मुंबई (Balasaheb Bhaurao Deoras Smriti Bhavan) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक स्वर्गीय बाळासाहेब देवरस आणि ज्येष्ठ प्रचारक स्वर्गीय भाऊराव देवरस यांच्या पैतृक गावी कारंजा येथे स्मृती भवन तसेच माधव नेत्रालय नेत्र संस्थान व अनुसंधान केंद्र, नागपूर यांच्या अंतर्गत बाळासाहेब-भाऊराव देवरस माध्यमिक नेत्र परीक्षण केंद्राचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मानकर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, मध्य क्षेत्र संघचालक पूर्णेंदु सक्सेना, विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार तसेच न्यासाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पवन जी उपस्थित होते. लोकार्पण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, समाजबंधू तसेच मान्यवरांची उपस्थिती होती. (Balasaheb Bhaurao Deoras Smriti Bhavan)
लोकार्पण प्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, ज्या ठिकाणी प्रत्यक्षपणे सेवा आणि समाजहिताचे कार्य होत असते, तेथे भाषणापेक्षा कार्याला अधिक महत्त्व असते. भाषणे कालांतराने विस्मरणात जातात; मात्र समाजासाठी केलेले कार्य चिरंतन राहते.
ते म्हणाले की, पूजनीय बाळासाहेब देवरस आणि स्वर्गीय भाऊराव जी यांचे जीवन देश आणि समाजाच्या सेवेसाठी समर्पित होते. त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्याचा सर्वांत सार्थक मार्ग म्हणजे त्यांचे विचार आणि कार्य पुढे नेणे होय. स्मृती भवन तसेच महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन हे नव्या पिढीला त्यांच्या जीवनातून आणि विचारांतून प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. (Balasaheb Bhaurao Deoras Smriti Bhavan)
एखाद्या महापुरुषांप्रती खरी श्रद्धा केवळ त्यांचे जीवनचरित्र वाचणे किंवा त्यांचे स्मरण करण्यापुरती मर्यादित नसावी; तर त्यांच्या जीवनातून मिळणारा संदेश आपल्या आचरणात उतरवणे आवश्यक आहे, असे सरसंघचालकांनी सांगितले. एका प्रसंगाचा उल्लेख करताना पुढे ते म्हणाले की, समाजासमोर संकट उभे राहिले असताना पुस्तक प्रकाशनासाठी जमा केलेला निधी पीडितांच्या मदतीसाठी वापरण्यात आला. यातून मानवसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, हा संदेश मिळतो. (Balasaheb Bhaurao Deoras Smriti Bhavan)
सेवा कार्यामध्ये सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित करताना सरसंघचालक म्हणाले, “सेवेत सर्वांची साथ, श्रेयाची नाही बात; प्रकल्पात सर्वांचा हात असायला हवा.” समाजसेवा हा कोणत्याही एका व्यक्तीच्या श्रेयाचा विषय नसून, सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागाने पुढे जाणारे कार्य आहे. कोणत्याही सामाजिक प्रकल्पाच्या यशामध्ये प्रत्येक व्यक्तीची भूमिका महत्त्वाची असते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितेचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, व्यक्तीला प्राप्त झालेले ज्ञान, विद्वत्ता आणि प्रतिभा यांचा उपयोग मातृभूमी आणि समाजाच्या हितासाठी झाला पाहिजे. शिक्षण आणि क्षमता यांचा लाभ जर समाज आणि राष्ट्राला मिळत नसेल, तर ती केवळ वैयक्तिक उपलब्धी ठरून राहते, राष्ट्राच्या उत्थानासाठी विविध महापुरुषांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य केले. काहींनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, काहींनी सामाजिक सुधारणांचे कार्य केले, तर काहींनी राजकीय जागृती, धर्म आणि संस्कृतीच्या क्षेत्रात योगदान दिले. या सर्व प्रयत्नांचा अंतिम उद्देश राष्ट्राचा उत्थान हाच होता. (Balasaheb Bhaurao Deoras Smriti Bhavan)
भारतीय जीवनदृष्टीतील सेवा, त्याग आणि करुणेच्या परंपरेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, इतरांचे दुःख पाहून स्वतः व्यथित होणे आणि ते दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करणे, ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. महापुरुषांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाज आणि राष्ट्रासाठी कार्य करणे, हीच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली आहे, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रहित, मानवसेवा, त्याग, समर्पण आणि सामूहिक सहभागाची भावना जीवनात अंगीकारणे ही आजची गरज आहे.
स्मृती भवन तसेच माधव नेत्रालय नेत्र संस्थान व अनुसंधान केंद्र, नागपूर यांच्या अंतर्गत बाळासाहेब-भाऊराव देवरस माध्यमिक नेत्र परीक्षण केंद्राचे लोकार्पण हे सेवा, संस्कार, सामूहिक सहभाग आणि समाजहिताची भावना पुढे नेण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. (Balasaheb Bhaurao Deoras Smriti Bhavan)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक