काँग्रेस समर्थकांकडून काश्मिरी तरुणाला मारहाण! दिल्लीतील कनॉट प्लेस येथील फहीम नजीरचा व्हिडिओ व्हायरल

    09-Oct-2026   
 
Kashmiri Youth Assault Delhi Connaught Place
 
मुंबई (Kashmiri Youth Assault Delhi Connaught Place) : दिल्लीतील कनॉट प्लेस येथे काँग्रेस समर्थकांनी एका काश्मिरी तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. फहीम नजीर असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांना दुपारच्या भोजनासाठी आमंत्रित केले होते. त्याचवेळी ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
 
व्हिडिओमध्ये काँग्रेस समर्थक तरुणाचा पाठलाग करून त्याला मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेनंतर भावूक झालेला फहीम प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला, “मी काश्मीरमधील श्रीनगरचा रहिवासी आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता आहे. तुमच्यापैकी सर्वांकडे या घटनेचे व्हिडिओ फुटेज आहे. मी राहुल गांधी यांना शिवीगाळ केली नव्हती, तरीही मला बेदम मारहाण करण्यात आली. मी केवळ माझा आवाज उठवला होता.” (Kashmiri Youth Assault Delhi Connaught Place)
 
तो पुढे म्हणाला, “देशाला परिस्थिती समजावून सांगण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे. भारताला नेपाळ आणि बांगलादेशसारखे बनवण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचे देशवासियांना समजावे, यासाठी मी हा पुढाकार घेतला आहे. मी या देशाचा नागरिक आहे. देशाला नेपाळ आणि बांगलादेशसारखे होऊ न देणे ही माझी जबाबदारी आहे.” (Kashmiri Youth Assault Delhi Connaught Place)
 
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीबद्दल संताप व्यक्त करताना फहीम नजीर म्हणाला की, राहुल गांधी यांना प्रश्न विचारले गेलेच पाहिजेत. हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. विरोधी पक्ष निवडणूक जिंकतात तेव्हा ईव्हीएममध्ये दोष नसतो; मात्र पराभव झाल्यानंतर ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले जातात. “ईव्हीएम आणले कोणी? १९९८ मध्ये राजीव गांधी यांनी पहिल्यांदा ईव्हीएम आणले होते,” असा दावाही त्याने केला. फहीम पुढे म्हणाला, “भारतात लोकशाही आहे. मग अशा प्रकारे एखाद्याला मारहाण केली जाते का? त्यांनी मला खूप मारले. मी राहुल गांधी यांना शिवीगाळ केली नव्हती, तरीही मला मारहाण करण्यात आली. तरीही मी हेच सांगेन की, आपल्या देशाला नेपाळसारखे बनू द्यायचे नाही.”
 
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी मोएट्स येथे ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांसाठी भोजनाचे आयोजन केले होते. याचदरम्यान एक तरुण तेथे पोहोचला आणि केंद्रातील मोदी सरकारची प्रशंसा करू लागला. त्यानंतर संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी या काश्मिरी तरुणाला मारहाण केल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचा आरोपही या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर केला. (Kashmiri Youth Assault Delhi Connaught Place)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर