रात घडवून आणण्याचा व त्यांची अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण व धोरणात्मक निर्णय केंद्र सरकार व टपाल मंत्रालयाने घेतला आहे.
टपाल विभागाच्या नव्या व बदलत्या धोरणानुसार, प्राधान्य तत्त्वावर व नजीकच्या भविष्यात टपाल खात्यांतर्गत टपालसेवा, पार्सलसेवा, आंतरराष्ट्रीय टपालसेवा, टपाल विमा योजना, वित्तीय सेवा व ग्राहकाभिमुख सेवा आवश्यकतेनुसार व अधिकाधिक तंत्रज्ञानाचा अवलंब व या सार्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी टपाल खात्यांतर्गत विविध स्तरांवरील कर्मचार्यांच्या प्रशिक्षणाद्वारे त्यांचा क्षमता विकास या मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे.
नव्या व्यवस्थापन-प्रशासन पद्धतीमध्ये टपाल खात्यामध्ये विशेष धोरणात्मक निर्णयांनुसार वर नमूद केलेल्या टपाल खात्यांतर्गत प्रमुख व्यावसायिक विभागांचे अपेक्षित व प्रभावीपणे संचालन करण्यासाठी कर्मचार्यांचे कामकाज, कार्यक्षमता व टपाल खात्यातर्फे देण्यात येणार्या विविध सेवा यांचे योग्य पद्धतीने व वेळेत मोजमाप आणि विश्लेषण करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान व कार्यपद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे तंत्रज्ञानाचा अवलंब करताना मुख्य भर ग्राहककेंद्रित टपालसेवा देण्यावर असणार आहे. सद्यस्थितीत भारतीय टपालसेवेशी वार्षिक व्यावसायिक वाढ १६ टक्क्यांनी होत आहे. यासंदर्भातील उपलब्ध आकडेवारीनुसार, भारतीय टपाल खात्याची २०२५ या आर्थिक वर्षातील उलाढाल १३ हजार २१८ कोटी होती, जी २०२६च्या आर्थिक वर्षातील उपलब्ध तिमाही, उपलब्ध वार्षिक उलाढालीनुसार सुमारे १५ हजार २९६ कोटींवर गेली आहे.
टपाल खात्याच्या व्यावसायिक प्राधान्य तत्त्वानुसार, यापुढे टपाल विभागाचे व्यावसायिक उत्पन्न व एकूण खर्च याचा ताळमेळ व विश्लेषण यापुढे त्रैमासिक स्वरूपात करण्यात येणार असून, हे विश्लेषण करताना यापुढे पुढील मुद्द्यांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहतूक व दळणवळण : प्रगत माहिती तंत्रज्ञानावर आधारित दळणवळण व्यवस्था ही बाब टपाल खात्यासाठी ग्राहकसेवा म्हणून अत्यंत महत्त्वाची ठरते. विशेषतः टपाल क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या व देशांतर्गत दळणवळणासह मालवाहतूक क्षेत्रातील वाढत्या व्यावसायिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही बाब म्हणजे एक मोठेच आव्हान ठरले आहे. अर्थात, याबाबतीत भारतीय टपाल खात्याच्या काही जमेच्या बाबी आहेत. यामध्ये प्रामुख्याने भारतातील जनसामान्यांचा वैयक्तिक व व्यावसायिक स्वरूपात टपाल खात्यावर असणारा पिढीजात विश्वास व टपाल विभागाचे देशव्यापी व अगदी ग्रामीण स्तरापर्यंत असणारे कार्यालयीन व कर्मचार्यांचे प्रस्थापित जाळे यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.
यासंदर्भात २०२६च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतीय टपाल खात्याने केलेल्या मालवाहतूक व पार्सलसेवा यासंदर्भात उपलब्ध आकडेवारी बोलकी ठरते. यासंदर्भात प्रकाशित तपशील व आकडेवारीनुसार भारतीय टपाल खात्याने २०२६ मध्ये आजवर ७.४९ कोटी देशांतर्गत पार्सल, ७२ आंतरराष्ट्रीय पार्सल व ८३ लाख टपाल पार्सलची वाहतूक केली आहे. या पार्सलसेवेद्वारे टपाल विभाग आपल्या ग्राहकांना वेळेत व माफक दरात आणि सातत्याने समाधानकारक सेवा पुरवीत असते.
भारतीय टपालसेवा आपल्या सेवा आता काही आंतरराष्ट्रीय पार्सल वाहतूक सेवादारांसह ‘अॅमेझॉन’ ‘फ्लिपकार्ट’, ‘शिपरॉकेट’ व ‘डीटीडीसी’ यांसारख्या प्रमुख व्यवसाय आणि व्यावसायिकांना उपलब्ध करून देत आहे. यालाच व्यावसायिक जोड देत जागतिक स्तरावर अधिक वेगवान व कार्यक्षम पद्धतीची टपालसेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय टपाल खात्याने ‘डीएचएल’सारख्या कंपन्यांशी सेवा-सामंजस्य करार केले आहेत. यासाठी विशेष पद्धतीच्या ‘डाकघर निर्यात केंद्र’ सेवा व पद्धतीची निर्मिती करण्यात येणार आहे. यातूनच देशांतर्गत ४८ तासांत पार्सलसेवा देण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी टपाल खात्यांतर्गत विशेष वितरण पद्धती, जलद हाताळणी व वेगवान सेवेवर विशेष भर दिला जाणार आहे.
कार्यक्षम व ग्राहकाभिमुख वित्तीय सेवा : टपाल बँकिंग व्यवस्थेअंतर्गत जनसामान्यांसह ग्राहकांसाठी एकत्रित व एकात्मिक स्वरूपाची बचत खात्यासह सर्व प्रकारची बँकिंग सेवा, विमा सेवा, विभिन्न सरकारी स्वरूपाच्या आर्थिक सेवा, ज्येष्ठ नागरिक वा महिलांसाठी विशेष इ.चा प्रामुख्याने समावेश होतो. थोडक्यात, म्हणजे एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेत उपलब्ध असणार्या सर्व प्रकारच्या आर्थिक सेवा टपाल गृह बँकेद्वारा उपलब्ध करून दिल्या जातात, हे विशेष!
विस्ताराद्वारे व्यवसाय विकास : भारतीय टपाल खात्याने आपल्या विस्ताराद्वारे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सेवाविस्तार करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. यासाठी प्रगत व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यासाठी मूलभूत स्वरूपात टपालघरांच्या रचना व आखणीमध्ये सुधारणा करून त्याद्वारे टपाल कार्यालये व कर्मचार्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर’सारख्या संस्था व विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे.
ग्राहकाभिमुख व्यवसाय : टपाल खात्याचा भर यापुढे अधिकाधिक स्वरूपात समाधानकारक ग्राहकसेवा देण्यावर राहणार आहे. हे उद्दिष्ट केवळ कार्यपद्धतीचे पालन करण्यावरच समाधान व मानता टपालसेवेला अधिकाधिक जनता व ग्राहकाभिमुख बनविण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी टपाल व्यवहारात अद्ययावत तंत्रज्ञान व प्रगत कार्यपद्धतीचा अवलंब करणे, वेगवान दळणवळण व पार्सलसेवा, अधिकाधिक आकर्षक व लाभदायी आर्थिक सेवा व कामाचा व्याप वाढविणे, यावर मुख्य भर दिला जाणार आहे.
कर्मचारी प्रशिक्षण व कार्यक्षमता : शासन-प्रशासन पद्धती वा व्यवस्थेत सुधारणांसह बदल घडवून आणण्यासाठी व त्यांची अपेक्षित आणि यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचार्यांना सर्वांगीण स्वरूपात व पुरेशा प्रमाणात प्रशिक्षण देणे आवश्यक ठरते. कारण, नव्या नियोजनाची यशस्वी अंमलबजावणी त्यावरच अवलंबून असते.
कर्मचारी प्रशिक्षण व विविध संदर्भात कौशल्यविकास यासाठी देखील टपाल खात्याने विशेष मोहीम हाती घेतली आहे. हे कौशल्याधारित प्रशिक्षण सर्व स्तरांवरील टपाल कर्मचार्यांसाठी प्राधान्य तत्त्वावर आयोजित करण्यात आले असून, या प्रशिक्षणात प्रशासन सेवा, ग्राहक समाधान, कामाच्या ठरावीक पद्धतींसह हाताळणी, तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने काम करणे इ.चा समावेश करण्यात आला असून, मुख्य म्हणजे विविध टप्प्यांसह टपाल कार्यालये व अन्य आस्थापनांची नव्याने आकर्षित व उपयुक्त स्वरूपाने बांधकामासह रचना करण्यात आली आहे.
थोडक्यात, म्हणजे भारतीय टपालसेवेने नियोजनबद्ध स्वरूपात कात टाकली असून, त्याचा लाभ आगामी काळात ग्राहकांसह टपाल कर्मचारी व प्रशासनासह सर्व संबंधितांना होणार आहे.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६