|| सौंदर्यलहरी भाष्य || भाग -३८

    08-Oct-2026
 
 
Soundaryalahari Bhashya Part 38
 
सुधामप्यास्वाद्य प्रतिभयजरामृत्युहरिणीं
विपद्यन्ते विश्वे विधिशत मखाद्या दिविषदः|
करालं यत्क्ष्वेलं कबलितवतः कालकलना
न शम्भोस्तन्मूलं तव जननि ताटङ्कमहिमा॥२८॥
 
अन्वय : हे जननि! विश्वे विधि-शतमख-आद्याः दिविषदः प्रतिभय-जरा-मृत्यु-हरिणीं सुधाम् अपि आस्वाद्य विपद्यन्ते| यत् करालं क्ष्वेलं कबलितवतः शम्भोः कालकलना न (भवति), तत् मूलं तव ताटङ्क-महिमा|
अर्थात, हे जगन्माते! या विश्वातील ब्रह्मदेव, इंद्रादि देव भय, वार्धय आणि मृत्यू यांचे हरण करणार्‍या अमृताचे प्राशन करूनही कालांतराने नष्ट होतात. परंतु, भयंकर हलाहल विष प्राशन केलेल्या शंभूला मात्र, काळाची गणनाही लागू होत नाही. त्याचे मूळ कारण, हे माते, तुझ्या ताटंकाचा-तुझ्या सौभाग्यचिन्हाचा महिमा आहे.
 
भावार्थ : ‘सौन्दर्यलहरी’तील हा २८वा श्लोक वरकरणी समुद्रमंथनातील हलाहल विषाची कथा सांगतो. परंतु, आचार्य शंकरांनी त्या परिचित पौराणिक प्रसंगातून, शक्तितत्त्वाचे अत्यंत सूक्ष्म रहस्य उलगडले आहे. अमृतप्राशन करूनही देवांना मृत्यू चुकत नाही; परंतु प्रलयंकारी विष प्राशन करूनही शिवाला काळ स्पर्श करू शकत नाही. हे शिवाचे स्वतंत्र सामर्थ्य नसून, ‘हे तव जननि ताटङ्कमहिमा,’ माते हा तुझ्याच ताटंकाचा महिमा आहे! या विधानातून शिव-शक्तीचे अद्वैत, सौभाग्याचे तत्त्व आणि अमृतत्वाचा आध्यात्मिक अर्थ उलगडतो.
 
समुद्रमंथनात देव आणि दानव यांनी केलेल्या क्षीरसागर मंथनातून, अनेक रत्ने प्रकट झाली.अखेरीस अमृतकुंभही प्राप्त झाला. पण, अमृत येण्यापूर्वी समुद्रातून कालकूट अथवा हलाहल विष प्रकट झाले. याच्या प्रभावाने संपूर्ण सृष्टीच नष्ट होण्याची वेळ आली. तेव्हा भगवान शिवांनी लोककल्याणासाठी ते प्राशन केले. पार्वतीच्या कृपेने ते कंठातच स्थिर झाल्याने, शिव ‘नीलकंठ’ झाले. शंकराचार्य येथे अत्यंत सुंदर काव्यात्मक प्रश्न उपस्थित करतात. देवांनी काय प्राशन केले? अमृत. शिवाने काय प्राशन केले? विष. सामान्य न्यायाने अमृत पिणारे अमर व्हायला हवेत आणि विष पिणार्‍याचा मृत्यू व्हायला हवा. पण, घडते नेमके उलटेच! ब्रह्मा, इंद्र आणि इतर देव अमृताचा आस्वाद घेऊनही कल्पान्ती नष्ट होतात; परंतु शिवाला मृत्यू स्पर्श करू शकत नाही. मग, शिवाला नेमके अमर करणारे असे काय आहे? आचार्य अत्यंत प्रेमळ आणि शक्तिप्रधान उत्तर देतात, पार्वतीचे सौभाग्य! ‘तव जननि ताटङ्कमहिमा,’ हे माते, तुझ्या कानांतील ताटंकाचाच हा महिमा आहे.
 
भारतीय स्त्रीच्या अलंकारांकडे केवळ सौंदर्यवर्धक वस्तू म्हणून पाहिलेले नाही. अनेक अलंकारांना मांगल्य, सौभाग्य आणि पतीच्या कल्याणाशी जोडले गेले आहे. येथे ‘ताटंक’ हा देवीच्या अखंड सौभाग्याचा संकेत होतो. देवी नित्यसौभाग्यवती आहे; म्हणूनच तिचा पती मृत्यूच्या अधीन कसा असेल? कवीने याच भावनेला विश्वात्मक स्तरावर नेले आहे. परंतु, हा केवळ ‘पतिव्रतेच्या पुण्यामुळे पतीचे रक्षण होते’ इतकाच त्याचा साधा अर्थ नसून, ‘सौन्दर्यलहरी’चा तात्त्विक स्तर त्यापेक्षा खूप खोल आहे.
 
शिव-शक्ती अद्वैताचा गूढार्थ : शक्तीने युक्त शिवच सृष्टी निर्माण करण्यास समर्थ होतो; अन्यथा तो स्पंदन करण्यासही समर्थ नाही. २८व्या श्लोकात याच सिद्धान्ताची दुसर्‍या प्रकारे अभिव्यक्ती आहे. शिव म्हणजे शुद्ध चैतन्य आणि शक्ती म्हणजे त्या चैतन्याचा स्वप्रकाश, क्रिया आणि अभिव्यक्ती. दोघे वस्तुतः दोन नाहीत. अग्नी आणि त्याची दाहकता वेगळी करता येत नाही; सूर्य आणि प्रकाश वेगळे करता येत नाहीत; तसे शिव आणि शक्ती वेगळे करता येत नाहीत. म्हणून ‘देवीच्या ताटंकामुळे शिव वाचले,’ याचा आध्यात्मिक अर्थ, देवीने बाहेरून एखादी जादूई शक्ती वापरून शिवाला विषापासून वाचवले, असा नाही. शिवामध्ये प्रकट झालेले विषातीत चैतन्यही शक्तीचे स्वरूप आहे. मृत्यू ज्याला लागू होतो तो देह; काल ज्याला मोजतो, ते परिवर्तनशील अस्तित्व. परंतु शिव-शक्तीचे परम् तत्त्व काळाच्याही पलीकडे आहे.
 
अमृत पिऊनही देव का मरतात?
 
हा श्लोकातील सर्वांत गहन प्रश्न आहे. अमृत पिल्यानंतर देव अमर झाल्याचेे पुराणकथेत आपण म्हणतो. मग, शंकराचार्य ‘विपद्यन्ते-ते नष्ट होतात,’ असे का म्हणतात? कारण, वेदान्त आणि पुराणांच्या विशाल कालकल्पनेमध्ये देवांचे अमरत्व सापेक्ष आहे; परम् नाही. देवांचे आयुष्य मानवी आयुष्याच्या तुलनेत प्रचंड आहे; परंतु ब्रह्मांडाच्या उत्पत्ती-स्थिती-लयाच्या चक्रात त्यांची पदे आणि व्यक्त स्वरूपेही अनंत नाहीत. कल्पान्त आणि महाप्रलयाच्या पातळीवर ब्रह्मलोकासहित व्यक्त विश्व लय पावते. त्यामुळे अमृत म्हणजे कालमर्यादा वाढवणारे अमृतत्व; परब्रह्मस्वरूप अमरत्व नव्हे.
 
याउलट, शिव येथे कालातीत तत्त्वाचे प्रतीक आहेत. म्हणूनच, शंभूची काळाने गणनाच करता येत नाही.’ काळाच्या आत असलेल्या वस्तूचे वय मोजता येते; काळाचा उदय आणि लयच ज्याच्यामध्ये होतो, त्याचे वय कसे मोजणार?
 
विष आणि अमृताचा आध्यात्मिक अर्थ :
 
साधकाच्या दृष्टीने ‘अमृत’ आणि ‘विष’ यांनाही प्रतीकात्मक अर्थ आहे. संसारातील सुख, संपत्ती, सत्ता, तारुण्य, आरोग्य, प्रतिष्ठा ही अमृतासारखी वाटते. ती मिळाल्यावर आपण सुरक्षित झाल्याचे वाटते. पण, यांपैकी एकही गोष्ट आपल्याला मृत्यूपासून मुक्त करू शकत नाही. देवांनाही काल आहे. दुसरीकडे शिव विष पितात. विष म्हणजे, दुःख, संकट, प्रतिकूलता, वेदना, संसारातील कटुता. पण, जो साधक शिव-शक्तीच्या परम् चैतन्याशी एकरूप झाला, त्याला बाह्य परिस्थिती त्याच्या आत्मस्वरूपातून ढळवू शकत नाही. देहाला कितीही सुरक्षित केले, तरी तो एक दिवस जाणार. खरे अमृतत्व म्हणजेच, ‘मी देह आहे,’ या मर्यादित जाणिवेचा अंत आणि ‘मी नित्य चैतन्य आहे,’ या अनुभूतीचा उदय.
 
श्लोकातील सर्वांत मोहक शब्द आहे, ‘ताटङ्कमहिमा.’ आचार्यांना सहज म्हणता आले असते, ‘हे देवी, तुझ्या शक्तीमुळे शिवाला मृत्यू नाही.’ पण, त्यांनी देवीच्या कानांतील एका लहानशा अलंकाराचा उल्लेख केला. कारण ‘सौन्दर्यलहरी’चे वैशिष्ट्यच असे आहे की, परम तत्त्वज्ञान स्त्रीसौंदर्याच्या प्रतिमेतूनच प्रकट होते. ‘ताटंक’ हा येथे देवीच्या नित्यसौभाग्याचा दृश्यमान संकेत. परंतु, तांत्रिक-शाक्त दृष्टीने त्याचा आणखी सूक्ष्म अर्थ घेता येतो. देवी ही स्वयंशक्ती असल्याने, तिचे सौभाग्य कोणावर अवलंबून नाहीत. उलट, तिच्या अस्तित्वामुळेच शिवाचे ‘शिवत्व’ व्यक्त होते. म्हणूनच तिच्या सौभाग्याचे प्रतीक असलेला ताटंक, शिवाच्या कालातीतत्त्वाचा काव्यमय आधार ठरतो. येथे स्त्री ही पतीच्या अस्तित्वामुळेच ‘सौभाग्यवती’ एवढीच कल्पना नाही. ‘शिव अमर आहे, म्हणून देवी सौभाग्यवती नाही; देवी नित्यसौभाग्यस्वरूपिणी आहे, म्हणून शिवावर काळाची सत्ता नाही,’ अशी अद्भुत उलट मांडणीच शंकराचार्य करतात.
 
या श्लोकातून साधकाने शेवटी काय घ्यावे?
 
आपण आयुष्यभर बाहेर अमृत शोधतो. उत्तम आरोग्य, पैसा, सत्ता, प्रसिद्धी, औषधोपचार, दीर्घायुष्य या सर्वांचा उपयोग आहेच. पण, त्यांपैकी कोणतीही गोष्ट अभय देऊ शकत नाही. भयाचे मूळ मृत्यूमध्ये नसून ‘मी नष्ट होईन’ या देहात्मबुद्धीत आहे. देवीची उपासना, साधकाला त्या देहात्मबुद्धीच्या पलीकडे नेते. शक्तीच्या कृपेने जेव्हा शिवस्वरूप चैतन्याची अनुभूती होते, तेव्हा बाह्य अमृताची आवश्यकताच उरत नाही. कारण साधकाला जाणवते की, जन्म आणि मृत्यू हे आत्मचैतन्याचे नाहीत. अमृत प्राशन करणारेही कालाच्या अधीन राहू शकतात; पण शक्तीशी अभिन्न असलेले शिवतत्त्व विष प्राशन करूनही कालातीत राहतात.
 
अमृतापेक्षाही श्रेष्ठ काय शक्तीची कृपा आहे. मृत्यूवरचा खरा विजय म्हणजे शरीर अनंत काळ टिकवणे नव्हे, तर आपल्या आत असलेल्या त्या नित्य, शुद्ध, कालातीत शिव-शक्तीस्वरूपाचा साक्षात्कार होणे. त्यामुळेच ‘तव जननि ताटङ्कमहिमा’ हे केवळ देवीच्या अलंकाराचे कौतुक नाही. जिथे शक्ती आहे, तिथेच शिव आहे; जिथे शिव-शक्तीचे ऐय अनुभूत झाले, तिथे काळ आहे, पण काळाचे भय नाही; मृत्यू आहे, पण आत्म्याचा मृत्यू नाही; आणि विषही आहे, पण तेथे विषालाही अमृत करण्याचे सामर्थ्य आहे! (क्रमश:)
 
- सुजीत भोगले
९३७००४३९०१




संबंधित मजकूर