डोंबिवली (Haldighati War 450th Anniversary) : भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत आणि डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने हल्दीघाटी युद्धाच्या ४५०व्या वर्षाच्या स्मरणार्थ एकदिवसीय अध्ययन वर्गाचे आयोजन रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी बँकेच्या श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी सभागृहात करण्यात आले. या अध्ययन वर्गात महाराणा प्रताप यांची शौर्यगाथा, हल्दीघाटी युद्धाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच भारतीय इतिहासातील त्याचे स्थान यावर विविध अभ्यासकांनी मार्गदर्शन केले.
इतिहास अभ्यासक चिराग आमेटा, कल्याणचे डॉ. दिनेश सिंग आणि दहिसरचे रविराज पराडकर यांनी मेवाडचा इतिहास, भूगोल, महाराणा प्रताप यांचे जीवन, मेवाड-अकबर संबंध आणि महाराणा प्रताप-अकबर संघर्षाचे विविध पैलू विशद केले. हल्दीघाटीची भौगोलिक रचना, युद्धाचा क्रम, युद्धाचे परिणाम तसेच महाराणा प्रताप यांनी अरवलीच्या पर्वतरांगांमधून पुढे सुरू ठेवलेला संघर्ष यावरही माहिती देण्यात आली. पुढील काळात महाराणा प्रताप यांनी मेवाडच्या मोठ्या भागावर पुन्हा नियंत्रण प्रस्थापित केल्याचा संदर्भ यावेळी मांडण्यात आला. (Haldighati War 450th Anniversary)
अध्ययन वर्गात भारतीय इतिहासाच्या प्रदीर्घ प्रवासाचा संदर्भही घेण्यात आला. महाराणा प्रताप यांच्या संघर्षाच्या परंपरेशी तसेच सिसोदिया वंशाशी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाते हिंदवी स्वराज्य, बुंदेलखंड व आसाममधील प्रतिकार, शीखांचे बलिदान, मराठ्यांचे साम्राज्य, १८५७चे स्वातंत्र्यसमर आणि भारतीय स्वातंत्र्यलढा यावर महाराणा प्रतापांचा प्रभाव यांची सांगड घालण्यात आली. हल्दीघाटीच्या युद्धाकडे भारतीयांचा पराभव म्हणून पाहणार्या काही इतिहासविषयक मांडणीवरही या अध्ययन वर्गात चर्चा झाली. हल्दीघाटी हे केवळ एक युद्ध नसून भारतीय इतिहासातील संघर्ष, स्वाभिमान आणि शौर्याच्या परंपरेचा महत्त्वपूर्ण अध्याय आहे, असा विचार अध्ययन वर्गात व्यक्त करण्यात आला. अभ्यासकांसाठी विषय मांडण्यासाठी एक संदर्भ पुस्तिका मराठी आणि हिंदीत तयार करण्यात आली तिचे विमोचन करण्यात आले. सर्व सहभागी लोकांना प्रमाणपत्र देण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन इतिहास संकलन समिती कल्याण जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात केले. सूत्रसंचालन डॉ. प्राची दामले यांनी केले तर आभार.विनोद बेंद्रे यांनी मानले, सीमांचल पाधी आणि सुकन्या तृप्ती यांनी संपूर्ण वंदे मातरम् सादर केले. विजनरी स्टुडिओजचे तुणीर कांबळी आणि त्यांच्या सहकार्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग केले असून ते अभ्यासकांसाठी युट्युब वर उपलब्ध असेल. (Haldighati War 450th Anniversary)