पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून सलग २५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने नवी दिल्लीत आयोजित ‘विकसित भारत संकल्प सभा - सेवाज्योती यात्रा’मध्ये केलेले भाषण हे केवळ एका राजकीय प्रवासाचे स्मरण नव्हते; ते ‘विकसित भारता’च्या दिशेने वाटचाल करणार्या राष्ट्राच्या आत्मविश्वासाचा, जनविश्वासाचा आणि सामूहिक संकल्पाचा उद्घोष होता. दि. ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सुरू झालेला हा प्रवास भारताच्या विकासयात्रेशी एकरूप झाल्याचे त्यांच्या भाषणातून दिसून आले.
आज मला ‘हेड ऑफ द गव्हर्नमेंट’ म्हणून सेवा करताना २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे जनतेच्या निरंतर आशीर्वादाचे फलित आहे,” असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त केली. "आज मी जे काही आहे, त्यात सर्वांत मोठा वाटा जनताजनार्दनाचा आहे. माझ्यासाठी जनताजनार्दन हेच ईश्वराचे स्वरूप आहे,” या शब्दांत त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील सामान्यांचे स्थान अधोरेखित केले. "देशाने मला खूप काही दिले आहे. त्यामुळे देशच माझ्यासाठी सर्वकाही आहे,” असे सांगत त्यांनी देशसेवेसाठी अधिक ऊर्जा आणि सामर्थ्य मिळावे, अशी प्रार्थनादेखील केली.
आपल्या गेल्या २५ वर्षांच्या प्रवासाकडे मोदींनी ‘वैयक्तिक यश’ म्हणून नव्हे, तर ‘जनविश्वासाच्या रूपातील राष्ट्रीय संपत्ती’ म्हणून पाहिले. "२५ वर्षांचा जनविश्वास आणि अनुभव ही माझी सर्वांत मोठी पुंजी आहे. ही पुंजी देशाची आहे,” असे ते म्हणाले. शासनाचा प्रमुख म्हणून मिळालेला अनुभव हा संपूर्ण राष्ट्राच्या सेवेसाठी वापरला गेला पाहिजे, ही भावना त्यांच्या भाषणातून स्पष्टपणे दिसून आली.
वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाही, तर ध्येय प्रेरित जीवन!
भाषणातील सर्वांत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी संदेश म्हणजे, सार्वजनिक जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन. "मी ‘अॅम्बिशन’साठी नाही, ‘मिशन’साठी जगणारा माणूस आहे,” या एका वायात त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाचे सार मांडले.
"जीवनात काय व्हायचे, याचा विचार कधी केला नाही. मात्र, सतत शिकत राहावे आणि देशासाठी काहीतरी करता यावे, एवढीच अपेक्षा ठेवली,” असे त्यांनी सांगितले. मागे वळून पाहताना पद, प्रतिष्ठा किंवा सत्तेची आठवण होत नाही. उलट, प्रत्येक अनुभवाबद्दल कृतज्ञता वाटते, असे त्यांनी नमूद केले.
त्यांच्या मते, सार्वजनिक जीवनातील प्रत्येक घटना ही एक शिकवण ठरली आहे. त्यामुळेच ते आजही स्वतःला विद्यार्थी मानतात. बदलत्या काळाशी सुसंगत राहण्यासाठी आणि देशाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत शिकणे आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला.
जनता हीच ईश्वरस्वरूप आणि खरी ताकद
पंतप्रधानांच्या भाषणातील सर्वाधिक भावनिक आणि मानवी पैलू म्हणजे, जनतेप्रति व्यक्त केलेली कृतज्ञता. त्यांनी सांगितले की, या प्रवासातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक प्रसंगाने त्यांना घडवले आहे. त्यांनी अत्यंत अर्थपूर्ण शब्दांत आपल्या अनुभवांचे सार मांडले :
ज्यांनी मला जिंकवले, त्यांनी मला नम्रता शिकवली. ज्यांनी मला पाडले,
त्यांनी पुन्हा उभे राहण्याची ताकद दिली. ज्यांनी साथ दिली, त्यांनी विश्वासाचे सामर्थ्य दाखवले.
ज्यांनी विरोध केला, त्यांनी लोकशाहीची ताकद समजावून दिली.
प्रत्येक संकटाने धैर्याची परीक्षा घेतली.
प्रत्येक यशाने मोठी उद्दिष्टे ठेवण्याची प्रेरणा दिली.
‘चांद्रयान’ मोहिमेने अपयशातून पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा दिली, तर‘ कोरोना’ महामारीने सामूहिक चेतनेची शक्ती दाखवून दिली. देशातील प्रत्येक गाव, प्रत्येक गरीब आणि प्रत्येक सामान्य नागरिकाने मोठी स्वप्ने पाहण्याची शिकवण दिली, असे त्यांनी सांगितले.
सामाजिक न्यायाची व्यापक संकल्पना
सामाजिक न्यायाचा विषय मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाला जात, धर्म, पंथ किंवा मतांच्या चौकटीत न पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला. एखाद्या गावात पाणी नसणे, वीज नसणे, घर नसणे किंवा मूलभूत सुविधा नसणे, या समस्या सर्वांच्या असतात. त्यामुळे उपाययोजनाही सर्वांसाठीच असल्या पाहिजेत. सरकारी योजनांचा लाभ १०० टक्के पात्र लाभार्थ्यांपर्यंत कोणताही भेदभाव न करता पोहोचवणे, हीच सामाजिक न्यायाची खरी व्याख्या असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ‘अंत्योदय’, सर्वसमावेशक विकास आणि लाभार्थीकेंद्रित प्रशासन या संकल्पनांमध्ये हा विचार प्रतिबिंबित होतो.
‘वुई विल डू इट’ - राष्ट्राच्या आत्मविश्वासाचा महामंत्र
या भाषणातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा ‘वुई विल डू इट’ हा संदेश होता. पंतप्रधानांनी हा मंत्र केवळ घोषवाय म्हणून मांडला नाही; तर भारताच्या सामूहिक आत्मविश्वासाचा, राष्ट्रीय इच्छाशक्तीचा आणि ‘विकसित भारता’च्या संकल्पाचा आधारस्तंभ म्हणून मांडला.
‘विकसित भारत २०४७’ - वुई विल डू इट!
जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था
- वुई विल डू इट!
‘आत्मनिर्भर भारत’ - वुई विल डू इट!
‘ऑलिम्पिक’चे आयोजन - वुई विल डू इट!
अंतराळ क्षेत्रात नवी झेप - वुई विल डू इट!
"आजचा दिवस आठवणींमध्ये रमण्याचा नाही; आजचा दिवस संकल्पांना नवी ऊर्जा देण्याचा आहे,” असे सांगताना त्यांनी भारताच्या भावी वाटचालीसाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. "भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झाला पाहिजे,” असे ते म्हणाले.
संविधान, लोकशाही आणि विरोधकांविषयी कृतज्ञता
भारतीय संविधान आणि लोकशाही व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, "एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला सलग २५ वर्षे शासनप्रमुख म्हणून सेवा करण्याची संधी मिळणे, हे भारतीय लोकशाहीचे सामर्थ्य आहे.” त्यांनी आपल्या यशाचे श्रेय केवळ समर्थकांना दिले नाही, तर विरोधकांचेही स्मरण केले. "ज्यांनी माझा विरोध केला, त्यांनी मला लोकशाहीची ताकद समजावून दिली,” या शब्दांत त्यांनी लोकशाहीतील मतभिन्नतेचे महत्त्व अधोरेखित केले. लोकशाहीत स्पर्धा असते, संघर्ष असतो; परंतु अंतिम ध्येय राष्ट्रहिताचेच असते, हा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला आहे.
