स्व:साधनेतून प्राप्त सिद्धीचे दान समाजाला देणारे, रत्नागिरीतील सूर्यनमस्काराचे साधक विश्वनाथ बापट यांच्या अनोख्या साधनेचा जीवनपट...
एक दिवसही न चुकता सूर्यनमस्कार घालायचेच,’ बालपणी मनात रुजलेला हा संकल्पच पुढे आयुष्यभराची साधना होईल, याची कल्पना विश्वनाथ वासुदेव बापट यांना त्यावेळी नक्कीच नसावी. आज मात्र त्यांनी आयुष्यात १३ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातले आहेत. केवळ सूर्यनमस्कारांची संख्या मोठी आहे म्हणूनच नव्हे; तर सातत्य, शिस्त, राष्ट्रप्रेम आणि समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्तीमुळेही त्यांचा जीवनप्रवास युवापिढीसाठी प्रेरणादायीच!
दि. १७ मे १९५२ रोजी बापट यांचा जन्म, रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते गावात झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शिवधनातून वसलेले हे गाव, त्यांच्या बालपणाचे साक्षीदार. आजोबा, आई-वडील आणि तीन भावंडे असा त्यांचा परिवार. गावातील शाळेत सातवीपर्यंतचे वर्ग होते. मात्र, शिक्षणाबाबत गावात जागरूकता नसल्याने, असले, विद्यार्थ्यांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे बापट यांची शिक्षणाची गाडी चौथीपर्यंतच येऊन थांबली. पुढील शिक्षणासाठी काकांनी त्यांना डोंबिवली येथे आणले. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला एका नव्या दिशेने सुरुवात झाली.
विश्वनाथ यांच्या जीवनातील सूर्यनमस्काराच्या साधनेचा धागा, आजोबांपर्यंत पोहोचतो. त्यांचे आजोबा समर्थ रामदास स्वामींचे निस्सीम भक्त. याच भक्तीतून, त्यांनी ‘सज्जनगड’ नावाचे मासिकही सुरू केले होते. एके दिवशी त्या मासिकावरचे समर्थांचे चित्र पाहून, लहानग्या विश्वनाथांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की ‘हे कोण?’ यातूनच त्यांना समर्थांची ओळख झाली. समर्थांच्या साधनेविषयी ऐकल्यवर, त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, ‘आपल्यालाही सूर्यनमस्कार घालता येतील का?’ आणि यातूनच एका आजीवन साधनेचा जन्म झाला. इयत्ता चौथीत विश्वनाथ यांनी सुरुवातीला १३ सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात केली. सुरुवात छोटी होती; पण तिच्यामागची जिद्द मोठी होती. हळूहळू सूर्यनमस्कार दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले. दररोज सूर्यनमस्काराची ओढ त्यांच्यात निर्माण झाली. परिस्थिती कशीही असली सूर्यनमस्कारांचा नित्यक्रम सुरूच राहिला. याच सातत्याने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली.
डोंबिवलीतील निमकर चाळ येथे ‘रामनगर गणेशोत्सव मंडळा’ने, सूर्यनमस्काराची स्पर्धा आयोजित केली होती. तेव्हा विश्वनाथ सहावीत शिकत होते. त्याकाळीत सूर्यनमस्कार ही काही अपरिचित गोष्ट नव्हती. त्यामुळे जवळपास सर्वांनीच या स्पर्धेत सहभाग घेतला. मात्र, विश्वनाथ यांच्या सूर्यनमस्कारातील शिस्त, अचूकता आणि आदर्श पद्धतीमुळे त्यांना प्रथम क्रमांक मिळवला. १९६८ मध्ये ते ‘एसएससी’ उत्तीर्ण झाले. पुढे, रत्नागिरी येथे त्यांनी ‘बीएस्सी’चेही शिक्षण पूर्ण केले. त्य़ानंतर रत्नागिरीतच अर्थाजनालाही त्यांनी सुरुवात केली. नोकरी, कुटुंब आणि सामाजिक जीवन सांभाळताना, सूर्यनमस्कारांची साधना मात्र अखंड सुरू होती. १९८३ ते १९८९ या सहा वर्षांच्या काळात ते रत्नागिरी तालुका कार्यवाह होते. शाखेत सूर्यनमस्कार होत मात्र, त्यापलीकडे समाजात सूर्यनमस्काराबाबत फारशी जागृती नव्हती. शाळांमध्येही याबाबत उदासीनताच होती.
ही परिस्थिती विश्वनाथ यांच्या लक्षात आली. सूर्यनमस्काराचा लाभ इतर मुलांनाही का मिळू नये? याच विचारातून त्यांनी शाखेबरोबरच शाळांमध्ये जाऊन, सूर्यनमस्कार शिकवण्यास सुरुवात केली. १९८३ पासूनचा हा ध्यास, आजही सुरू आहे. पुढे ‘क्रीडा भारती’च्या सहकार्याने, ‘सूर्यनमस्कार सर्वांसाठी’ ही मोहीमही त्यांनी राबवली. आजवर त्यांनी सुमारे ३८ ते ३९ हजार जणांना, सूर्यनमस्कार शिकवले आहेत. ही एका व्यक्तीने, स्वतःची साधना समाजआरोग्य आणि संस्कारांसाठीच्या चळवळीत रूपांतरित केल्याचे ते उदाहरण आहे. विश्वनाथ यांच्या साधनेतील विशेष बाब म्हणजे सातत्य. रेल्वेच्या डब्यात प्रवास करताना, ‘एसटी’ स्थानकावर किंवा पत्नी आजारी असताना हॉस्पिटलमध्येही त्यांनी सूर्यनमस्कार घातले. पत्नीच्या उपचारांच्या काळात, हॉस्पिटलमधील स्नानगृहाची जागा स्वच्छ करून त्यांनी सूर्यनमस्कार घातले. दैनंदिन साधना चुकता कामा नये, हाच यामगाचा विचार.
आजच्या घडीला बापट यांनी १३ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार पूर्ण केले आहेत. जर १३ लाख सूर्यनमस्कारांची विभागणी १३ सूर्यनमस्कारांच्या एका संचात केली, तर तब्बल एक लाख संच पूर्ण होतात. महत्त्वाचे म्हणजे, वयाच्या ६०व्या वर्षी त्यांनी दहा लाख सूर्यनमस्कारांचा टप्पा पूर्ण केला. वय वाढत गेले, जबाबदार्या वाढल्या, जीवनात चढ-उतार आले; पण सूर्यनमस्कारांची साधना सुरुच राहिली. इयत्ता चौथीत सुरू झालेले १३ सूर्यनमस्कार, पुढे १३ लाखांहून अधिक सूर्यनमस्कारांपर्यंत पोहोचले. एका छोट्याशा संकल्पाचे रूपांतर आयुष्यभराच्या साधनेत झाले. यातून युवापिढीने एक गोष्ट नक्की शिकावी की, सुरुवात छोटी असली तरी चालते; पण सातत्य त्यात असले पाहिजे. विश्वनाथ यांचा हा प्रवास संकल्पाचा, सातत्याचा, शिस्तीचा आणि समाजाला देण्याच्या वृत्तीचा आहे. त्यांनी आजवर मोफत सूर्यनमस्कार सर्वांना शिकवले, याचे त्यांना समाधान आहे. विश्वनाथ बापट यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने अनेक शुभेच्छा!