मुंबई (Vande Mataram Seminar Kerala University) : केरळम् पोलिसांनी कासरगोड येथील केरळ केंद्रीय विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ‘वंदे मातरम्’ परिसंवादात व्यत्यय आणल्याप्रकरणी डाव्या आणि जिहादी विचारसरणीच्या २५ ओळख पटलेल्या विद्यार्थ्यांविरोधात स्वतःहून (सुओ मोटो) एफआयआर दाखल केला आहे. साहित्य अकादमी, अखिल भारतीय साहित्य परिषद आणि केरळ केंद्रीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलिसांनी आणि विद्यार्थ्यांनी आंदोलकांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न हाणून पाडला. परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी, ७ ऑक्टोबर रोजी केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. ७ ऑक्टोबर रोजी परिसंवादाच्या समारोप समारंभात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना लक्ष्य करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. कार्यक्रमात व्यत्यय आणणे हा त्यांच्या आंदोलनाचा उद्देश होता. (Vande Mataram Seminar Kerala University)
राज्यपालांनी ‘वंदे मातरम्’ला होणाऱ्या विरोधामागील शक्ती आणि विचारसरणींचा सर्वंकष अभ्यास करण्याचे आवाहन केले. समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींची ओळख करून त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हा प्रयत्न केवळ परिसंवादांपुरता मर्यादित न ठेवता त्याचा विस्तार व्यापक सामाजिक हस्तक्षेपापर्यंत व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
यापूर्वी प्रज्ञा प्रवाहाचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार हे परिसंवादात बीजभाषण करणार असल्याने आंदोलकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला होता. ‘संघाच्या नेत्याला या कार्यक्रमात बोलू देणार नाही,’ अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. परिसंवादाच्या पहिल्या दिवशी, दुपारच्या सत्रात विद्यापीठाचे मुख्य प्रॉक्टर डॉ. के. श्रीकुमार संबोधित करत असताना ‘वंदे मातरम्’विरोधी आंदोलकांनी सभागृहात घुसखोरी केली. त्यांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. डॉ. श्रीकुमार यांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; मात्र तरीही आंदोलकांनी मोठ्या आवाजात घोषणाबाजी सुरू ठेवत गोंधळ घातला. (Vande Mataram Seminar Kerala University)
आंदोलकांनी चपला दाखवत निषेध केला. त्यांपैकी काही जण व्यासपीठावर चढले आणि घोषणाबाजी करून कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू लागले. एका आंदोलकाने व्यासपीठावरील मायक्रोफोन बंद केला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना सभागृहाबाहेर काढले.
वृत्तांनुसार, या आंदोलनाचे नेतृत्व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)च्या जिल्हा सचिवाने केले. विशेष म्हणजे, तो संबंधित विद्यापीठाचा विद्यार्थी नसल्याचे सांगण्यात येते. त्याच्यासोबत इतरही अनेक बिगरविद्यार्थी सहभागी झाले होते. काँग्रेसप्रणीत केरळ स्टुडंट्स युनियन (केएसयू), भारतीय कम्युनिस्ट पक्षप्रणीत ऑल इंडिया स्टुडंट्स युनियन (एआयएसएफ) आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगप्रणीत मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशन (एमएसएफ)चे कार्यकर्तेही एसएफआयच्या कार्यकर्त्यांसोबत या आंदोलनात सहभागी झाले होते. (Vande Mataram Seminar Kerala University)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक