गेल्या काही दिवसांतील आंदोलनांच्या नकारात्मक नौटंकीमुळे सरकार बचावात्मक भूमिकेत गेले असल्याच्या समजुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘वुई विल डू इट’ या कालच्या भाषणाने जोरदार धक्का दिला. ७६ वर्षांचे मोदी हे येत्या २० वर्षांत भारताला बलशाली बनविण्याची रूपरेषा सांगत असताना, तुलनेने तरुण विरोधी पक्षनेते हे रस्त्यावरील निरर्थक राजकीय नौटंकीत गुंतले होते. एवढेच नाही तर मोदींच्या कालच्या भाषणाने सरकार आणि पक्षामध्ये नवा आत्मविश्वासही फुंकला. एकूणच काय तर मोदी हे ‘मिशन’ म्हणून काम करतात; तर राहुल गांधी हे वैयक्तिक ‘अॅम्बिशन’ म्हणून वागताना दिसतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काल नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या भव्य समारंभात, मोदींच्या भाषणाने देशात नवचैतन्य निर्माण केले. गेले काही महिने विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या आंदोलन-निदर्शने-मोर्चे वगैरेच्या नकारात्मक गदारोळात सरकारला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागत असल्याची जी समजूत बनत चालली होती, तिला मोदींच्या भाषणाने आणि त्यातील त्यांच्या विजिगीषू वृत्तीने जबरदस्त धक्का दिला. देशाची सूत्रे आजही आपल्याच हाती असून, भारताला विकसित करण्याचे ध्येय आपण साध्य करणारच, असा स्पष्ट संदेश मोदींनी आपल्या तडाखेबाज भाषणातून दिला. त्यांच्या या जोशपूर्ण भाषणात त्यांनी उपस्थित श्रोत्यांनाही सामावून घेतल्याने निर्माण झालेल्या चैतन्याने सरकारबद्दलच्या उदासीन भावना विरून गेल्या. जगातील फार थोड्या नेत्यांच्या भाषणाने आजवर सामान्य जनतेत आशेचे स्फुल्लिंग पेटविले आहे. शीतयुद्धाच्या काळात जॉन एफ. केनेडी यांनी बर्लिनमध्ये केलेले ‘इश बिन ऐन बर्लिनर’ या भाषणाने पश्चिम जर्मनीतील तरुणांमध्ये आशेचा किरण लकाकला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘येस वी कॅन’ या भाषणानेही अमेरिकेत नवा जोश निर्माण केला होता. मोदी यांचे कालचे ‘वुई विल डू इट’ हे भाषणही त्याच दर्जाचे असून, सरकारमध्ये आणि सत्तारूढ नेत्यांमध्ये नवा आत्मविश्वास फुंकणारे ठरले आहे.
नरेंद्र मोदी यांचे नैसर्गिक वय जरी ७६ असले, तरी आजही त्यांचा वावर आणि काम करण्याचा झपाटा हा एखाद्या पंचविशीतील तरुणालाही लाजवेल असाच. वयाच्या पंचविशीत व्यक्ती आशेने आणि सकारात्मक विचारांनी भारलेली असते. आपण जग बदलवून टाकू, असा आत्मविश्वास असतो. पण, बरेचदा प्रतिकूल परिस्थितीच्या रेट्यापुढे सामान्य व्यक्ती हतबल होते. खर्या नेत्यात आणि सामान्य व्यक्तीत हाच फरक असतो. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या ध्येयापासून जो ढळत नाही आणि ते प्राप्त करण्याचा विश्वास ज्याच्या मनात कायम असतो, तोच यशस्वी नेता होतो. मोदी यांच्या भाषणातून हाच आत्मविश्वास आणि भारताच्या उज्ज्वल भवितव्यावरील गाढ श्रद्धा डोकावताना दिसते.
गेली सलग २५ वर्षे नरेंद्र मोदी हे सत्तास्थानावर आहेत. पण, इतया वर्षांत त्यांनी एक दिवसही सुट्टी घेऊन आराम केल्याचे दिसून येत नाही. सतत फिरतीवर असूनही आणि बैठका-दौरे सुरू असतानाही कोणी मोदी यांच्या चेहर्यावर थकवा किंवा कंटाळा आल्याचे भाव पाहिले नाहीत. पण, मोदी यांचे खरे कौशल्य आपल्या सहकार्यांनाही आपल्या कामासाठी उद्युक्त करून त्यांच्याकडून निर्धारित लक्ष्य पूर्ण करून घेण्यात आहे. भारताला विकसित करण्याचे लक्ष्य एकटे मोदी साध्य करू शकत नाहीत. त्यांना या कामासाठी प्रत्येकाचे सहकार्य आवश्यक. म्हणूनच, त्यांनी काल ‘आय विल’ नव्हे, तर ‘वी विल डू इट’चा नवा मंत्र दिला.
