अपराजित मोदी...

    07-Oct-2026
 
Narendra Modi 25 Years Political Journey
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासाला आज २५ वर्षे पूर्ण झाली. २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झालेले मोदी, आजही सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी ज्या वेगाने स्वतःला गुजरातच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात नेले, त्याच वेगाने देशाचे राजकारणही बदलले. मोदींचे नाव वगळून भारतीय राजकारणाचा इतिहास लिहिता येणार नाही, हेच त्यांचे यश...
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी, २५ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रथम गुजरातचे मुख्यमंत्री, नंतर देशाचे पंतप्रधान अशी त्यांची वाटचाल. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे अनेक प्रयत्न झाले, ते सर्व अयशस्वीच झाले. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांना सत्तेवरून दूर करण्याचे प्रयत्न विरोधी पक्षाने भरपूर केले. हा लेख लिहीत असताना तर असे लक्षात येते की, विरोधी पक्षांच्या अंगात ‘मोदी हटाव’चे भूतच संचारले आहे. भूतबाधा झाल्यासारखेच ते वागत आहेत. पण, नरेंद्र मोदी आज तरी अपराजित आहेत.
 
अशी कोणती विशेष गुणवत्ता नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे, ज्यामुळे ते अपराजित आहेत? ब्रिटनचे राजघराणे ‘अपराजित राजघराणे’ समजले जाते. कारण, गादीवर येणारा पुरुष किंवा स्त्री वंशपरंपरेने येते. या गादीला लोकमान्यता आहे, त्यामुळे ती अपराजित आहे. नरेंद्र मोदी कोणत्याही राजघराण्यातून आलेले नाहीत. एका सामान्य परिवारात त्यांचा जन्म झाला. सामान्य शाळेत शिक्षण झाले आणि सामान्यच महाविद्यालयात शिक्षण झाले. अपराजित राजकीय नेता होण्यासाठी जे घराण्याचे वलय लागते, ते त्यांच्यामागे शून्य आहे.
 
मग त्यांची शक्ती कशात आहे? नरेंद्र मोदी हे प्रथम संघस्वयंसेवक आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते संघप्रचारक होते. संघाच्या इच्छेनेच ते राजकारणात गेले. स्वयंसेवक-प्रचारक असणे, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो, विचाराशी शतप्रतिशत प्रतिबद्धता. तो विचार असा की, हे सनातन राष्ट्र आहे. त्याची सनातन संस्कृती आहे, त्याचा सनातन धर्म आहे, त्याचे सर्व सामर्थ्यानीशी रक्षण करायचे, हीच संघ वैचारिक प्रेरणा आहे. ही प्रेरणा जगणारे देशात जे असंख्य स्वयंसेवक आहेत, त्यातील एक नरेंद्र मोदी आहेत. विचाराशी कुठलीही तडजोड नाही. वैचारिक प्रतिबद्धता हीच नरेंद्र मोदी यांची सर्वांत मोठी शक्ती आहे.
 
नरेंद्र मोदी यांची दुसरी शक्ती विचाराला कृतीचा आराखडा देण्याची आहे. राष्ट्रजीवनाचा विचार करता, राज्य हे राष्ट्राचे अंग असते. राज्याकडे राजकीय शक्ती असते, ही शक्ती असीमित असते. या राजकीय क्षेत्रात आपली वैचारिक प्रतिबद्धता कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकट करायची असेल, त्यासाठी राजकीय क्षेत्राच्या परिभाषेचा विचार करावा लागतो. नरेंद्र मोदी यांनी ते कौशल्य संपादन केले आहे. ‘सबका साथ सबका विकास’, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’, ‘आत्मनिर्भर भारत’, ‘व्होकल फॉर लोकल’ राष्ट्राचा विचार करताना, सर्वांचाच विचार करावा लागतो.
 
नरेंद्र मोदींची तिसरी शक्ती आहे, स्वत:ला पूर्णपणे जाणण्याची. अनेक लोकांच्या बाबतीत असे होते की, त्यांना जगाचे ज्ञान खूप असते परंतु, स्वत:चेच ज्ञान त्यांना फारसे नसते. स्वामी विवेकानंद सांगत की, प्रत्येक माणसाचा जीवनहेतू असतो. (एव्हरी मॅन हॅज अ लाईफ मिशन) अनेकांच्या बाबतीत स्मशानघाटावर जाईपर्यंत आपला जन्म कशासाठी झाला, आपण कशासाठी जगलो हेच समजलेले नसते. नरेंद्र मोदी यांना आपले ‘लाईफ मिशन’ कोणते, याचे उत्तम आकलन झालेले आहे.
 
त्यांचे ‘लाईफ मिशन’ भारतमातेला उन्नत करण्याचे आहे, राष्ट्राला परमवैभवाकडे घेऊन जाण्याचे आहे. हे जीवनध्येय केवळ भाषणे करून, सरकारी योजना करून साध्य होणार नाही, हे त्यांना उत्तम समजते. ते या जीवनध्येयाशी एकरूप झालेले आहेत, समर्पित आहेत. त्यांच्याविषयी इतर लोक म्हणतात की, "पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी एक दिवसाचीदेखील सुटी घेतली नाही.” सुटी याचा अर्थ, आपल्या जीवनध्येयापासून सुटीच्या काळापुरते अलग होणे. जीवनध्येयाशी एकरूप झालेली व्यक्ती असे करूच शकत नाही. आपल्या जीवनध्येयाशी ते एकरूप झाल्यामुळे, भारतमातेच्या सर्व संतानांशी ते मानसिकदृष्ट्या एकरूपच झालेले आहेत. ते जेव्हा म्हणतात की, "१४० कोटी भारतीयांच्या वतीने तेव्हा...” ते भाषणातील टाळ्या मिळविण्याचे वाक्य नसते. ती त्यांची समरूपतेची अभिव्यक्ती असते, हीच त्यांची फार मोठी शक्ती आहे.
 
ज्याप्रमाणे व्यक्तीचा एक जीवनहेतू असतो, त्याचप्रमाणे राष्ट्राचादेखील एक जीवनहेतू असतो. जगात १९३ देश आहेत, त्यातीलच एक भारत आहे. भारताचे जागतिक लक्ष्य कोणते? भारताचे जागतिक लक्ष्य वेगवेगळ्या शब्दांत मांडले जाते. विश्व एक परिवार आहे, याची अनुभूती देणे; मानवजात एक आहे, याची अनुभूती देणे, जगाला धर्म देणे इत्यादी शब्दांतून, भारताच्या जागतिक लक्ष्याचा बोध केला जातो. हे सर्व शब्द एकमेकांशी संलग्न असून, सर्वांचा अर्थ एकच होतो. तो म्हणजे, मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग सर्व मानवापुढे ठेवणे, हे भारताचे जागतिक लक्ष्य आहे.
 
नरेंद्र मोदी यांना ते पूर्णपणे अवगत आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा मंत्र त्यांनी जागतिक व्यासपीठावरून दिलेला आहे. जग ‘कोरोना’ संकटाशी झुंजत असताना, गरीब देशांनाही त्यांनी भारतातून औषधे पाठविली. अडचणीत आलेल्या देशांच्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोदी धावून जातात. मानवाला जेथे साहाय्याची गरज आहे, तिथे मोदींच्या रूपाने भारत पोहोचलेला असतो. यामुळे नरेंद्र मोदी हे जागतिक नेते झालेले आहेत. जागतिक स्तरावर त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्या ३५हून अधिक आहे, काही प्रमुख पुरस्कारांची नावे अशी :
 
‘यूएन चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड (२०१८) - पर्यावरण संरक्षणातील योगदानासाठी.
 
सेऊल पीस प्राईज (२०१८) - शांतता व विकासातील योगदानासाठी.
 
‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल’ (रशिया)- हा रशियाचा सर्वोच्च राज्य सन्मान; मोदी हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय नेते असल्याचे ‘पीएमओ’ने नमूद केले आहे.
 
‘ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ (फ्रान्स) - हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान.
 
‘ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस, फर्स्ट क्लास’ (स्लोव्हाकिया) - हा स्लोव्हाकियाचा सर्वोच्च राज्य सन्मान.
 
‘गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन’ (सेशेल्स)- पर्यावरण, हवामान कृती आणि ‘ब्ल्यू इकोनॉमी’साठी दिलेला विशेष राष्ट्रपती सन्मान.
 
‘ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ (नॉर्वे) - परदेशी सरकार प्रमुखांना दिला जाणारा नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान.
 
जो भावरूपाने समष्टीमय होतो, त्याला फक्त एकच कर्तव्य उरते ते म्हणजे, सर्वांच्या सार्वत्रिक कल्याणाचे. अशी व्यक्ती निंदा-स्तुती, विजय-पराजय, सुख आणि दु:ख अशा सर्व द्वंद्वांच्या पलीकडे जाते. ती समत्व चित्तधारक होते, म्हणजे तिचे मन कधी विचलीत होत नाही. नरेंद्र मोदी यांना रोज ‘गांधी गँग’कडून किती शिव्या घातल्या जातात, याची मोजदाद करणेच कठीण आहे. या सर्व शिव्या ते शांतमनाने स्वीकारतात आणि म्हणतात, ‘या शिव्या हीच माझी शक्ती आहे.’ त्यांच्या अशा मन:स्थितीमुळेच ते, व्यक्तिगत टीका-टिपण्णीच्या कुठल्याही चर्चेत कधी भाग घेत नाहीत. ज्या कोणाला मोदींविरुद्ध काही बोलायचे आहे, त्याला त्याची पूर्ण सूट दिलेली असते.
 
समतोल बुद्धी ही नरेंद्र मोदी यांची फार मोठी शक्ती आहे. मनाचे संतुलन बिघडावे म्हणून, राजकीय क्षेत्रात कौशल्याने प्रतिपक्ष अनेक डाव खेळत असतो. अपरिपक्व असणारे राजनेते त्यात फसतात, त्या जाळ्यात अडकतात आणि मग ते जी मुक्ताफळे उधळतात, ती मराठी वाचकांना माहीत आहेतच. अशी मुक्ताफळे उधळणारे कोण? यांची नावेदेखील माहिती आहेत. असे नेते मिरविणारे नेते ठरतात किंवा माध्यमांना बातम्या पुरविणारे नेते ठरतात, तेवढीच त्यांची योग्यता. नरेंद्र मोदी याच्या पलीकडे गेले आहेत.
 
नरेंद्र मोदी यांची सर्वांत मोठी शक्ती म्हणजे, त्यांनी संपादन केलेला जनतेचा विश्वास! सामान्य माणसापासून ते मोठमोठ्या उद्योजकापर्यंत ,सर्वांनाच नरेंद्र मोदी यांच्याविषयी विश्वास वाटतो. हा माणूस प्रामाणिक आहे, निरपेक्ष आहे, जे बोलेल ते करणारा आहे. धैर्यशील आहे, अचूक निर्णय घेणारा आहे आणि ज्यांच्या अस्तित्वामुळे भारताची जगात प्रतिष्ठा वाढत चाललेली आहे. नरेंद्र मोदींनी भारताचे नाव जगात मोठे केले, अशी लोकभावना आहे. हा विश्वास जोपर्यंत कायम आहे, तोपर्यंत मोदी अजेय आहेत. हा विश्वास दृढ करण्याच्या कृती मोदी यांच्या हातून सदैव अशाच घडत राहाव्यात, अशीच सर्व शक्तिमान परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया!
 
रमेश पतंगे
९८६९२०६१०१




संबंधित मजकूर