गीतासार भाग- २८

    08-Oct-2026

Drupad and Draupadi 
 
द्रुपद
द्रुपद पुत्री द्रौपदीच्या स्वयंवरात, अर्जुनाने स्वयंवराचा पण जिंकून तिला घरी आणले असता, द्रौपदीला एखादी खाण्याची सामान्य वस्तू मानून, ‘तिला पांच पांडवात वाटून दे,’ असे अर्जुनाला कुंतीने सांगितले. यामुळे सर्वांनाच मोठा प्रश्न पडला. आता एका विवाहित मुलीला पाचजणांत कसे काय वाटायचे? शेवटी व्यासांच्या बुद्धीने, त्या द्रौपदीला पाच पांडवांची पत्नी होण्यास सांगण्यात आले व वरील समाजविरोधी जटिल प्रश्न सोडविण्यात आला. तेव्हापासून द्रौपदी पाचही पांडवांची पत्नी झाल्याची कथा आहे. काहींचे ञम्हणणे असे की, हिमालयाच्या काही प्रदेशात आजही एका स्त्रीने, एकापेक्षा अनेक पती करण्याची प्रथा असून, ही रीत त्यांनी द्रौपदी कालापासून घेतली असावी. परंतु, अशी द्रौपदीच्या काळात सर्रास रीत असती, तर द्रौपदीच्या आईने, बहिणीने आणि इतर तत्कालच्या सर्वच स्त्रियांनी द्रौपदीसारखे अनेक पती केले असते. परंतु, तसा इतिहास सापडत नाही. द्रौपदीची आई व भावजय जर एकच पती वरतात. द्रौपदीच्या एका उदाहरणावरून, त्या काळात एका स्त्रीने अनेक पती करण्याची रीत होती, असा चुकीचा सिद्धांत निघतो.
 
हे खरे आहे की, एकेकाळी लडाखमध्ये अशीच एक पद्धत रुढ होती. लडाखमधील लोक त्या काळात बौद्धमताचे होते. बौद्ध समाजधुरिणांनी असा विचार केला की, आपल्या बर्फाच्छादित खडकाळ भागात अन्नधान्य होत नाही की, चार्‍याच्या अभावाने पशु-पक्षीसुद्धा वाढत नाहीत. असल्या भयंकर बर्फमय वैराण प्रदेशात राहायचे असल्यास, संततिनियमन केल्याशिवाय गत्यंतर नाही. अन्यथा, प्रत्येक स्त्रीद्वारे अनेक अपत्ये झाल्यास, काही वर्षांतच लडाखमध्ये माणसांची संख्या बरीच वाढून त्यांना खाणेही मिळणार नाही. म्हणूनचत्याकाळच्या लडाखी विचारवंतांनी बुद्धीला पटेल असा सामाजिक नियम बनविला की, घरातील मोठ्या भावानेच लग्न करून स्त्री आणावी. त्या घरातील अन्य भाऊ असल्यास, त्यांनी पुन्हा नवे लग्न करून नवीन पत्नी घरात आणू नये. दूरवरचा विचार करून बुद्धिवान बौद्ध समाजधुरिणांनी आपल्या लडाखपुरताच असा सामाजिक नियम ठरविला.
 
लडाखमधील विशिष्ट परिस्थितीत असलेला हा बहुपतित्वाचा नियम, इतर बौद्ध देशातसुद्धा नाही. असे असता, लडाखमधील हे उदाहरण बौद्ध नसलेल्या देशातील लोकरितीला लागू करणे, अयोग्यच. द्रौपदीच्या काळात एकट्या द्रौपदीचे उदाहरण सोडल्यास, बहुपतित्वाचे एकही उदाहरण नाही. असे असताना द्रौपदीने तिच्या कालातील सामाजिक रितीला धरून पाच पांडवांचे पत्नित्व स्वीकारले, असा अविचारी अट्टाहास धरणे बुद्धिवादाला धरून नाहीच. असा अट्टाहास धरल्याने, त्या कालातील वैदिक समाजावर आम्ही आमच्या बुद्धिहीन तर्कटांनी काय काय आरोप करतो, याचेही आम्हाला भान राहत नाही. द्रौपदीचे पाच पांडवांशी लग्न म्हणजे, पंचप्राणांची सेवा करणारी आपली कुडी होय. असल्या पंचपतित्वाची साक्ष ज्ञानेश्वरकालीन चांगदेव देतात.
 
‘आत्मा हा नोवरा कुडी ही नोवरी| लिंब लोण उतरा बायांनो॥’
 
तेव्हा विशालबुद्धी व्यासांनी, द्रौपदीच्या पंचपतित्वाची कोणती आध्यात्मिक कल्पना समाजासमोर मांडली असेल, याचा योग्य विचार करण्याची आता वेळ आली आहे. द्रुपद आणि द्रोणाचार्य एकाच गुरूंकडे अध्ययन करीत होते. अध्ययन संपल्यावर द्रुपद आपल्या राज्यावर बसला आणि द्रोणाचार्य गरीब ब्राह्मण असल्याने, आपल्या एकुलत्या लाडया अश्वत्थामा नामक मुलाला आणि आपल्या पत्नीला घेऊन अतिशय दारिद्—यात दिवस कंठत होते. दारिद्—यामुळे लहानग्या अश्वत्थाम्याला पिण्यास दूधही मिळत नव्हते. शेवटी दारिद्—याचा कंटाळा येऊन, त्यांनी आपला मित्र राजा द्रुपदाकडे मुलाच्या दुधाकरिता एक गाय मागितली. राजा द्रुपदाने त्याला गाय तर दिली नाहीच; परंतु ‘भिकारडा ब्राह्मण’ म्हणून द्रोणाचार्याला हिणवले. झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचे द्रोणाचार्यांनी ठरविले आणि कौरव-पांडवांची परीक्षा घेण्याकरिता अर्जुनाकरवी द्रुपदाला हरवून, त्याला एखाद्या गुलामासारखे द्रोणासमोर उभे केले. नंतर द्रुपदाला सोडूनही देण्यात आले.
 
याच द्रुपदाला द्रौपदी नावाची एक पुत्री होती. ‘द्रु+पद’ म्हणजे, आपल्या इच्छित पदावर जो साधक ‘द्रु’ म्हणजे लवकर प्रगती करून जातो, त्याला वेदव्यास ‘द्रुपद’ असे संबोधतात. याच द्रुपदाची बुद्धिमान कन्या द्रौपदी पाच पांडवांची पत्नी होते. उपवर द्रौपदीचे स्वयंवर करण्याचे द्रुपदाने ठरविले. स्वयंवराची अट मोठीच विचित्र होती. पण, ही अट स्वतः द्रौपदीने ठरवली नसून, तिच्या पित्यानेच ठरविली होती. मग, जिथे द्रौपदीच्या मताला स्थान नाही, त्या जबरदस्तीच्या विवाहाला स्वयंवर कसे काय म्हणायचे? हा मूळ महत्त्वाचा मुद्दा. परंतु प्रत्यक्ष स्वयंवर न होता, व्यासांच्या बुद्धीचे ते प्रत्यंतरच होय. द्रौपदीच्या कथित स्वयंवराची एक विलक्षण अट द्रुपदाने ठरविली. एका खांबावर चक्राकार गतीने एक मत्स्य फिरता ठेवला. त्या मत्स्याचा एक डोळा खालील तेलाने भरलेल्या पात्रात बघून जो धनुर्धारी वीर फोडेल, त्यालाच द्रौपदी द्यायची असा तो पण. सगळेच या पणात हरले. त्या स्वयंवराकरिता दुर्योधनसखा वीर कर्णही आला होता. कर्णाने आपल्या धनुष्याला प्रत्यंचा चढविली आणि मत्स्यनेत्राचा तो वेध घेणार, इतयात द्रौपदीने सांगितले की, ती कर्णासारख्या सूतपुत्राशी लग्न करणार नाही. कर्ण व दुर्योधनाला हा अपमान वाटून, त्याच वेळेस द्रौपदीचा केव्हा तरी बदला घेण्याचे त्या दोघांनी मनात ठरविले. आता आला पंडुपुत्र अर्जुन! अर्जुनाने तेलात पाहून, एकाच बाणाने त्या फिरत्या मत्स्याचा डोळा वेधला आणि द्रौपदीने अर्जुनाला माळ घातली.
 
वरवर पाहता, वरील स्वयंवरात द्रौपदीच्या मताला मुळीच स्थान नव्हते. दुसरे, कोणत्याही धनुर्धर व्यक्तीने केवळ मत्स्याचा डोळा फोडावा आणि एवढ्या एकाच अटीवर त्याची जात, कुळ, संस्कार व व्यवसाय न पाहता, अटीनुसार द्रौपदीने त्याला पती मानून माळ घालावी काय? शेवटी, द्रौपदी एका राजाची कन्या होती. तिचे लग्न या प्रकाराने कोणाशीही लावायचे काय? आजही वनात भटकणारे पारधी उत्तम धनुर्धारी असतात; म्हणून असल्या मत्स्याचा डोळा फोडून, आजचा कोणताही राजा अथवा श्रीमंत माणूस आपली एकुलती एक प्रिय बुद्धिमान कन्या त्याला देईल काय? तेव्हा द्रौपदीच्या वरील प्रकारच्या स्वयंवराचा व्यासआशय अन्य आध्यात्मिक असला पाहिजे, हे उघड आहे.(क्रमशः)
 
-योगिराज हरकरे
शब्दांकन: राजेश कोल्हापुरे
९७०२९३७३५७




संबंधित मजकूर