पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदांच्या कारकिर्दीला, आज २५ वर्षे पूर्ण झाली. विकसित व गौरवशाली भारताचे भविष्य घडविण्यासाठी, नरेंद्र मोदी यांची कारकीर्द देशाच्या इतिहासात ‘मैलाचा दगड’ ठरली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री व देशाच्या पंतप्रधानपदाची यशस्वीपणे धुरा सांभाळताना नरेंद्र मोदी यांनी समर्पित भावनेने कार्य करीत विश्वास, कर्तृत्व, जबाबदारी, स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचे दर्शन जगाला घडविले. त्यामुळे जगभरातील देशांमध्ये, भारताकडे विश्वगुरू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन विकसित झाला. आजच्या महत्त्वपूर्ण दिनानिमित्ताने, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हार्दिक शुभेच्छा.
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताना मोदीजींचे पहिले वाय होते, "कसोटी मॅच नाही, तर ‘वन डे’ खेळायला आलो आहे.” या वायातूनच त्यांच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीची झलक दिसते. गुजरातमधील त्यांच्या साडेबारा वर्षांच्या काळात, ‘व्हायब्रंट गुजरात’सारखा उपक्रम हा देशभरात चर्चेचा ठरला. एक मुख्यमंत्री राज्याचा विकास कशा पद्धतीने करू शकतो, याचेच ते सर्वोत्तम उदाहण! गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची देदीप्यमान कारकीर्द पाहूनच, देशातील जनतेनेही २०१४ मध्ये आपल्या मनातील पंतप्रधान निवडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात, महत्त्वाचे निर्णय वर्षानुवर्षे रखडल्याचे भारतीयांना पाहायला मिळाले नाही. झटपट निर्णय, गतिमान अंमलबजावणीतून जनतेच्या चेहर्यावर समाधान पाहणे, हेच त्यांच्या कारकिर्दीचे प्रमुख सूत्र झाले. त्यामुळे वर्षानुवर्षे भारतीयांनी प्रतीक्षा केलेले प्रभू श्रीरामाचे मंदिरही, अयोध्येत साकार झाले. घटनेतील ‘३७०’व्या कलमानुसार जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा हटविण्यात आला तर, ‘समान नागरी कायद्या’च्या दृष्टीनेही पावले टाकली गेली. हे निर्णय केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर भूमिकेमुळेच, व राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या पाठिंब्यानेच होऊ शकले.
पश्चिम बंगालमधून टाटांनी ‘नॅनो प्रकल्प’ २००८ मध्ये हलविण्याची घोषणा केल्यावर, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘वेलकम’ असा एकचा शब्दाचा ‘एसएमएस’ रतन टाटांना केला होता. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत, टाटांनी गुजरातमध्ये प्रकल्प हलविण्याचा निर्णय घेतला. एवढा विश्वास नरेंद्र मोदी यांच्या सरकारबद्दल रतन टाटांना होता. कालांतराने नरेंद्र मोदींविषयीची विश्वासाची परंपरा, आणखीच समृद्ध होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, उद्योगस्नेही वातावरण देशभरात निर्माण झाले.
त्यामुळे गेल्या १२ वर्षांत, देशात सुमारे ७० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणूकही आली. व्यवसाय सुलभतेत भारताने २०१४ मधील १४२व्या स्थानावरून, ६३व्या स्थानापर्यंत झेप घेतली. परकीय गुंतवणुकीबरोबरच ‘मेक इन इंडिया’मधून स्वदेशी उद्योग-व्यावसायिकांनाही चालना मिळाली. यातून भारतीयांनीही शेकडो स्वदेशी उत्पादने निर्माण केली आहेत. ‘कोरोना’ काळात ‘आत्मनिर्भर भारत’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवून, भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०२७ पर्यंत भारत हा तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास वाटतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात, देशात रस्त्यांचे जाळे ६४ लाख किलोमीटरवर पोहोचले. शहरांमध्ये मेट्रोचे नेटवर्क १ हजार १५५ किलोमीटरवर गेले, तर देशात ३६ हजार किलोमीटरहून अधिक नवीन रेल्वेमार्ग टाकले गेले आहेत. वंदे भारत आणि बुलेट ट्रेन हे भारताचे मानबिंदूच ठरावे.
देशवासीयांसाठी सर्वाधिक अभिमानाची बाब म्हणजे, भारताकडे कोणीही मान उंचावून पाहणार नाही अशी परिस्थिती पंतप्रधान मोदी यांनी निर्माण केली. ‘सर्जिकल स्ट्राईक’, ‘एअर स्ट्राईक’, ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’ आणि शेवटी ‘ऑपरेशन सिंदूर’मधून, शेजारी देशांवर जरब बसवली. त्यामुळेच दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण लक्षणीय कमी झाले. याविषयी प्रत्येक भारतीय, पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी कायमच ऋणी राहील.संविधानिक पद मिळाल्यावर, एक सामान्य कार्यकर्ता राज्य व देशाची प्रगती कशी घडवू शकतो, याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी! त्यांच्या नेतृत्वात भारत हे २०४७ मध्ये ‘विकसित राष्ट्र’ होईल, अशी खात्री वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा २५ वर्षांच्या संविधानिक कारकिर्दीबद्दल हार्दिक शुभेच्छा!
अॅड. माधवी नाईक
(लेखिका महाराष्ट्र विधान परिषद आमदार आहेत.)