...म्हणजे आम्ही मूर्ख!

    08-Oct-2026   
 
 MPSC Protest Rohit Pawar Vivekanand Patil
 
दीपके, बापट आणि आता विवेकानंद पाटील; हे अचानक धूमकेतूसारखे कुठून आले? ‘दीपके असे म्हणाले’, ‘बापट तसे म्हणाले’, ‘विवेकानंद गरजले’ अशा आशयाच्या हजारो पोस्टस् एकाएकी सोशल मीडियावर कुठून अवतरल्या? कोणाची तरी प्रत्यक्षाहून खूप मोठी प्रतिमा उभी करायची आणि त्या आड लोकांना उल्लू बनवायचे, असे हे कटकारस्थान सुरू आहे का? जनतेसमोर समाज-देशाविरोधी कृत्य करणारे लोक उघडे पडले आहेत. त्यांना पुन्हा घेऊन समाजासमोर जाणे शक्य नाही आणि समाजात फूट पाडता येणार नाही. त्यामुळे ज्यांना समाजात अस्वस्थता पसरवायची आहे, त्या कारस्थानी लोकांनी आता नवीन षड्यंत्र सुरू केले. सामान्य जनतेला आपल्यातलाच एक वाटेल, अशा नव्या-नव्या चेहर्‍यांना आंदोलनाच्या नावाने पुढे करायचे. त्या आड आपला सत्ता आणि समाजविरोधातला अजेंडा पुढे रेटायचा.
 
अत्यंत कर्तृत्ववान आणि समाजासाठी खस्ता खाणारे, देशासाठी प्राणही देऊ शकणारे लोक आहेत. पण, ते कुठे आहेत? उलट, बेताल बडबड करत स्वतःच्या परिस्थितीचे भांडवल करणार्‍यांना मोठे केले जाते. दीपके मागासवर्गीय समाजाचा, असे दाखवत त्याचे भांडवल; तर बापट पुरोगामी समाजातला शुद्ध भाषा बोलणारा आहे याचे भांडवल, तर दुसरीकडे विवेकानंदच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचे भांडवल! या तिघांना समाजात ‘प्रस्थापित’ करण्यासाठी मुद्दाम कुणीतरी हे सगळे करते आहे का? तर, सत्ता मिळत नाही म्हटल्यावर सोशल मीडियातून नेतृत्व जन्माला घालत, त्याद्वारे समाज-प्रशासनाला जेरीस आणण्याचाच हा सगळा प्रकार. त्यांची कार्यपद्धती आहे- आंदोलनाच्या नावावर अतिसामान्य-सामान्य कुवतीच्या व्यक्तीला मोहरा बनवायचे. ‘हा आपल्यासारखाच आहे’ अशा भ्रमात लोक आंदोलनात त्याच्या पाठी येतात. लोक पाठी आले की, मोहरा असलेल्या नेत्यासोबत मग सत्ताधार्‍यांविरोधातले प्रस्थापित नेते पुढे येतात. झुरळ आंदोलन घ्या, डीजे आंदोलन घ्या, दीपके-बापट सोबत कोण होते, हे समोर आलेच. आताही ‘एमपीएससी’च्या आंदोलनातच बघा, जरांगेंपासून विश्वजीत कदम, सुप्रिया सुळे ते रोहित पवार, आदित्य ठाकरे, राज ठाकरे सगळेच गेले. पण, आंदोलनाचा चेहरा कोण होता? विवेकानंद पाटील! हे सगळे पाहून वाटते, म्हणजे आम्ही मूर्ख!

इथेही आम्हीच मूर्ख!
 
रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी रोहित पवारांना पत्र लिहिले. त्यांच्या पत्राचा आशय आहे की, रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्मले, असे जे विरोधक म्हणतात; ते धादांत खोटे आहे. तर, पवार काकांचे म्हणणे खरे मानावे का? पत्रात तर आव असा आणला आहे की, रोहित यांचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. राजेंद्र खरेच खूप गरीब होते. इतके की, १९७८ साली ५०० डॉलर्स घेऊन अमेरिकेत शिकायला गेले होते. त्याकाळी ५०० डॉलर्स म्हणजे किती रुपये असतील? हे पाहून ठरवा की, राजेंद्र पवार गरीबच होते. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्याही गरिबी काय असते, त्यातून आलेली असाहाय्यता आणि त्यामुळे हरवलेल्या संधी, यांची पुसटशीही जाणीव राजेंद्र आणि रोहित यांना आहे का? एक मात्र आहे, गरिबी ही केवळ आर्थिकच नसते. सत्ता मिळवण्यासाठी माणुसकी हरवलेल्या माणसांच्या जाणिवांची गरिबी तर भयंकर धोकादायक असते. या परिप्रेक्ष्यात पवार कुटुंबीयांची गरिबी मान्य करायलाच हवी. त्यामुळेच रोहित यांची गरिबीही गरिबीच आहे बरे!
 
त्यांनी मोलमजुरी करून पैसे जमवले आणि त्यातून आमदारकी लढवली का? लक्षात घ्या, मोलमजुरी किंवा अगदी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींनासुद्धा महिन्याचे तीसही दिवस ऐषोरामात जगता येत नाही. पण, रोहित ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’चे अध्यक्षही झाले. तसेच अशाच गरिबीत रोहित हे ‘बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड’, तसेच ‘कन्नड सहकारी साखर कारखान्या’चे सर्वेसर्वा झाले. मगरपट्टा वसवणार्‍या अतिश्रीमंत माणसाचे रोहित पवार जावईबापू. पण, तरीही राजेंद्र यांच्या मते, ते गरीब आहेत. असू दे, असू दे; बापाचे हृदयच ते! तरीही, राजेंद्र यांच्या पत्रावरून वाटते की, सामान्य जनतेला आपला मुलगा त्यांचा प्रतिनिधी वाटावा, यासाठी त्यांनी हे पत्र लिहिले, हे नक्की. ‘माझा मुलगा सामान्य परिस्थितीतून आलेला आहे,’ हे सांगून जनतेला संभ्रमित करण्याची कला लाजवाबच! पत्रावरून वाटते की, शरद पवारांनी जे राजकारण केले, तेच राजकारण करण्याची ताकद त्यांच्यात आहे. एकंदर काय, ‘लिखे जो खत तुझे...’ हे नेहमीच प्रेमासाठी नसते; तर जनतेला उल्लू बनवण्यासाठी असते. म्हणजे इथेही आम्हीच मूर्ख!
 
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर