सेवा आणि कर्म याचा अद्भुत संगम

    07-Oct-2026
 Narendra Modi 25 Years Leadership Spirituality
 
लोकशाहीमध्ये एखादी व्यक्ती सलग २५ वर्षे सरकारचे नेतृत्व म्हणून कार्यरत राहणे, ही निश्चितच विशेष बाब आहे. देशाच्या नेतृत्वाची धुरा सलग २५ गौरवशाली वर्षे सांभाळल्याबद्दल मी नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. ते माझ्या अतिशय आवडीचे व्यक्तिमत्त्व आहे आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये मला त्यांच्याशी जवळून संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या बहुआयामी नेतृत्वाचा गौरव करणारा हा लेख...
 
नरेंद्र मोदी कोण आहेत, त्यांच्या यशाचे रहस्य काय आहे, त्यांना प्रेरणा कशातून मिळते, हे अतिशय सामान्य प्रश्न आहेत आणि त्यावर चिंतन करणे निश्चितच महत्त्वाचे आहे. माझ्यासाठी पंतप्रधान मोदी हे नेतृत्व आणि अध्यात्म या दोन्हींचा संगम आहे.
 
जेव्हा मी नरेंद्र मोदींच्या जीवनाचा विचार करतो, तेव्हा माझे लक्ष वेधून घेणारा एक गुण म्हणजे, त्यांच्या जीवनाच्या विविध टप्प्यांमध्ये दिसून येणारी अंतर्मनातील ध्येयाची भावना. परस्परविरोधी इच्छांमध्ये अडकलेले आणि विविध दिशांनी ओढले जाणारे मन म्हणजे विभक्त हृदय. याबद्दल मी अनेकदा बोललो आहे. स्वातंत्र्य आणि इच्छा, तसेच जे सुखद आहे आणि जे चांगले आहे, यांच्यामध्ये एक अंतर्निहित तणाव असतो. आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणार्‍या साधकांना या तणावाचा सामना करावा लागतो आणि खरी प्रगती शक्य होण्यापूर्वी तो दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. नरेंद्र मोदींच्या जीवनात हे कार्य अगदी लवकरच घडलेले दिसते. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी घर सोडले. संपूर्ण भारतभर प्रवास केला आणि हिमालयात काही काळ व्यतित केला. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा, तसेच विविध समुदाय आणि परंपरांशी झालेल्या त्यांच्या परिचयाचा प्रभाव पडून त्यांच्या जीवनाची दिशा सेवेकडे वळू लागली. त्यानंतर त्यांच्या भूमिकेचे बाह्य स्वरूप बदलत गेले. प्रचारकापासून संघटकापर्यंत, मुख्यमंत्री ते पंतप्रधानापर्यंत; मात्र सेवेची भावना त्यांच्या जीवनातील एक सातत्यपूर्ण धागा राहिली. जेव्हा हृदय एका उद्देशाशी एकरूप होते, तेव्हा पदे स्वतःमध्येच अंतिम ध्येय राहत नाहीत, त्या उद्देशाची अभिव्यक्ती करण्यासाठी ती विविध माध्यमे बनतात.
१९७९ मध्ये मच्छू धरणाच्या दुर्घटनेनंतर मोरबी येथे आलेल्या विनाशकारी पुरामुळे या सेवाभावाला कृतीचे एक मोठे आव्हानात्मक क्षेत्र मिळाले. या आपत्तीनंतरच्या परिस्थितीत नरेंद्र मोदींनी स्वयंसेवक म्हणून तेथे काम केले. अनेक वर्षांनंतर, २०२४ मध्ये भूस्खलनग्रस्त वायनाडला भेट देताना, त्यांनी त्या अनुभवाची आठवण काढली आणि एवढे सर्व काही गमावलेल्या कुटुंबांचे दुःख समजून घेण्यास त्या अनुभवाने आपल्याला मदत केली, असे सांगितले. जेव्हा आपण संकटावेळी लोकांची सेवा करतो, तेव्हा त्यांच्या अडचणी आपल्यापासून दूरच्या चिंता राहत नाहीत. त्या आपल्या अंतर्मनात जाणवणार्‍या जबाबदार्‍या बनतात.
 
उद्देशाची भावना आपल्या समोर असलेल्या व्यक्तीशी आपण ज्या पद्धतीने वागतो, त्यातून व्यक्त होते. जेव्हा सेवा हृदयात रुजते, तेव्हा साधी भेटदेखील आपुलकी आणि काळजी व्यक्त करण्याची संधी बनते. नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील एक प्रसंग हीच भावना आपल्या मनात जागवतो.
 
लेखिका लीना शर्मा यांनी २०१४ मध्ये ‘द हिंदू’मध्ये प्रकाशित केलेल्या ‘अ ट्रेन जर्नी अ‍ॅण्ड टू नेम्स टू रिमेंबर’ या लेखात १९९० मध्ये दिल्लीहून अहमदाबादला केलेल्या आपल्या प्रवासाची आठवण सांगितली आहे. त्यांच्यासोबत उत्पलपर्णा हजारिका होत्या. या दोन्ही महिला भारतीय रेल्वे वाहतूक सेवेमधील प्रशिक्षणार्थी अधिकारी होत्या आणि पुढील टप्प्यातील प्रशिक्षणासाठी प्रवास करत होत्या. त्यांच्याकडे निश्चित बर्थ नव्हते. प्रवासी तिकीट परीक्षकाने त्यांच्यासाठी प्रथम श्रेणीच्या एका डब्यात तात्पुरती जागा उपलब्ध करून दिली. त्या डब्यात नरेंद्र मोदी आणि शंकरसिंह वाघेला प्रवास करत होते. त्या संध्याकाळी नरेंद्र मोदींनी चारहीजणांच्या शाकाहारी जेवणाचे पैसे दिले. नंतर या दोन्ही महिलांसाठी बर्थची व्यवस्था होऊ शकणार नसल्याचे तिकीट परीक्षकाने सांगितल्यावर दोन्ही पुरुषांनी तत्काळ आपापले बर्थ त्यांना दिले. डब्याच्या जमिनीवर एक कापड अंथरले आणि तेथे झोपले; दोन्ही प्रशिक्षणार्थी महिलांना त्यांनी बर्थ दिले.
 
मला स्पर्शून जाणारी गोष्ट म्हणजे, त्यांनी अत्यंत सहजतेने स्वतःच्या सुखसोयींचा त्याग केला. शर्मा यांच्या आठवणीनुसार, ही मदत कोणत्याही औपचारिकतेशिवाय करण्यात आली होती. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्याच्या खूप आधीची ही घटना होती आणि त्यांच्यासमोरील गरज साधी आणि तातडीची होती. अशा प्रसंगांमधून, नेतृत्वाचे उदाहरण म्हणून कोणीही आपल्याकडे पाहत नसताना आपण कसे वागतो, याचा विचार करण्याची संधी मिळते. आपण दुसर्‍या व्यक्तीची अडचण ओळखून कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, तिला मदत करू शकतो का? माझ्या मते, हीच हृदयाची उदारता आहे. ती उद्देशाला मानवी ऊब देते आणि सेवेला दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवते.
 
प्रामाणिकपणे साधना करणार्‍या प्रत्येक साधकाच्या जीवनात शंका येतात, त्याचप्रमाणे मोठी जबाबदारी स्वीकारणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनिश्चितता असते. जर आपण या शंकेच्या कुजबुजीकडे लक्ष दिले, तर श्रद्धा हळूहळू कमकुवत होत जाते; इच्छाशक्तीची कृती करण्याची क्षमता कमी होते आणि खरी आध्यात्मिक प्रगती कठीण बनते. प्रश्न हा नाही की, शंका निर्माण होतात की नाहीत, तर प्रश्न हा आहे की, आपण आपल्या जीवनाचे नियंत्रण शंकेच्या हाती सोपवतो का. याच ठिकाणी श्रद्धा अत्यंत महत्त्वाची ठरते.
 
‘श्रद्धा’ म्हणजे केवळ विश्वास नव्हे; त्यात विश्वास, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, दृढनिश्चय आणि अंतर्मनातील ठाम विश्वास यांचा समावेश होतो. येथे मला २००१ मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्याची आठवण होते. वयाच्या ५१व्या वर्षी त्यांनी यापूर्वी कधीही निवडणूक लढवली नव्हती आणि प्रशासकीय पदावरही काम केले नव्हते. विनाशकारी भूकंपातून अद्याप सावरत असलेल्या राज्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आणि अनुभवी संघटक एक प्रभावी प्रशासक बनू शकतो का, याबाबत स्वाभाविक प्रश्न उपस्थित झाले. तरीही त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि ती पार पाडत असतानाच शिकत गेले. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीचा काळ अनेक आव्हानांनी भरलेला होता. त्यांना ही आव्हाने पार करावी लागली आणि यांपैकी अनेक आव्हाने कोणाच्याही श्रद्धेची कसोटी पाहू शकली असती.
 
दृढ विश्वास याचा अर्थ आपले यश निश्चित आहे, हे आपल्याला आधीपासून माहीत असणे, असा नाही. याचा अर्थ असा आहे की, अनिश्चितता आपल्याला पुढचे पाऊल उचलण्यापासून रोखत नाही. आपल्याला शंकेचा आवाज ऐकू येऊ शकतो, त्यातून आपण शिकू शकतो; मात्र आपल्या जीवनाची दिशा ठरवण्याची जबाबदारी आपण तिच्यावर सोपवण्याची गरज नाही. नरेंद्र मोदींचे जीवन असे आहे, ज्यामध्ये शंकेला कधीही चालकाच्या आसनावर बसू दिले गेले नाही; उलट धैर्य आणि दृढ विश्वासाला ते स्थान देण्यात आले आहे.
 
भीती विचारते, ‘जर असे झाले तर?’ तर श्रद्धा उत्तर देते, ‘असे झाले, तरी...’ निर्भयता म्हणजे, एखाद्या व्यक्तीला कधीही भीती वाटत नाही, असा त्याचा अर्थ नाही. महत्त्वाचे हे आहे की, भीतीला आपल्या दिशेचा निर्णय घेऊ दिला जातो का. अनिश्चिततेच्या अतिशय वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये जबाबदारी स्वीकारल्याची उदाहरणे नरेंद्र मोदींच्या जीवनात पाहायला मिळतात. वयाच्या साठीनंतर जेव्हा नरेंद्र मोदींनी भारताचे पंतप्रधानपद स्वीकारले, तेव्हा अनिश्चिततेचे प्रमाण प्रचंड होते. एका राज्याचे नेतृत्व करण्यापासून भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि जगाशी असलेल्या संबंधांची जबाबदारी स्वीकारण्यापर्यंतचा हा प्रवास होता. अशा वेळी राज्याचे नेतृत्व करणारी व्यक्ती ही भूमिका प्रभावीपणे पार पाडू शकेल का, याबाबत प्रश्न उपस्थित होत होते.
 
त्यानंतर आव्हानांचा असा काळ आला, जो अलीकडच्या इतिहासातील सर्वाधिक अशांत कालखंडांपैकी एक ठरू शकतो. ‘कोविड-१९’ महामारी, व्यापार युद्धे, युक्रेनमधील युद्धानंतर झालेली भू-राजकीय उलथापालथ आणि अलीकडील मध्य-पूर्वेतील संकट, तसेच अनेक देशांतर्गत आव्हाने, या सर्व परिस्थिती कोणत्याही नेत्याच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी पुरेशा होत्या आणि १.४ अब्ज लोकांच्या आशा-आकांक्षा ज्यांच्यावर अवलंबून आहेत, अशा नेत्यासाठी तर निश्चितच. या सर्व परिस्थितींमध्ये संयम आणि स्थैर्य राखून मार्गक्रमण करणे, हे अनुकरणीय आहे. कदाचित आध्यात्मिक दृष्टिकोनातून धैर्य समजून घेण्याचा हा एक मार्ग आहे. ‘माझ्यासोबत काहीही घडू शकत नाही,’ असे म्हणणे नव्हे; तर ‘काहीही घडले, तरी मला काय करायचे आहे, हे केवळ भीती ठरवू देणार नाही,’ असे म्हणणे होय.
 
आणि म्हणूनच, नेतृत्वाचा अभ्यास करणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या जीवनातून एक स्पष्ट धडा मिळतो. विभक्तपणापासून मुक्त हृदय विकसित करणे, आपल्या दैनंदिन कृतींना उदारतेने मार्गदर्शन करू देणे, मनाला दृढ विश्वासाशी जोडून ठेवणे आणि भीतीतून कृती न करणारी वृत्ती विकसित करणे, ही आध्यात्मिक तत्त्वे नरेंद्र मोदींच्या कर्मयोगी म्हणूनच्या वाटचालीला आकार देण्यास साहाय्यभूत ठरली आहेत. ही तत्त्वे सार्वत्रिक आहेत आणि जेव्हा ती एखाद्याच्या जीवनात प्रत्यक्ष साकारलेली दिसतात, तेव्हा आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ शकतो. यानिमित्ताने मी नरेंद्र मोदींना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो, जेणेकरून ते नेतृत्व आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून या युगाला पुढे घेऊन जात राहतील आणि भारताला अधिकाधिक उंचीवर नेण्याचे कार्य सातत्याने करत राहतील.
 
दाजी (कमलेश पटेल)
(लेखक हे आध्यात्मिक गुरू आणि ‘श्री रामचंद्र मिशन’चे अध्यक्ष, तसेच ‘हार्टफुलनेस मेडिटेशन’चे ‘ग्लोबल गाईड’ आहेत.)




संबंधित मजकूर