विलक्षण श्राद्धपरंपरांचा पितृपक्ष!

    08-Oct-2026
 
 
Pitru Paksha Shraddha Traditions
 
भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म विचार केला आहे. हा विचार जसा शुभकार्याबाबत आहे, संस्काराबाबात आहे, तसाच श्राद्धाबाबतही आहे. मृत्यूकडे सरसकट एकाच नजरेने न बघता, त्याकडेही विशेष दृष्टीने बघण्याचा मोठे भारतीय संस्कृतीकडेच असावा. यातूनच पितृपक्षामध्ये अनेक संन्यासी, शस्त्रहत आणि मातामह श्राद्ध अशी तीन प्रकारची श्राद्ध असतात. सध्या सुरु असलेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने, या विविध श्राद्ध परंपरांचा आढावा घेणारा हा लेख...
 
तृपक्ष म्हटले की, सर्वसाधारणपणे आपल्या डोळ्यांसमोर एकच चित्र उभे राहते. ते म्हणजे, आपल्या दिवंगत पूर्वजांचे त्यांच्या मृत्युतिथीनुसार केले जाणारे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान. त्यामुळे श्राद्ध ही जणू एकसारखीच कर्मपद्धती आहे, अशी अनेकांची समजूत. प्रत्यक्षात हिंदू धर्मशास्त्रातील श्राद्धव्यवस्था विलक्षण सूक्ष्म आहे. मृत व्यक्तीशी असलेले नाते, त्या व्यक्तीने स्वीकारलेला आश्रम, मृत्यूचे स्वरूप, मातृकुळाशी असलेले संबंध अशा अनेक बाबींचा विचार या परंपरेत दिसतो. त्याचीच तीन अत्यंत रंजक उदाहरणे म्हणजे, संन्यासी जनांसाठी द्वादशी, शस्त्रादि हिंसक कारणाने मृत्यू झालेल्यांसाठी चतुर्दशी आणि मातामहांसाठी आश्विन शुक्ल प्रतिपदा. या तीन परंपरा समजून घेतल्यास, श्राद्ध म्हणजे केवळ मृत व्यक्तीला उद्देशून केलेले कर्मकांड नसून, स्मृती, कृतज्ञता, ऋण आणि नातेसंबंध यांची किती व्यापक संकल्पना आपल्या पूर्वजांनी उभारली होती, हे लक्षात येते.
 
पितृपक्षातील कृष्ण द्वादशी ही संन्यास ग्रहण करून, दिवंगत झालेल्या यती-संन्याशांच्या श्राद्धासाठी विशेष मानली जाते. म्हणूनच, अनेक पंचांगांमध्ये द्वादशीसमोर ‘संन्यासी जनांचे श्राद्ध’ किंवा ‘यती श्राद्ध’ अशी स्वतंत्र नोंद दिसते. अर्थात, द्वादशी तिथीला मृत्यू झालेल्या सामान्य व्यक्तीचे श्राद्धही द्वादशीलाच होते; पण संन्याशाच्या बाबतीत त्याची मृत्युतिथी कोणतीही असली, तरी महालयातील द्वादशीलाच विशेष स्थान देण्याची परंपरा रूढ आहे.
 
यामागे संन्यास या आश्रमाचे स्वरूप समजून घेणेही आवश्यक. हिंदू जीवनपद्धतीत ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे चार आश्रम आहेत. त्यातील संन्यास हा अंतिम टप्पा. संन्यास स्वीकारणारा मनुष्य आपली संपत्ती, लौकिक प्रतिष्ठा, कौटुंबिक अधिकार आणि ‘मी’ व ‘माझे’ या भावनेचाही त्याग करतो. अनेक संन्यासपरंपरांमध्ये, संन्यासदीक्षेच्या वेळी पूर्वाश्रमीच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रतीकात्मक अंत झाल्याची संकल्पनाही आढळते. त्यामुळे संन्याशाच्या देहावसानानंतरचे संस्कार, सामान्य गृहस्थापेक्षा वेगळे असणे स्वाभाविकच. काही संप्रदायांत संन्याशाच्या पार्थिवाचे दहन न करता, भू-समाधी किंवा जलसमाधी देण्याची परंपराही अशाच विचारातून आली आहे.
 
ज्याने संसाराचा त्याग केला, त्याचे श्राद्ध संसारातील नातेवाईकांनी का करावे? याचे उत्तर श्राद्धाच्या मूळ भावनेतच आहे. संन्याशाने कुटुंबाचा त्याग केला असला, तरी कुटुंबाने त्याच्याविषयीची कृतज्ञता त्यागलेली नसते. त्याने स्वतःला ईश्वरचिंतन, साधना, धर्मसेवा किंवा आत्मज्ञानाच्या शोधासाठी समर्पित केले, तर त्याच्या त्या आध्यात्मिक प्रवासाचे स्मरण करणे, हे उरलेल्या समाजाचे कर्तव्यच मानले गेले. म्हणून संन्यासी श्राद्ध हे एका अर्थाने, आध्यात्मिक ऋणाच्या स्मरणाचे श्राद्ध आहे. संसार सोडून गेलेल्या व्यक्तीलाही आपल्या स्मृतीतून समाजाने सोडले नाही, हीच त्यामागची सुंदर भावना.
 
दुसरी विलक्षण परंपरा म्हणजे, शस्त्राघात अथवा हिंसक प्रकारे मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध. याबाबतची तिथीही स्पष्ट समजून घेणे आवश्यक. अशा व्यक्तींसाठीची विशेष तिथी म्हणजे पितृपक्षातील कृष्ण चतुर्दशी. तिला ‘शस्त्रहत चतुर्दशी’, ‘घात चतुर्दशी’ अथवा ‘चतुर्दशी श्राद्ध’ असे संबोधले जाते. धर्मसिंधूच्या परंपरेत, याबाबत ‘शस्त्रादिना हतस्य चतुर्दश्यामेव श्राद्धम्’ असा निर्देश उद्धृत आहे. अर्थात, शस्त्रादि कारणाने मारल्या गेलेल्या व्यक्तीचे महालयातील श्राद्ध चतुर्दशीलाच करावे.
 
यामागे, मृत्यूच्या स्वरूपाबद्दलची अत्यंत संवेदनशील जाणीव दिसते. वृद्धत्वामुळे किंवा दीर्घ आजाराने आलेला मृत्यू आणि हत्या, युद्ध, शस्त्राघात किंवा अन्य हिंसक घटनेत अचानक संपलेले जीवन, या दोन्हींकडे धर्मपरंपरेने पूर्णपणे सारख्या दृष्टीने पाहिलेले नाही. अशा अचानक आणि असामान्य मृत्यूंचा, दुर्मरण किंवा अपमृत्यू या व्यापक संकल्पनांसंदर्भात स्वतंत्र विचार धर्मशास्त्रीय ग्रंथांत आहे. त्यामुळे त्यांच्या उत्तरक्रिया आणि श्राद्धाबाबतही काही विशेष नियम निर्माण झाले.
 
याचा भावनिक अर्थही महत्त्वाचा. एखाद्या वृद्ध व्यक्तीला आयुष्याचा नैसर्गिक शेवट मिळतो; पण युद्धात हौतात्म्य आलेला सैनिक, हत्येचा बळी ठरलेला मनुष्य किंवा शस्त्राघाताने अचानक मृत झालेल्या व्यक्तीचे जीवन, एका क्षणात संपते. त्याला आपल्या कुटुंबाचा निरोप घेण्याची, अनेक अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याचीही संधी मिळत नाही. अशा मृत्यूची स्वतंत्र दखल धार्मिक व्यवस्थेने घ्यावी, हीच भावना चतुर्दशीच्या विशेष श्राद्धातून व्यक्त होते. आधुनिक काळातील प्रत्येक अपघाती मृत्यूला, ‘शस्त्रहत’ संकल्पना लागू करणे योग्य नाही. प्रत्यक्ष कर्म करताना, कुलाचार आणि जाणकार धर्मशास्त्रज्ञाचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
 
या दोन परंपरांपेक्षाही सर्वसामान्य माणसाला अधिक आश्चर्य वाटावे, अशी तिसरी परंपरा म्हणजे मातामह श्राद्ध. आजकाल हिंदू धर्मातील पितृपक्षावर टीका करताना काही मंडळी उपहासाने विचारतात, ‘पितृपक्ष आहे, मग मातृपक्ष का नाही?’ परंतु, हा प्रश्न विचारण्यापूर्वी धर्मसिंधू, निर्णयसिंधू आणि इतर स्मृतिनिबंधांतील श्राद्धाधिकार पाहिला, तर एक वेगळेच चित्र समोर येते. कारण हिंदू श्राद्धपरंपरेत आईच्या कुळालाही स्थान आहे. त्यातील एक विलक्षण व्यवस्था म्हणजे, दौहित्राने अर्थात मुलीच्या मुलाने, आपल्या मातामहांचे म्हणजेच आईच्या वडिलांचे केलेले श्राद्ध!
 
मातामह श्राद्ध पितृपक्षातील नेहमीच्या तिथिश्राद्धासारखे नाही. सर्वपित्री अमावस्या संपल्यावर येणार्‍या आश्विन शुक्ल प्रतिपदेला, म्हणजे शारदीय नवरात्राच्या पहिल्याच दिवशी याची स्वतंत्र परंपरा आढळते. धर्मसिंधूमध्ये जीवत्पितृक दौहित्रालाही, आश्विन शुक्ल प्रतिपदेला मातामह श्राद्धाचा अधिकार असल्याची चर्चा येते. म्हणजे, स्वतःचे वडील जिवंत असतानाही, दौहित्राला आपल्या मातामहाचे हे श्राद्ध करण्याची व्यवस्था आहे. यासंबंधी स्मृतिपरंपरेत उद्धृत होणारा श्लोक अत्यंत बोलका आहे. 
 
जातमात्रोऽपि दौहित्रो विद्यमाने च मातुले|
कुर्यान्मातामहश्राद्धं प्रतिपद्याश्विने सिते॥
 
याचा अर्थ, मामा अस्तित्वात असतानाही दौहित्राने, आश्विन शुक्ल प्रतिपदेला मातामह श्राद्ध करावे. येथे दौहित्राच्या स्वतंत्र अधिकारावर विशेष भर दिलेला दिसतो. म्हणजे मुलीचे लग्न झाले, म्हणून तिचे माहेराशी असलेले सर्व धार्मिक नाते संपले आणि तिच्या पुढच्या पिढीचा मातृकुळाशी संबंध उरला नाही, अशी हिंदू धर्मशास्त्राची भूमिका नाही. उलट, मुलीच्या मुलालाही मातामहांच्या स्मरणाचे कर्तव्य दिले गेले आहे. ‘सरस्वतीविलास’मध्ये व्यासांच्या नावाने उद्धृत, आणखी एक वचन या नात्याचा दुसरा पैलू उलगडते,
 
श्राद्धं मातामहानां तु अवश्यं धनहारिणा|
दौहित्रेणार्थनिष्कृत्यै कर्तव्यं विधिवत्सदा॥
 
याचा आशय असा की, मातामहांकडून धन प्राप्त करणार्‍या दौहित्राने, त्या ऋणाच्या परिहारासाठी मातामहांचे श्राद्ध विधिपूर्वक करावे. या एका वचनामध्ये अत्यंत मोठे सामाजिक तत्त्व दडले आहे. ते म्हणजे, अधिकाराबरोबर कर्तव्यही येते! पूर्वजांची संपत्ती स्वीकारायची, पण पूर्वजांविषयीचे उत्तरदायित्व नाकारायचे, अशी एकतर्फी व्यवस्था धर्मशास्त्राला अभिप्रेत नव्हती. याहूनही बोलका उल्लेख असा आहे,
 