नरेंद्र मोदी यांचा हा विश्वास अजिबात अनाठायी नाही. गेल्या १२ वर्षांत त्यांनी भारतात अनेक क्षेत्रांत घडवून आणलेला कायापालट त्यांच्या या विश्वासाचा आधार आहे. २०१४ मध्ये मोदींनी देशाची सूत्रे स्वीकारली, तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा समावेश जगातील सर्वांत दुबळ्या पाच (फ्रजाईल फाईव्ह) अर्थव्यवस्थांमध्ये होत होता. गेल्या १२ वर्षांत मोदींच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकावर आली आहे. देशातील ८० टक्के जनता बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर होती. मोदींनी ‘जन-धन’ खात्यांद्वारे या लोकसंख्येला बँकिंग व्यवस्थेशी जोडले. त्यानंतर मोबाईल फोनद्वारे गरजूंना सर्व सरकारी योजनांचे लाभ थेट त्यांच्या खात्यापर्यंत पोहोचविले गेले. "रस्त्यावर भाजी विकणारा विक्रेता पाच-सहा रुपयांचे व्यवहार मोबाईलद्वारे कसे करणार,” असा कुत्सित प्रश्न माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी संसदेत विचारला होता. आज नेमके तेच प्रत्यक्षात घडताना दिसत आहे. ‘नोटबंदी’, ‘३७० कलम’ रद्द करणे, भव्य श्रीराम मंदिराची उभारणी, पाकिस्तानवर लष्करी हल्ले, संरक्षण सामग्रीची निर्यात, ‘कोविड’विरोधी लसीचे उत्पादन, ‘तिहेरी तलाक’ रद्द करणे यांसारख्या अनेक मूलगामी कामांची जंत्री देता येईल. त्यातून हेच सिद्ध होते की, कितीही अडचणी आणि अडथळे आले; तरी मोदी हे आपल्या ध्येयापासून ढळणार नाहीत. तसेच मोदी लवकरच पंतप्रधानपद सोडतील, यासारख्या मतलबी अफवांनाही मोदी यांनी चाप लावला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा काळ आठवा. तो काळ हा महाराष्ट्रात पूर्णपणे निराशेने भरलेला होता. मुघलांचे अत्याचार वाढत होते आणि त्यांचा प्रतिकार करण्यास कोणीच तयार नव्हता. सामान्य जनता असाहाय्य होती. इतक्या विपरीत परिस्थितीतही आपल्या भूमीत स्वराज्य उभे करता येईल, असा विश्वास महाराजांना वाटला आणि त्यांनी तो सामान्य रयतेच्या मनात जागविला. म्हणूनच, ते अलौकिक नेते ठरले. त्याकाळापेक्षा आजची परिस्थिती कितीतरी अनुकूल आहे. पण, विरोधी पक्षांनी उठविलेल्या ‘फेक नॅरेटिव्ह’च्या प्रचंड नकारात्मक गदारोळामुळे सामान्य जनता भांबावली होती. मोदींनी नेमया याच वेळी केलेल्या या आशादायक आणि जोशपूर्ण भाषणाने भाजपमध्ये आणि एकंदरीतच सत्तारूढ आघाडीत पुन्हा प्राण फुंकले आहे. तसेच सरकार आता बचावात्मक नव्हे, तर आक्रमक पद्धतीने आपली बाजू मांडेल आणि कायद्यास न जुमानता आंदोलने करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारेल, याचेही संकेत मिळाले.
नरेंद्र मोदी हे कोणतेही काम ‘मिशन’ म्हणून हाती घेतात; तर राहुल गांधी यांची प्रेरणा ही वैयक्तिक राजकीय ‘अॅम्बिशन’ आहे. हाच या दोघांमधील मूलभूत फरक. बुधवारी जेव्हा मोदी हे भारताला बलशाली आणि विकसित कसे करायचे, त्याचे वर्णन करीत होते; तेव्हा राहुल गांधी हे केवळ रस्त्यावरील स्वस्त आणि निरर्थक नाटकबाजीत गुंतले होते. जी गोष्ट एका साध्या पत्राने साध्य झाली असती, त्यासाठी जंतरमंतरवर जाऊन पोलिसांच्या अनुमतीशिवाय ‘धरणे’ धरण्याचा प्रयत्न करणे आणि पोलिसांनी अडविताच विरोध करून तमाशा उभा करणे, यातून राहुल गांधी यांचे राजकारण हे नकारात्मक आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेने प्रेरित असल्याचे दिसून आले. त्यांना जनतेची साथ नव्हती. इतया वर्षांनंतरही मोदींची ‘दिल मांगे मोअर’ची भावना कायम आहे, यातच त्यांचे यश सामावले आहे!