पश्चिम बंगालमध्ये मदरसा शिक्षण आयोग रद्द! एसएससीमार्फत होणार शिक्षकांची भरती, शुभेंदू अधिकारी सरकारचा मोठा निर्णय

    08-Oct-2026   
West Bengal Madrasa Service Commission
 
 
मुंबई (West Bengal Madrasa Service Commission) : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील विनामान्यता आणि विनानोंदणी सुरू असलेल्या २५२ मदरशांना बंद करण्याचे आदेश दिले होते. यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे १०० मदरशांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. आता पश्चिम बंगाल सरकारने मदरसा शिक्षण आयोग बरखास्त करून तो शाळा सेवा आयोगात विलीन केला आहे. या निर्णयामुळे मदरशांमधील शिक्षकांची भरती एसएससीच्या कक्षेत येणार आहे. राज्याचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री खुदीराम टुडू यांनी सांगितले की, या निर्णयामुळे मदरशांमध्ये शिक्षकांची भरती पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने होऊ शकेल.
 
पश्चिम बंगालमधील सरकारी आकडेवारीनुसार, सुमारे २ हजार १३२ मदरसे नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त आहेत, तर जवळपास २,३९६ मदरसे आवश्यक परवानगी किंवा मान्यतेशिवाय सुरू होते. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात प्रशासनाने विनामान्यता असलेल्या २५२ मदरशांना बंद करण्याचे आदेशही दिले आहेत. पश्चिम बंगाल मदरसा सेवा आयोगाची स्थापना २००८ मध्ये राज्य सरकारने पश्चिम बंगाल मदरसा सेवा आयोग अधिनियम, २००८ अंतर्गत केली होती. मान्यताप्राप्त, अनुदानित नसलेल्या मदरशांमध्ये पात्र शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची पारदर्शक पद्धतीने नियुक्ती करणे हा या आयोगाचा मुख्य उद्देश होता. (West Bengal Madrasa Service Commission)
 
त्याचवेळी, मदरशांमधील शैक्षणिक व्यवस्था आणि परीक्षांचे संचालन करण्यासाठी यापूर्वी पश्चिम बंगाल मदरसा शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली होती. १९९४ च्या अधिनियमाद्वारे या मंडळाला वैधानिक स्वायत्त दर्जा देण्यात आला होता. (West Bengal Madrasa Service Commission)
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शुभेंदू अधिकारी यांनी अलीकडेच रेजीनगर आणि नंदीग्राम येथील पोटनिवडणुकांच्या प्रचारादरम्यान अल्पसंख्याक मतदारांना संबोधित करताना सांगितले की, सरकार अल्पसंख्याकांना ‘जय श्री राम’ म्हणण्यास भाग पाडणार नाही. त्यांना इच्छा असल्यास केवळ ‘भारत माता की जय’ म्हणता येईल. 
 
शुभेंदू अधिकारी म्हणाले की, पोटनिवडणुका आणि सध्याचा काळ हा अल्पसंख्याक समुदायासाठी सरकारशी जोडले जाण्याचा आणि भाजपसोबत मैत्रीचा हात पुढे करण्याचा सर्वोत्तम अवसर आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही ‘जय श्री राम’चा जयघोष करतो, मात्र त्यासाठी कोणावरही दबाव टाकला जात नाही. तुम्ही केवळ ‘भारत माता की जय’ म्हणू शकता.” (West Bengal Madrasa Service Commission)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर