संघर्षातून यशाची ‘दिव्यदृष्टी’

    09-Oct-2026

Chetana Mulye Inspirational Success Story
 
जन्मजात दृष्टिदोष. त्यामुळे हातातील पांढरी काठी त्यांच्या स्वावलंबनाचे प्रतीक ठरली. अशा या दहिसरमधील पेशाने बँकर असलेल्या प्रज्ञाचक्षू चेतना मुळ्ये यांचा संघर्षमय जीवनप्रवास उलगडणारा लेख...
 
बालपणात घरातल्या घरात वावरताना चेतना नकळतपणे वस्तूंवर आदळत होत्या. चालताना त्यांचा धक्का अजाणतेपणी समोरच्याला लागे. अवघ्या काही वर्षांच्या असतानाच त्यांच्यातल्या या दृष्टिदोषाची जाणीव पालकांना झाली. त्यावर नावाजलेल्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडे उपचारही केले. पण, त्याचा काही परिणाम झाला नाही. दुर्धर आजाराने जन्मजातच चेतना यांच्या पदरी दृष्टी दिव्यांगत्व पडले. पण, त्यामुळे त्यांच्या जगण्याला मर्यादा आल्या नाहीत, उलट, त्यांनी त्याचा खुल्या मनाने स्वीकार करत आत्मनिर्भरतेची कास धरली.
 
जळगाव जिल्ह्यातील अमोदा हे चेतना यांचे मूळ गाव. त्यांचे वडील नाशिकमधील एका साखर कारखान्यात नोकरी करत होते. त्यामुळे पूर्ण कुटुंब नाशिकमध्ये स्थलांतरित झाले होते. बालपण नाशिकमध्ये गेले असले, तरी चेतना यांच्या स्वावलंबनाच्या पंखांना मुंबईतच बळ मिळाले. आज त्या ४६ वर्षांच्या असून, अंधाराला केवळ डोळ्यांमध्येच कैद करत नोकरी आणि घर अशा दोन्ही आघाड्यांवर समर्थपणे आयुष्याचा गाडा हाकत आहेत.
 
रंग, शब्द यांची समज येण्याआधीच चेतना यांनाही दृष्टी क्षमतेचा सामना करावा लागला. चार भावंडे आणि आई-वडील असे त्यांचे षट्कोनी कुटुंब. अन्य तिघांप्रमाणे चेतना यांनाही सामान्य शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला. पण, सोबतच्या सामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत त्यांना ज्ञानार्जनात अडचणी येत होत्या. अंशतः दृष्टी असल्याने लिहिता, वाचताना मर्यादा यायच्या. एके दिवशी फळ्यावरचे वाचता न आल्याने गुरुजींनी त्यांना धपाटा मारला. त्यामुळे दुसर्‍या दिवसापासून शाळेत जायचेच नाही, असा त्यांनी जणू निश्चयच केला. अवघ्या पहिलीच्या वर्गातला अजाणतेपणातला तो निर्धार कदाचित त्यांच्यातल्या संघर्षाची चाहूल देत होता.
 
बाबांच्या मित्राच्या सांगण्यावरून उत्तराखंडच्या ‘ब्लाईंड’ शाळेची माहिती घेण्यात आली. पण, एवढ्या लहान मुलीला इतके लांब कसे पाठवणार? अशी भयचिंता पालकांना भेडसावू लागली. त्याच वेळी मुंबईतील ‘श्रीमती कमला मेहता दादर स्कूल फॉर द ब्लाईंड शाळे’चे नाव समोर आले. आई-वडिलांचे एकमत झाल्यावर इवल्याशा चेतना यांचा दादरमधील दृष्टिहीन निवासी शाळेत प्रवेश झाला. तेथूनच त्यांच्या आयुष्याला दिशा मिळाली. सर्वच विद्यार्थ्यांमध्ये उणे-अधिक दृष्टिदोष साधर्म्य असल्याने आपसुकच शाळेत सामान्य-विशेष विद्यार्थी हा भेद नाहीसा झाला. शाळेच्या चार भिंतीत चेतना यांच्यावर समाजात वावरण्याचे संस्कार घडू लागले. त्यांची बोटे त्या ‘ब्रेल लिपी’ला सरावू लागली. दहावीच्या परीक्षेत अपार मेहनत घेत चेतना यांनी घवघवीत यश संपादन केले.
 
