बारामुल्ला येथे अतिक्रमणविरोधी कारवाई; अफजल गुरुच्या पत्नीच्या ताब्यातील सरकारी जमीनही मुक्त!

    08-Oct-2026   
Baramulla Anti Encroachment Drive
 
मुंबई (Baramulla Anti Encroachment Drive) : जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला प्रशासनाने नुकतीच अतिक्रमणविरोधी कारवाई करत सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामे पाडली. या कारवाईत संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरुची पत्नी तबस्सुम हिच्यासह अनेक जणांनी अतिक्रमण केलेल्या जमिनीचा समावेश होता.
 
अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये अफजल गुरुची पत्नी, तसेच साजिद अहमद बुहुरू, तारिक अहमद बुहुरू आणि मंजूर अहमद बुहुरू यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधितांना अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी अतिक्रमण न हटवल्याने प्रशासनाने ही पाडकामाची कारवाई केली. (Baramulla Anti Encroachment Drive)
 
अफजल गुरु याला २००१ च्या संसद हल्ल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते आणि २०१३ मध्ये त्याला फाशी देण्यात आली. त्याची पत्नी तबस्सुम सध्या बारामुल्ला येथे राहत असून, तिने आपल्या घराजवळील सरकारी जमिनीवर दुग्धव्यवसाय सुरू केला होता. तर इतर नातेवाईकांनी गुलनार पार्कजवळील जमिनीवर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले.
 
अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “ अनधिकृतपणे ताब्यात असलेली ही जमीन अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असून तिची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचा अंदाज आहे. सरकारी जमिनीचे संरक्षण करणे आणि तिचा अनधिकृत वापर व ताबा रोखणे या प्रशासनाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.” (Baramulla Anti Encroachment Drive)
 
बारामुल्ला प्रशासनाने या कारवाईला जिल्ह्यातील महत्त्वाची अतिक्रमणविरोधी मोहीम असल्याचे म्हटले आहे. या कारवाईदरम्यान बेकायदेशीर ताब्यात असलेली अनेक कनाल इतकी मौल्यवान सरकारी जमीन परत मिळवण्यात आली. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कायद्यानुसार जिल्ह्यात अतिक्रमणविरोधी कारवाया यापुढेही सुरू राहतील. (Baramulla Anti Encroachment Drive)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर