ठाणे (World Mental Health Week 2026): मनाच्या जखमा दिसत नसल्या तरी त्यांची वेदना खोल असते. मानसिक आजाराशी झुंजणाऱ्या व्यक्तीला औषधोपचारांसोबत मायेचा हात, कुटुंबाचा आधार आणि समाजाचा स्वीकार मिळणे तितकेच गरजेचे आहे. मानसिक आजाराबाबतचे गैरसमज दूर करून समाजात संवेदनशीलता वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास पवार यांनी केले.
जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथे विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘अनुभवलेल्या व्यथा ऐकू या : खरे आवाज, खरा बदल’ या २०२६ च्या संकल्पनेनुसार आयोजित कार्यक्रमातून मानसिक आजाराचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या व्यक्तींच्या संघर्षाची आणि पुनर्वसनाच्या प्रवासाची समाजाला जाणीव करून देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कैलास पवार होते. त्यांच्या हस्ते जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या यंदाच्या संकल्पनेचे अनावरण करण्यात आले. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मानसिक आरोग्य जनजागृती, आरोग्य शिबिरे, बाह्यरुग्ण सेवा, रॅली तसेच विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मानसिक आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (World Mental Health Week 2026)
उपचारांसोबत आपुलकीही महत्त्वाची
प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे हे अनेक जिल्ह्यांना मानसिक आरोग्य सेवा देणारे महत्त्वाचे केंद्र आहे. मानसिक आजाराकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे आणि उपचारानंतर रुग्णांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, यासाठी जनजागृती महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी रुग्णांकडे केवळ ‘रुग्ण’ म्हणून न पाहता कुटुंबातील सदस्याप्रमाणे मायेने, सन्मानाने आणि संवेदनशीलतेने वागविण्याची गरज व्यक्त केली. योग्य उपचारांसोबत आपुलकीचे वातावरण मिळाल्यास पुनर्वसनाला मोठी मदत होते, असे त्यांनी सांगितले. (World Mental Health Week 2026)
पोस्टर प्रदर्शनातून गैरसमजांवर प्रहार
रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात मानसिक आजार, त्याबाबतचे गैरसमज, उपचार आणि पुनर्वसन यावर आधारित पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले. व्यवसायोपचार विभागात उपचारानंतर सावरलेल्या रुग्णांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित चित्रफिती दाखविण्यात आल्या. यावेळी उपचारातून सावरलेल्या काही रुग्णांचा त्यांच्या कुटुंबीयांसह गौरव करण्यात आला. (World Mental Health Week 2026)