दहावीनंतर शिक्षणासोबतच चेतना यांच्या स्वावलंबी प्रवासाची परीक्षा सुरू झाली. पांढर्‍या काठीला हाताळण्याचे धडे त्यांनी कमला मेहता शाळेतील चार भिंतींत गिरवले होते. आता त्या पांढर्‍याफट्ट काठीला आधार बनवत मुंबईच्या रस्त्यांवरून प्रत्यक्षात प्रवास करायचा होता. हिंदमाता ते माटुंगा अशा बहुपर्यायी प्रवासाचे अंतर कापायचे होते. तेही त्यांनी यशस्वी करून दाखवले. या प्रवासादरम्यान कधी चुकीच्या ठिकाणी उतरणे, कधी मार्ग चुकणे, कधी बराच वेळ बसची वाट बघत राहणे, अशा प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. बर्‍याचदा अनेकजण मदतीसाठी स्वतःहून धावून आल्याचे चेतना सांगतात.
 
पुढे रुईया महाविद्यालयातून ‘मराठी साहित्य’ विषयातून पदवी घेतल्यानंतर खिशाची चणचण त्यांना खुणावू लागली. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. सोबतच आपण कुणाचे ओझे बनू नये, हा मनोदय होता. याच मानसिकतेतून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची धडपड सुरू झाली. ‘नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड’ यांचा फिजिओथेरपीचा कोर्स चेतना यांनी केला. अ‍ॅक्युप्रेशर, मसाज, व्यायाम शिकवणे यांतून काही वर्षे अर्थार्जनही झाले. त्यादरम्यान, लग्नही झाले. २०१०च्या दरम्यान हे काम त्यांनी थांबवले. काम जरी थांबले असले, तरी स्वप्न थांबली नव्हती. आत्मविश्वास वाढला असल्याने स्वप्नांनाही भरारी घ्यायची होती.
 
त्यावेळी ‘आयबीपीएस’ची कॉमन परीक्षा जाहीर झाली. मग काय, चेतना यांना पुन्हा लक्ष्याचा माग घ्यायचा होता. तंत्रज्ञान फारसे प्रगत नसतानाही ते धाडसी पाऊल त्यांनी टाकले. अहोरात्र मेहनत घेतली. मदतनीस, वाचक यांचे सहकार्यही लाभले. अखेर ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत स्वप्न कवेत आले. मुंबईतील एका नामांकित बँकेत लिपिक म्हणून त्या रुजू झाल्या. तेथेही नव्या प्रश्नांनी जन्म घेतला. बँकेतील सहकर्मचार्‍यांना चेतना यांच्यावर कामाच्या बाबतीत विश्वास नव्हता. हिला तर थोडेही दिसत नाही. मग ही जबाबदारीची कामे कशी करणार? असा तो अविश्वास. मात्र, त्या अविश्वासाला चेतना यांनी आव्हान म्हणून स्वीकारले. आपल्यातील दृष्टिव्यंग बँकेच्या कामाच्या आड येऊ नये, असा त्यांनी निर्धार केला. त्यासाठी आवश्यक उपकरणांची मागणी केली. प्रसंगी त्यासाठी भांडावेही लागले. पण, आज चेतना यांना बँकेतील कार्यकुशल कर्मचारी म्हणून ओळखले जाते. २०१६ मध्ये बढतीसाठी त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. तीही परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. आज एका राष्ट्रीयीकृत बँकेत ‘असिस्टंट मॅनेजर’ म्हणून चेतना कार्यरत आहेत.
 
आज चेतना, त्यांचे पती आणि मुलगी असे त्यांचे सुखी त्रिकोणी कुटुंब आहे. कठोर परिश्रम घेतले, तर एखादे लक्ष्य सर करण्याला नक्कीच बळ मिळते, असा विश्वास चेतना बोलून दाखवतात. चेतना यांचे जगणे म्हणजे अनेकांसाठी नवी स्फूर्ती, नवी चेतनाच!
 
- रोहित गुरव  




संबंधित मजकूर