जावेदमियाँ, अब रहने भी दो!

    07-Oct-2026   
 
 Javed Akhtar Muslim Social Reform Statement
 
"मोहम्मद झुबेर, असदुद्दीन ओवेसी यांसारखे लोक हिंदू समाजातील कोणत्याही वाईट कृत्याचा जेव्हा विषय येतो, तेव्हा अगदी मोठ्याने बोलतात. पण, जसा प्रश्न त्यांच्या स्वतःच्या समाजाकडे वळतो, त्यांच्या समाजातील समस्यांकडे वळतो, तेव्हा त्यांचे डोळे बंद असतात. सगळीकडे शांतता पसरते. हिंदू समाजातील अनेक लोक स्वतःच्या परंपरा आणि चालीरीतींवर टीका करतात. ते स्वतःवरच टीका करतात. पण, मुस्लीम समाजात असे खूप कमी लोक आहेत, जे आपल्या समाजातील वाईट गोष्टींबद्दल उघडपणे बोलतात,” असे म्हणत जावेद अख्तर यांनी नुकताच एका मुलाखतीतून मुस्लीम समाजाला आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला. अशी उदारमतवादी भूमिका मांडल्याबद्दल जावेदमियाँचे खरं तर स्वागत. परंतु, केवळ अशी सुधारणावादी विधाने करून समाजात परिवर्तन घडून येत नसते, त्यासाठी ‘आधी केलेचि पाहिजे’ हाच दृष्टिकोन बाळगावा लागतो.
 
नाही म्हणायला, जावेदमियाँ ‘मुस्लीम फॉर सेक्युलर डेमोक्रसी’ या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, तर ‘मुस्लीम इंटेलेजिन्शिया’ या समाजात तर्कशुद्ध विचार, सामाजिक मागसलेपणाविरोधात जागृती आणि लिंगसमानतेचा आग्रह धरणार्‍या संस्थेचेही संस्थापक-सदस्य. आताच नाही, तर यापूर्वीही अनेकदा त्यांनी मुस्लीम समाजातील तिहेरी तलाक, लिंगसमानता याविषयी आग्रही भूमिकादेखील मांडली. पण, केवळ भूमिका सातत्याने मांडून अथवा अशा सामाजिक संस्थांच्या स्थापनेतून ही उद्दिष्टपूर्ती होत नसते. त्यासाठी प्रत्यक्षात समाजात उतरून, संवाद साधून, बुद्धिवादी कार्यकर्त्यांची फळी तयार करून अहोरात्र झिजावे लागते. प्रसंगी समाजाकडून हेटाळणीही सहन करावी लागेल. त्यामुळे अख्तर यांचे विचार सकारात्मक असले, तरी ते दिशाहीनच. त्यात आता जावेदमियाँ ८० वर्षांचे झाले. त्यामुळे एवढी वर्षे इस्लाममधील सुधारणांसाठी त्यांना ठोस काहीही करता आले नाही, तर आता उतारवयात हे कितपत शक्य होईल, याची साशंकताच! असो. ‘मुस्लीम सत्यशोधक समाजा’तर्फे हमीद दलवाईंनीही समाजपरिवर्तनाची हाक दिली होतीच. पण, त्यांनाही समाजांतर्गत कडव्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे ज्यांना आपला धर्मच अपरिवर्तनीय वाटतो, त्यांच्याकडून सुधारणांची अपेक्षाच मुळी फोल ठरावी.
 
गाझाच्या झांजा...
 
‘सेव्ह गाझा’ हा जणू जगभरातील पुरोगाम्यांचा मूलमंत्रच. मग भारतातले पुरोगामी तरी कसे मागे राहतील! सध्या गाझामध्ये शांतता असली, तरी अधूनमधून गाझावासीयांच्या कळवळ्याने काहींचा जीव नुसता कासावीस होतो. मग ‘सीजेपी’चे अभिजीत दीपके तरी याला कसा अपवाद ठरतील म्हणा...
 
नुकतेच ‘इन्स्टाग्राम’वर दीपके ‘लाईव्ह’ आले. ‘लाईव्ह’ दरम्यान काही नेटकर्‍यांनी त्यांना प्रश्न विचारले. यावेळी एका प्रेक्षकाने गाझामधील अत्याचारांविरोधात प्रश्न उपस्थित केला. त्यावर लगोलग दीपकेने, "Injustice anywhere is a threat to justice everywhere' असे अगदी चपखलपणे उत्तरही दिले. म्हणजेच काय, तर कुठेही होणारा अन्याय हा न्यायासाठी धोकाच! अर्थात, जगात कोणत्याही कोपर्‍यात, कोणत्याही जाती-धर्म-पंथ-वर्ण याविरोधी होणार्‍या अन्यायाकडेही मग याच मानवतावादी, संवेदनशील दृष्टिकोनातून बघणे, असा याचा मतितार्थ. पण, हे विधान केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत दीपकेंच्या दुटप्पीपणाची त्यांच्याच एका विधानाने पोलखोल झाली.
 
याच ‘लाईव्ह’ दरम्यान एका प्रेक्षकाने दीपकेंनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधातही भाष्य करावे, अशी मागणी केली. पण, त्यावेळी दीपकेंचे उत्तर होते- "internal matter of another country!' म्हणजेच, बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार हा त्या देशाचा अंतर्गत प्रश्न. मग त्याच न्यायाने गाझामधील मुस्लिमांवरील अत्याचार हा त्या देशांचा अंतर्गत प्रश्न का ठरू नये? गाझामधील पीडितांविषयी इतकी पराकोटीची सहानुभूती, मग बांगलादेशात कत्तल, बलात्कार झालेल्या, घरे जाळलेल्या, दुकाने उद्ध्वस्त केलेल्या हिंदूंविषयी दीपकेंना मानवतावादाचा उमाळा का फुटत नाही? म्हणजे एकप्रकारे मानवतावाद, मानवी हक्क वगैरे हे फक्त एका विशिष्ट धर्मासाठीच, अशी यांची सोयीस्कर धारणा! बांगलादेशातील पीडित हिंदूंविषयी जरी साधी सहवेदना व्यक्त केली, तर पुरोगाम्यांच्या कंपूत आपल्याला जणू वाळीत टाकतील, असेच दीपकेंचे वागणे. त्यामुळे ‘सेक्युलॅरिझम’, शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार वगैरे हे दीपके आणि ‘सीजेपी’ने पांघरलेला एक मुखवटाच आहे. एकूणच काय, तर आता गाझाच्या झांजा वाजवणारी ‘सीजेपी’ ही डाव्या-पुरोगाम्यांची जुन्या बाटलीत भरलेली नवीन दारूच!




विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
संबंधित मजकूर