मातुः पितरमारभ्य त्रयो मातामहाः स्मृताः|
तेषां तु पितृवच्छ्राद्धं कुर्युर्दुहितृसूनवः॥
 
अर्थात, आईच्या पित्यापासून मातृकुळातील तीन पिढ्यांचा ‘मातामहवर्ग’ म्हणूनही विचार केला जातो आणि मुलीच्या पुत्रांनी त्यांचे पितरांप्रमाणेच श्राद्ध करावे. त्यामुळे ‘पितृ’ या शब्दाचा आजच्या भाषेतील केवळ ‘पुरुष’ किंवा ‘वडिलांचे घराणे’ एवढाच संकुचित अर्थ घेऊन, संपूर्ण श्राद्धपरंपरेचे मूल्यमापन करणे चुकीचे ठरते. हिंदू धर्मशास्त्रीय परंपरेत माता, मातामह, मातामही आणि मातृकुळातील पूर्वज यांच्या स्मरणासाठीही विविध अधिकार आणि विधींची चर्चा आहे.
 
या तीनही परंपरा एकत्र डोळ्यासमोर ठेवल्यावर, पितृपक्षाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. संन्याशाने संसार सोडला म्हणून समाजाने त्याचे स्मरण सोडलेले नाही; एखाद्याचे जीवन हिंसक मृत्यूने अचानक संपले, म्हणून त्याच्या मृत्यूकडे दुर्लक्ष केले नाही; आणि मुलगी दुसर्‍या कुळात गेली, म्हणून तिच्या मुलाचे मातृकुळाशी असलेले ऋण पुसले जात नाहीत. व्यक्तीच्या जीवनस्थितीपासून, मृत्यूच्या स्वरूपापर्यंत आणि पितृकुळापासून मातृकुळापर्यंत पोहोचणारी ही व्यवस्थाच म्हणूनच अभ्यासण्यासारखी आहे.
 
श्राद्धामागील तत्त्वज्ञानाचा गाभा शेवटी ‘कृतज्ञता’ हाच. मनुष्य केवळ स्वतःच्या कर्तृत्वातून निर्माण होत नाही. आपल्या शरीरामध्ये दोन कुळांचे रक्त आहे; आपल्या संस्कारांमागे अनेक पिढ्या आहेत; आपल्या शिक्षणामागे कुणाचे तरी श्रम आहेत; आपल्या संपत्तीमागेही पूर्वजांची मेहनत आहे; आपल्या अस्तित्वामागे असंख्य ज्ञात-अज्ञात त्याग आहेत. त्या ऋणाची वर्षातून, निदान एकदा जाणीव करून देणारी व्यवस्था म्हणजेच श्राद्ध!
 
म्हणूनच, श्राद्ध ही मृत्यूची उपासना नाही; ती स्मृतीची आणि कृतज्ञतेची संस्कृती आहे. द्वादशीचे संन्यासी श्राद्ध आपल्याला आध्यात्मिक ऋणाची आठवण करून देते; चतुर्दशीचे शस्त्रहत श्राद्ध अकाली तुटलेल्या जीवनाची स्वतंत्र दखल घेते; तर प्रतिपदेचे मातामह श्राद्ध सांगते की, माणसाची मुळे केवळ पित्याच्याच कुळात नसतात; त्याच्या अस्तित्वात आईचे कुळही तितकेच जिवंत असते. पितृपक्षातील या तीन विलक्षण परंपरा समजल्या, तर हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्या धर्मव्यवस्थेने नात्यांचे किती सूक्ष्म पदर ओळखले होते, याची नव्याने जाणीव होते.
 
-ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज




संबंधित मजकूर