स्वप्नांच्या पाऊलवाटा ‘सुवर्णा’च्या झाल्या...

    07-Oct-2026
Kiran Pahal Athlete Biography
 
धावण्याचे स्वप्न उराशी बाळगून, वार्‍याशी स्पर्धा करत आंतरराष्ट्रीय ‘सुवर्णा’चे दान भारताच्या पारड्यात टाकणार्‍या धावपटू किरण पहल विषयी...
 
स्वप्न माणसाच्या मनात नेमके कधी येते, हे त्याचे त्यालाही कळत नाही. एखाद्या पहाटेच्या वार्‍यासारखे ते येते आणि मनाच्या कोपर्‍यात घर करून बसते. सुरुवातीला ते फक्त स्वप्नच असते. पण, दिवस पुढे जातात, तसे त्याला इच्छेची पालवी फुटते. मग त्या इच्छेला धरूनच माणूस चालू लागतो. वाट सरळ नसतेच. कधी पायाला काटा टोचतो, कधी उन्हाने अंग भाजते, कधी वाट चुकल्यासारखेही वाटते. तरीही, मनातल्या स्वप्नाची सोबत असेल, तर माणूस थांबत नाही. कारण, स्वप्न मोठे असो वा छोटे, ते पूर्ण करण्याची जिद्दच माणसाला त्याच्या स्वतःच्या सामर्थ्याची खरी ओळख करून देते. घाम गाळावा लागतो, प्रसंगी अपयश पचवावे लागते, पुन्हा सुरुवात करावी लागते. शेवटी एक दिवस अशी वेळ येते की, कालपर्यंत दूर वाटणारे स्वप्न हातात येऊन विसावते. तो क्षण माणूस मनाने चितारलेले चित्र जगतो. अशाच एका स्वप्नाच्या मागे धावत, देशासाठी आंतरराष्ट्रीय ‘सुवर्णपदक’ पटकावणारी धावपटू म्हणजे किरण पहल!
 
किरणचा जन्म २००० साली हरियाणामध्ये झाला. सोनीपतच्या गावाकडच्या रस्त्यांवर धावताना तिच्या पायांना तेव्हा ना शर्यतीची रेषा ठाऊक होती, ना पदकाचे मोल. धावणे एवढेच तिला ठाऊक होते आणि धावण्यातच तिला आनंद मिळत होता. त्या धावण्याला तेव्हा कुठले ध्येय नव्हते. पण, कदाचित प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात अशीच निरागस असते. पावलांना दिशा माहीत नसते; मनाला मात्र आनंदाची वाट सापडलेली असते.
 
किरणच्या घरची परिस्थिती गरिबीची. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत नव्हती; पण सुखसोयींची रेलचेलही नव्हती. वडील शेतकरी आणि आई गृहिणी. घरात एक मोठा भाऊ आणि बहीण. हातात पैसा कमी असला, तरी लेकरांच्या स्वप्नांना हात आखडता घेणारे मन मात्र नव्हते. विशेषतः मुलीनेही काही करून दाखवावे, आपल्या कर्तृत्वाने घराचे आणि देशाचे नाव मोठे करावे, यासाठी लागणारे पाठबळ किरणला घरातून मिळाले. श्रीमंती घरात नव्हती; पण मुलीच्या पंखांना कात्री लावणारी दरिद्री मानसिकता नव्हती. हीच तिची पहिली श्रीमंती होती.
 
गावच्या रस्त्यांवर मुले कबड्डी खेळताना पाहून किरणलाही खेळावेसे वाटे. घरच्यांनी तिला कबड्डी खेळण्याची परवानगी दिली. मात्र, कबड्डीपेक्षा धावण्यातच अधिक मजा येते, असे किरणने स्पष्ट सांगितले. धावणे तिच्या मनाला भावले होते. पाचवीपर्यंतचे शिक्षण गावातील शाळेत झाले. शाळेतील अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन ती विजय मिळवत राहिली. खेळ हाच तिचा सर्वांत आवडता विषय झाला.
 
मात्र, ती मोठी होत गेली, तसे घरच्यांना तिने अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे वाटू लागले. त्यांनी खेळ सोडून अभ्यास करण्यास सांगितले. पण, खेळ सोडायचा विचारच किरणला मान्य नव्हता. ‘खेळ सोडावा लागणार असेल, तर मला अभ्यासच करायचा नाही,’ असे तिने सांगितले. घरच्यांनी सुरुवातीला हे म्हणणे फारसे मनावर घेतले नाही. मात्र, आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी किरण तब्बल १५ दिवस उपाशी राहिली. तिच्या मनातील खेळाची जागा किती मोठी आहे, याची जाणीव कदाचित तेव्हा घरच्यांनाही झाली.
 
बारावीपर्यंत लहान-मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवण्याचा तिचा धडाका सुरूच राहिला. २०१६ पासून अनेक जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदके मिळवली. २०१९ मध्ये ४०० मीटर रिलेच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक, तर ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक तिने पटकावले. मात्र, तिचे खरे स्वप्न होते देशासाठी पदक जिंकण्याचे. त्यासाठी खेळातील उणिवा दूर करणे गरजेचे होते.
 
२०२१ मध्ये किरणने कोच आशिष चिकारा यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली. त्यांनी तिची आवड हेरली आणि तिला कौशल्याची जोड दिली. परिणामी, तिच्या खेळात प्रचंड सुधारणा झाली. ‘कोविड’ काळात राष्ट्रीय शिबिरात असल्याचाही तिला फायदा झाला. त्यानंतर पुन्हा आशिष सरांकडून मार्गदर्शन घेत तिने राष्ट्रीय सामन्यांमध्ये सुवर्णपदकांची मालिका कायम ठेवली. मैदानात उतरताना तिच्या नजरेसमोर जणू एकच रंग असतो-सुवर्णाचा. रौप्यपदकावर समाधान मानण्याची वेळ तिच्यावर फार क्वचित आली. २०२४च्या ‘पॅरिस ऑलिम्पिक’साठीही ती पात्र ठरली होती.
 
आजवर चार आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके किरणच्या नावावर आहेत. त्यात अलीकडेच झालेल्या आशियाई स्पर्धांतील ४०० मीटर रिलेच्या सुवर्णपदकाचाही समावेश आहे. काही विजय पायाखालची जमीन घट्ट करतात आणि काही विजय पुढच्या शिखराची स्वप्ने दाखवतात. किरणच्या बाबतीतही तसेच आहे. आज तिच्या डोळ्यांसमोर विश्वविजयाचे स्वप्न आहे. विश्व अजिंय स्पर्धा आणि ‘ऑलिम्पिक’मध्ये देशासाठी ‘सुवर्ण’ मिळवण्याचे ध्येय तिने ठेवले आहे. काल गावच्या रस्त्यावर धावणारी ती मुलगी, आज जगाच्या मैदानावर धावण्याचे स्वप्न पाहते आहे. किरणच्या विश्वविजयाच्या स्वप्नांसाठी तिला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
 
- कौस्तुभ वीरकर




संबंधित मजकूर