आजही विद्यार्थी आणि ‘राष्ट्र प्रथम’चा संकल्प
वडनगरमधील आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी सांगताना पंतप्रधानांनी शिकण्याची वृत्ती हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. वर्गात सर्वांत आधी पोहोचणार्या विद्यार्थ्यांमध्ये आपण असायचो, असे सांगत त्यांनी जिज्ञासू वृत्तीचे महत्त्व स्पष्ट केले. "मी आजही स्वतःला विद्यार्थी मानतो,” असे ते म्हणाले. बदलत्या जगात सतत शिकत राहणे, नव्या कल्पना स्वीकारणे आणि स्वतःमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘विकसित भारता’चे ध्येय साध्य होईपर्यंत न थांबणे, न थकणे आणि न विचलित होणे, हा त्यांचा दृढसंकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाव शतकाच्या अनुभवातून भविष्याचा संकल्प
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदापासून ते भारताच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास हा केवळ सत्तेचा प्रवास नाही; तो जनसहभाग, विकास, सुशासन आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांचा प्रवास आहे. गुजरातमध्ये जनतेला सोबत घेऊन विकासाचा मार्ग स्वीकारला गेला. त्याच विचाराचा विस्तार राष्ट्रीय पातळीवर झाला.
एकेकाळी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत निराशेचे चित्र रंगवले जात होते. आज भारत जगातील वेगाने प्रगती करणार्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून ओळखला जातो. ‘मेड इन इंडिया’ मोबाईल उत्पादन, डिजिटल व्यवहार, पायाभूत सुविधांचा विस्तार, हरितऊर्जा, अंतराळ संशोधन, ‘स्टार्टअप’ संस्कृती आणि जागतिक पटलावर वाढलेली भारताची प्रतिष्ठा हे या परिवर्तनाचे प्रतीक आहे.
भारताच्या प्राचीन वैभवाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सांगितले की, "एक काळ असा होता, जेव्हा भारत जगाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देत होता. गुलामगिरीच्या दीर्घ कालखंडानंतरही भारताची जिद्द आणि सर्जनशीलता संपली नाही. आज पुन्हा एकदा भारताला जागतिक नेतृत्वाच्या भूमिकेत नेण्याची क्षमता देशात आहे.”
भारताची युवाशक्ती ही या परिवर्तनाची सर्वांत मोठी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. "इतिहासाने दिलेली ही संधी वाया जाऊ देता कामा नये. हा काळ आरामाचा नसून, राष्ट्रासाठी स्वतःला झोकून देण्याचा आहे,” असे सांगत त्यांनी युवकांना ‘विकसित भारता’च्या निर्मितीत सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
राष्ट्रकारणाला प्राधान्य, सर्वसमावेशक विकास, प्रशासनातील परिणामकारकता आणि जनसहभागातून परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका ही त्यांच्या नेतृत्वाची ठळक वैशिष्ट्ये या भाषणातून पुन्हा अधोरेखित झाली. गेल्या पाव शतकातील परिश्रम, अनुभव, सातत्यपूर्ण कार्य आणि मोठी राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्याची जिद्द यांचे प्रतिबिंब संपूर्ण भाषणात दिसून आले.
पायाभूत सुविधा, डिजिटल परिवर्तन, उत्पादन क्षमता, अंतराळ संशोधन, जागतिक प्रतिष्ठा आणि सामाजिक कल्याणाच्या विविध क्षेत्रांत भारताने केलेल्या प्रगतीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी ‘विकसित भारता’च्या संकल्पनेला अधिक स्पष्ट स्वरूप दिले. भारताच्या सामर्थ्यावर आणि नागरिकांच्या क्षमतेवर असलेला त्यांचा विश्वास हा भाषणाचा केंद्रबिंदू होता.
‘स्वयंकडून वयम्कडे’ हा विचार मांडत त्यांनी वैयक्तिक यशापेक्षा सामूहिक राष्ट्रीय प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले. "देशाच्या विकासयात्रेत प्रत्येक नागरिक हा केवळ लाभार्थी नसून, सक्रिय भागीदार आहे,” हा संदेश त्यांनी प्रभावीपणे दिला.
‘वुई विल डू इट’ ही केवळ घोषणा नाही. ‘विकसित भारता’च्या ध्येयासाठी सामूहिक आत्मविश्वास जागवणारा ‘प्रेरणामंत्र’ आहे. १४० कोटी भारतीयांच्या सामर्थ्यावर व्यक्त केलेला हा विश्वास आणि ‘राष्ट्र प्रथम’ची भूमिका यामुळे हे भाषण केवळ एका राजकीय प्रवासाचे स्मरण न राहता, ‘विकसित भारता’च्या संकल्पनेला नवी ऊर्जा देणारे ठरले.
आ. निरंजन डावखरे
(लेखक भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहेत.)