नाना प्रसिद्ध, वादग्रस्त, बेफाम असे नटाला साजेशे आयुष्य जगला. बदलत्या काळाचे शिवधनुष्य नानाने लीलया पेलले. नटाला इंधनासारखी लागणारी प्रसिद्धी त्याने पुरेपूर मिळविली. त्याच्या रसिक प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनातून तो कधीच पुसला गेला नाही आणि जाणारही नाही!
नाना गेला... ‘नटसम्राट’ वगैरे आदरार्थी उपाध्या भरपूर कमावलेला हा नट आदरार्थी वचने लागावी अशा वकुबाचाच होता. पण, नट चिरतरुण असतात, अमर असतात. कारण, ते माणसांशी अंतर्बाह्य जोडले जातात. माणसांना त्यांच्यात स्वत:च्या जीवनातले चढ-उतार सापडतात. स्वत:ला जसे एकेरी संबोधले जाते, तसेच ते नटांच्याही बाबतीत होते. तिथे आदराची भिंत कोसळून पडते व काळजाचे नाते आकाराला येते. नानाचा जीवनसंघर्ष हा असाच होता. नाना प्रसिद्ध, वादग्रस्त, बेफाम असे नटाला साजेशे आयुष्य जगला. बदलत्या काळाचे शिवधनुष्य नानाने लीलया पेलले. नटाला इंधनासारखी लागणारी प्रसिद्धी त्याने पुरेपूर मिळविली. त्याच्या रसिक प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनातून तो कधीच पुसला गेला नाही आणि जाणारही नाही!
मुळात नाना ‘विजया मेहता’ या जिवंत विद्यापीठाचा रसरशीत विद्यार्थी! विजयाबाईंनी जी माणसे रंगभूमीवरून मराठी-हिंदी सिने व मनोरंजनसृष्टीत आणून सोडली, त्यात नानाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. जंगलातून धरून आणलेल्या रुबाबदार, अस्सल आणि बेदरकार ‘वनराजा’सारखा नाना होता. अशी व्यक्तिमत्त्वे प्रशिक्षित करता येत नाहीत. कारण, ती उपजतच अस्सल असतात. नाना, विक्रम गोखले हे अशाच पठडीतले नट. अशा नटांना फार फार तर वळण लावता येते. हे काम विजयाबाईंनी लीलया केले. नानामधला ‘पुरुष’ बाईंनी उत्तम जपला. नाना पाटेकर, विक्रम गोखलेंचे तीर्थरूप चंद्रकांत गोखले या द्वयीने साकारलेले ‘पुरुष’ हे नाटक मराठी रंगभूमीवर त्यावेळी वेगळे वळण घेऊन आले. नानाचा रांगडेपणा या सगळ्यातून प्रेक्षकांपर्यंत आला. नाना साकारात असलेल्या ‘गुलाबराव’ने महाराष्ट्राला वेड लावले. दोन हजारांहून अधिक यशस्वी प्रयोग झाल्यानंतर एक गोष्ट नानाच्या लक्षात आली की, त्याच्या प्रवेशाला लोक टाळ्या वाजवतात, शिट्या वाजवतात, थिएटर डोक्यावर घेतात. नानाचे संवाद चालू असताना हे सगळे सुरू होते आणि या गोंधळात चंद्रकांत गोखले, रिमा लागूंसारख्या दिग्गज नटांचे संवादही ऐकू येत नाहीत. हा त्यांचा अपमानच असतो. नानाने मग एक शक्कल लढविली. त्याने प्रयोग सुरू होण्याआधी प्रेक्षकांच्या गराड्यात जाऊन त्याच्या शैलीने प्रेक्षकांशी गप्पा मारायला सुरुवात केली. मग प्रयोगही नीट पुढे जायला लागले.
नानाच्या वागण्याविषयी इतक्या खर्या-खोट्या दंतकथा असतानाही वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षीही हा माणूस त्या चंदेरी दुनियेत संदर्भहीन झाला नाही. त्याच्याकडे काम होते. याचे गमक नानामधल्या बुद्धिमान नटामध्ये लपले आहे. विजयाबाईंचा हा पट्टशिष्य देशाच्या नकाशावर आला, तो ‘तिरंगा’ सिनेमातल्या ‘इन्स्पेक्टर वागळे’मुळे. सार्या देशाला हिंदीतल्या दमदार संवादफेकीने वेड लावले. नाना प्रसिद्धीच्या लाटेवर आरूढ झाला. नानाने गंभीर भूमिकाच केल्या, असे नाही, तर विनोदी, खलनायकी सगळ्याच भूमिका त्याने उत्तम साकारल्या. पैशासाठी भरपूर सिनेमे घ्यायचे नाहीत; पण जे घ्यायचे त्यात जीव ओतून द्यायचा, असे नानाचे होते. ‘मी भरपूर पैसे घेतो,’ असे तो ठणकावून सांगायचा. मात्र, ‘स्टारडम’साठी लागणार्या ‘ग्लॅमर’पासून तो ठरवून दूर राहिला. त्याला आवडेल तसा तो राहिला. त्याचा वेश, मेकअप न करता सहज कुठेही वावरणे, हे अस्सल होते. सृजनाच्या कामाला मुक्तहस्ताने हक्काचे मानधन देण्याबाबत आपला समाज कसा कद्रूपणे वागू शकतो, याचे नानाला चांगलेच भान होते. त्यामुळे व्यवहार तो स्वभावासारखाच खणखणीत करायचा.
आवडत्या मित्रांना ठरवून जेवायला बोलावणे व त्यांना स्वत: शिजवून खायला घालणे, हा त्याचा आवडीचा छंद. नानावर सामाजिक भानाचा संस्कार होता. आपल्या मिळकतीतला मोठा हिस्सा तो सामाजिक कामाला द्यायचा. आमटेंच्या प्रकल्पावर जाऊन पडेल ते काम करण्यापासून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यापर्यंत त्याने सगळे केले. आपल्या सिनेमाचे घसघशीत मानधन ठरवून व्यवहार पूर्ण झाला की, निर्मात्यालाच थेट एखाद्या सामाजिक कामाला त्याच मानधनाचा भला मोठा हिस्सा देण्याचे कामही नानाने केले.
अत्यंत आक्रमक स्वभावाचा हा नट त्याच्या भारदस्त आवाजामुळे चांगलाच भाव खाऊन जायचा. ‘वॉल्ट डिस्ने’च्या काही फिल्मसाठीदेखील नानाने आपला आवाज दिला होता. नानाला राजकारण उत्तम समजायचे.
सर्वच राजकीय पक्षांत त्याचे मित्र होते. मात्र, तो प्रांत आपला नाही, याची त्याला पुरेपूर जाणीव होती. सिनेमातून त्याला जेव्हा उसंत मिळाली किंवा त्याने ती काढली, तेव्हा तेव्हा त्याने कुठल्या ना कुठल्या सामाजिक कामाला हात लावला. नटाचे वय बदलले, काम मिळेनासे झाले की, हा त्याच्या जीवनातला सगळ्यात अवघड काळ असतो. नानाच्या वाट्याला असा काळ मात्र कधीच आला नाही. त्याचे कारण रंगभूमीवरून आलेला आत्मविश्वास त्याच्याठायी पुरेपूर होता. वयाला साजेशा भूमिका त्याला मिळाल्या आणि त्याने त्याचे सोनेही केले. मात्र, हिंदीतल्या कोणत्याही बड्या नटासमोर त्याने त्याचा ‘आब’ ढळू दिला नाही. दक्षिणेचा सुपरस्टार असलेल्या रजनीकांतसोबत नानाने केलेला ‘काला’ हा सिनेमा दक्षिणेत जोरदार चालला. रजनीकांत मोठा नट असला, तरी या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारणार्या नानाने आपल्या अभिनयाचे वलय पुरेपूर राखले. नाना आपल्या अभिनयाने अजरामर झाला. त्याला कवी, तत्त्वज्ञ, सामाजिक कार्यकर्ता अनेक रूपाने भेटला. मात्र, आपण नट आहोत याची त्याला पुरेपूर जाणीव होती. अशा या कलंदराला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली