मुलांच्या संगतीकडे लक्ष द्या! ‘गुड फ्रेंड-बॅड फ्रेंड’मधील फरक समजावून सांगा; मंगलप्रभात लोढांचे आवाहन

नशा हा शरीर आणि समाजाला पोखरणारा कॅन्सर - मंत्री मंगलप्रभात लोढा

    07-Oct-2026   
 
Drug Free Mumbai Campaign
 
मुंबई (Drug Free Mumbai Campaign) : नशेचे व्यसन शरीरात आणि मनात शिरले, तर त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण होते. कितीही उपचार केले तरी त्याचे परिणाम अनेकदा आयुष्यभर वेदना देऊन जातात. त्यामुळे नशा हा शरीर आणि समाजाला पोखरणारा कॅन्सर आहे, अशी खंत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली. तसेच नशेपासून स्वतःला आणि आपल्या पुढील पिढीला दूर ठेवण्यासाठी त्याविरोधात एकत्रितपणे लढणे ही काळाची गरज आहे. त्याकरिता गुड टच आणि बॅड टच प्रमाणेच आता ‘गुड फ्रेंड’ आणि ‘बॅड फ्रेंड’ यातील फरक समजून मुलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे आवाहन लोढा यांनी शिक्षक आणि पालकांना केले.
 
सांताक्रुझ पुर्वेकडील कलिना कॅम्पस येथील मुंबई विद्यापीठाच्या ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी ‘सेवा संकल्प अभियानातंर्गत ड्रग्स फ्री मुंबई – विद्यार्थी समुपदेशन सत्र व शिक्षण प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानामध्ये शाळा, महाविद्यालय, संस्था व संघटना आणि पोलीस प्रशासतील उत्तम कामगिरी करणाऱ्या २१ जणांचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थितांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली. (Drug Free Mumbai Campaign)
 
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “ड्रग्स फ्री मुंबई अभियानाची सुरुवात दि. ३० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली. हे अभियान वर्षभर सुरू राहणार आहे. नशेद्वारे गुन्हेगारी प्रवृत्ती समाजात प्रवेश करत आहे, त्याचा धोका ओळखा. आज युद्धाची परिभाषा बदलली आहे. तलवार, बंदुक, बॉम्ब किंवा अणुबॉम्बऐवजी नकली नोटा छापून एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करणे किंवा त्या देशातील युवा पिढीला नशेच्या आहारी लावणे, हीदेखील मोठी आव्हाने आहेत. कारण एखाद्या कुटुंबातील युवक व्यसनाच्या आहारी गेला, तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो.” (Drug Free Mumbai Campaign)
मुंबईला नशेपासून सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी
 
“मुंबईचा विकास होत असताना मुंबईला नशेपासून सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘ड्रग्स फ्री भारत’चा संकल्प व्यक्त केला आहे. युवकांच्या शक्तीवरच विकसित भारताची उभारणी होणार आहे. त्यामुळे युवकांनी नशेपासून दूर राहावे आणि ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाला प्रत्येकाने हातभार लावावा,” असे आवाहनही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. (Drug Free Mumbai Campaign)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर