गृहकर्ज-वाहनकर्ज महागणार! रेपोदरात चार वर्षांनंतर वाढ; नवा रेपोदर आता ५.२५ टक्क्यांवरुन ५.५० टक्के!

    07-Oct-2026   
 
 RBI Repo Rate Hike 2026
 
मुंबई (RBI Repo Rate Hike 2026) : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या आढावा बैठकीत रेपो दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रांच्या अध्यक्षतेखालील समितीने सर्वानुमते व्याजदरात २५ बेसिस पॉईंटने वाढवला. त्यामुळे नवा रेपोदर आता ५.२५ टक्क्यांवरुन ५.५० टक्के केला आहे. यापूर्वी रेपो दरात फेब्रुवारी २०२३मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता गृहकर्ज आणि वाहनकर्ज महागणार असल्याचे निश्चित झाले आहे. यापूर्वी आरबीआयने सावध भूमिका घेत रेपो दर जैसे थे ठेवले होते. मात्र, आता हे धोरण बदलण्यात आले आहे.
 
समितीने आपल्या 'कॅलिब्रेटेड टायटनिंग' म्हणजेच गरजेनुसार टप्प्याटप्प्याने पतधोरण कडक करण्याची भूमिका दर्शविली आहे. म्हणजेच भविष्यात व्याजदर स्थिर राहतील किंवा वाढतील, अशी शक्यता आहे. यापूर्वी पतधोरण समितीने तटस्थता दर्शविली होती. संजय मल्होत्रा म्हणाले, "सध्याच्या परिस्थितीत व्याजदर कपात आता अशक्य आहे. यापुढे दर स्थिर राहतील किंवा त्यात वाढ होईल. भविष्यात दरवाढ कधी होईल हे महागाईवर अवलंबून असणार आहे, असेही ते म्हणाले. ईराण-अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाची भाववाढ झाली, त्यामुळे महागाईत वाढ होताना दिसत आहे. ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता घटत असल्याची नोंदविण्यात आली आहे. चलनावर दबाव पडत आहे, शिवाय अल निनोचा प्रभाव आणि दुष्काळाचे सावट याचा परिणाम अन्नधान्यांच्या किंमतीवरही दिसून येणार आहेत. (RBI Repo Rate Hike 2026)
 
"बँकींग क्षेत्र मजबूत स्थिती दिसून आली आहे. शेड्युल कमर्शिअल बँकांकडे पुरेशी पुंजी आणि रोकड आहे. त्यांचा नफा आणि मालमत्तेची स्थितीही चांगली आहे. बिगर बँकींग संस्थांची आर्थिक स्थितीही मजबूत आहे," असेही ते म्हणाले.
 
पुढील काही महिने विशेष महत्त्वाचे ठरणार आहेत. कच्च्या तेलाच्या किमती, महागाई आणि रुपयाची वाटचाल यावर आजचा निर्णय एकदाच केलेला बदल ठरणार आहे की, पतधोरण अधिक व्यापक पातळीवर सामान्य करण्याची ही सुरुवात आहे, हे निश्चित होईल. - विजय कुप्पा, मुख्य कार्यकारी अधिकारी, इनक्रेड मनी तरलता सामान्य करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अल्पमुदतीचे व्याजदर रेपो दराच्या खालीच राहण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात तरलता सामान्य करण्याची जबाबदारी अतिरिक्त खुल्या बाजारातील रोख्यांच्या विक्रीवर येण्याची शक्यता आहे - राजीव राधाकृष्णन, सीएफए, सीआयओ – फिक्स्ड इनकम आणि प्रमुख, फिक्स्ड इनकम रिसर्च, एसबीआय म्युच्युअल फंड (RBI Repo Rate Hike 2026)
 
 




तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

संबंधित मजकूर